Search

शाळेसंदर्भात मानसिक आरोग्याचा विचार का महत्त्वाचा आहे?

शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या गरजा पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण दर पाच मुलांपैकी एक, निदान करण्याजोग्या भावनिक,वर्तनात्मक किंवा मानसिक आरोग्याशी निगडीत विकाराने बाधित आहे. तसेच दर दहांपैकी एक तरुण त्याच्या/ तिच्या शाळा, घर किंवा समाजात वावरण्याच्या क्षमतेवर परिणाम करणार्‍या मानसिक आरोग्याशी निगडीत समस्येला तोंड देत आहे.

शाळेमध्ये मुलांच्या मानसिक आरोग्याशी निगडीत अडचणी ओळखणे आणि त्यांना आधार देणे गरजेचे आहे कारण...

  • मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या ही एक सर्वत्र आढळणारी बाब आहे आणि बर्‍याचदा या समस्या बालपणी आणि पौगंडावस्थेदरम्यान विकसित होतात.
  • त्यांच्यावर उपचार करता येतात.
  • मानसिक आरोग्याशी निगडीत अडचण लवकर ध्यानात आली आणि त्यात वेळीच हस्तक्षेप केला तर त्यामुळे व्यक्तिमत्व अधिक लवचिक होते व शिक्षणात आणि अभ्यासात यशस्वी होण्याची शक्यता वाढते.

शाळेत जाणार्‍या लहान मुलांवर आणि तरुणांवर मनोविकारांचा कोणता परिणाम होतो?

शिक्षण आणि सामाजिक नातेसंबंध या दोन्ही बाबी जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या आहेत व या दोन्ही गोष्टींवर मनोविकारांचा परिणाम होतो. तरुणपणातील मानसिक स्वास्थ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सेवा उपलब्ध केल्या तर मनोविकारांचे नकारात्मक परिणाम कमीत कमी करून मुलांना यश मिळण्याची शक्यता वाढवता येते.

एखाद्या मुलाला मनोविकारामुळे शाळेच्या कामात अडचणी येऊ शकतात. मनोविकारामुळे अशा अडचणी येत आहेत ही बाब शाळेने स्वीकारली नाही तर पालकांची अडचण होते. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी निगडीत बाबींकडे लक्ष देता येईल आणि त्यांच्या मानसिक अनारोग्याची लक्षणे हाताळण्यासाठी उपयुक्त ठरेल असे धोरण तयार करण्यासाठी शाळेची मान्यता मिळवणे देखील तितकेच आव्हानात्मक आहे.

शाळेतील मुलांच्या मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या आणि या समस्या हाताळण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली मदत विद्यार्थ्यागणिक वेगवेगळी असू शकते. जसे की, काही मुलांना जाणवणारी मानसिक अस्वास्थ्याची लक्षणे शाळा पातळीवर हाताळणे कठीण जाते तर तशाच स्थितीत असलेल्या दुसर्‍या मुलाची लक्षणे हाताळणे तितकेसे कठीण जात नाही. आपल्या सगळ्यांचा जसा एखादा दिवस बरा असतो आणि एखादा दिवस वाईट असतो तसेच मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या जाणवणार्‍या मुलांचे देखील असते; काही वेळा त्यांना मानसिक आरोग्याशी निगडित लक्षणांवर ताबा मिळवणे सहज शक्य होते तर काही वेळा त्यांना ते कठीण जाते.

मानसिक आरोग्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात हे ठरवताना, प्रत्येक मुलाच्या गरजा वेगळ्या असतात आणि अडचणींना सामोरे जायची प्रत्येकाची स्वतंत्र रीत असते हे ध्यानात ठेवायला हवे. प्रत्येक मुलाची गरज लक्षात घेऊन मानसिक आरोग्यासाठीचे कृतीकार्यक्रम निवडले पाहिजेत आणि गरजेप्रमाणे कमी अधिक मदत देता यावी म्हणून त्यामध्ये लवचिकता पाहिजे.

मानसिक आरोग्याशी निगडीत गरजा असणाऱ्या मुलांना शाळेत यशस्वी होण्यासाठी विविध प्रकारच्या मदतीची गरज असते. उदाहरणार्थ, शाळेच्या दैनंदिन नियोजनात कृती करून बघण्याचा समावेश असेल तर अतिचळवळ्या/अतिसक्रीय मुलांना त्याचा उपयोग होऊ शकतो. अपोझिशनल डिफायंट डिसऑर्डर(Oppositional Defiant Disorder) असलेल्या मुलाशी कसे वागावे याचे प्रशिक्षण जर शिक्षकाला दिले असेल तर या विकाराने ग्रस्त मुलांना मदत होऊ शकते.'अव्यवस्थितपणा' असलेल्या मुलाला जर वस्तूंचा वापर, अभ्यास याचे नियोजन कसे करावे हे शिकवले तर त्याला मदत होते. जी मुले आक्रमक होतात किंवा चिंताग्रस्त होतात त्यांना, असे कशामुळे होते? नेमके कधी होते? हे ओळखायला शिकवले आणि आक्रमकता किंवा चिंता हाताबाहेर जाऊ नये यासाठी काय करता येईल हे शिकवले तर फायदा होऊ शकतो.

शाळेमध्ये मानसिक आरोग्याशी निगडीत गरजा पूर्ण करण्यासाठी कधीकधी विशेष सूचना देणे किंवा सराव करून घेणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, जर एखाद्या विद्यार्थ्याला इतरांसोबत वागणे, बोलणे, संवाद साधणे कठीण जात असेल तर त्याला/तिला नवीन संवाद कौशल्ये शिकवणे आणि भूमिकानाट्ट्याच्या माध्यमातून लहान गटात त्याचा सराव करून घेणे उपयुक्त ठरते.

शाळेमध्ये विद्यार्थ्याने वर्गात लक्ष देणे, प्रश्न विचारणे,उत्तरे देणे अशा वेगवेगळ्या गोष्टी करणे अपेक्षित असते. या विशिष्ट अपेक्षांचा मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या असलेल्या मुलांवर काय परिणाम होतो याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ अतिरेकी चिंता या मनोविकाराने ग्रासलेली मुले चिंता करण्यात एवढी गढून जातात की वर्गात शिकवताना लक्ष केंद्रित करणे त्यांना कठीण जाते. वारंवार त्यांना पोटदुखी, डोकेदुखी उद्भवते, ती गैरहजर राहतात. एखादे काम सुरू करणे आणि वेळेत संपवणे त्यांना कठीण जाते, कारण ते नीट होणार नाही अशी त्यांना सारखी चिंता वाटत असते. काही वेळा त्यांना आपण हास्यास्पद ठरू, आपले काहीतरी चुकेल अशी भीती वाटते किंवा इतरांशी वागणे, बोलणे, मिसळणे याची भीती वाटत असल्यामुळे ते गटात एकत्र भेटणे, एकत्र काम करणे, मजा करणे अशा समूहाने करण्याच्या गोष्टी किंवा कदाचित शाळेत येणेच टाळतात.

मदत करण्याच्या काही पद्धती पुढीलप्रमाणे असू शकतील:

  • ठराविक मुदतीतच काम सादर केले पाहिजे असा अट्टाहास न करता, त्याबाबत लवचिक धोरण ठेवणे. सादर केलेल्या कामात सुधारणा करण्याची संधी ठेवणे, म्हणजे मुळात आपले काम सादर करण्याचा त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
  • एखादा विद्यार्थी अधिक चिंताग्रस्त होत आहे हे ओळखणे, योग्य वेळी हस्तक्षेप करणे आणि त्या विद्यार्थ्याला स्वतःची चिंता हाताळण्याचे मार्ग वापरायला मदत करणे.
  • चार लोकांच्यात बोलणे किंवा स्वतःचे मत मांडणे आपल्याला जमेल का? याची चिंता वाटणार्‍या मुलांना इतरांसमोर मत मांडण्याचा अनुभव घेता यावा यासाठी गटचर्चेचे नियोजन करणे.
  • जेव्हा मुलांना चिंतेमुळे अभ्यासावर किंवा कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही तेव्हा यातून कसा मार्ग काढायचा याची उपाययोजना तयार करणे.
  • ताणाचा निचरा करण्याची संधी मिळावी यासाठी मधेमधे विश्रांतीसाठी वेळ राखणे.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search