Search

मानसिक आरोग्य म्हणजे काय?

मानसिक आरोग्य हे आपल्या शारीरिक आरोग्याइतकेच महत्वाचे असते. बालपण, पौगंडावस्था तारुण्य आणि म्हातारपण अशा आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर मानसिक आरोग्य महत्वाचे ठरते. यामध्ये बदलांशी जुळवून घेणे, तणावाचा सामना करणे आणि आपले नातेसंबंध अधिक अर्थपूर्णरित्या विकसित करणे इत्यादी क्षमतांचा समावेश होतो.पौगंडावस्था (10-19 वर्षे) हा काळ अनेक शारीरिक, भावनिक आणि सामाजिक बदलांचा टप्पा आहे. यातील काही बदल तणावपूर्ण असू शकतात. या वयात एखाद्या व्यक्तीला जर दारिद्र्य, शोषण (abuse) किंवा हिंसेचा सामना करायला लागला, तर त्या सगळ्याचा त्यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अनेक तरुण (20-30 वर्षे) महाविद्यालयात शिकण्यासाठी विषय निवडताना, करिअर निवडताना, नोकरी शोधताना, आर्थिक स्वातंत्र्य मिळवताना, लग्न करताना वगैरे आव्हानांचा सामना करतात.

यातील काही बदल हे तणावपूर्ण असू शकतात आणि तुम्हाला मदतीची आणि आधाराची आवश्यकता असू शकते. विशेषत: जर हे बदल तुमच्या झोपेवर, खाण्याच्या सवयींवर, नातेसंबंध बनवण्याच्या क्षमतेवर परिणाम करायला लागले आणि आयुष तुम्हाला भावनिकदृष्ट्या कठीण वाटायला लागले तर तुम्हाला मदतीची आणि आधाराची आवश्यकता असू शकते. 

मानसिक आरोग्याचे मापदंड

मानसिक आरोग्य हा आरोग्याचा अविभाज्य आणि आवश्यक घटक आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेचे संविधान सांगते की "आरोग्य उत्तम असणे म्हणजे एखादी व्यक्ती केवळ निरोगी आणि सबल असणे नव्हे तर व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या सुधृड असणे होय." 

म्हणजेच व्यक्ती शारीरिक स्वास्थ , मानसिक स्वास्थ आणि सामाजिक स्वास्थ सुदृढ असणे व त्या व्यक्तीमध्ये खाली दिलेल्या गोष्टी हाताळण्याची क्षमता असणे.

  • जीवनातील गुंतागुंत यशस्वीरित्या हाताळणे,
  • परिपूर्ण नातेसंबंध विकसित करणे,
  • बदलाशी जुळवून घेणे,
  • सुदृढ राहण्यासाठी योग्य प्रकारच्या यंत्रणांचा (Coping mechanisms) वापर करणे.
  • स्वतःच्या क्षमता ओळखणे,
  • स्वतःच्या सर्व गरजा पूर्ण करता येणे आणि
  • विविध प्रकारची परिस्थिती हाताळण्यास मदत करतील अशी कौशल्ये विकसित करणे.

युवा मानसिक आरोग्य

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली माहिती

  • मानसिक स्वास्थ्याच्या केसेस पैकी निम्म्या केसेस वयाच्या 14 व्या वर्षापासून आणि तीन-चतुर्थांश केसेस विशीच्याच्या मध्यापर्यंत सुरू होतात परंतु बहुतेकवेळा असे रुग्ण लक्षात येत नाहीत आणि त्यांच्यावर उपचार केला जात नाही.
  • जागतिक स्तरावर, नैराश्य हे किशोरवयीन मुलांमधील आजार आणि अपंगत्वाचे एक प्रमुख कारण आहे.
  • 15-19 वर्षे वयोगटातील मुलांच्या मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आत्महत्या हे आहे.
  • पौगंडावस्थेतील मानसिक आरोग्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देण्याचे परिणाम प्रौढत्वापर्यंत वाढतात, शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही बिघडवतात आणि प्रौढ म्हणून पूर्ण जीवन जगण्याच्या संधी मर्यादित करतात.

नुकत्याच झालेल्या नॅशनल मेंटल हेल्थ सर्व्हे ऑफ इंडिया (2018) नुसार, 18-29 वयोगटातील मानसिक विकारांचे सध्याचे प्रमाण (current prevalence) 7.39 टक्के (तंबाखू वापरामुळे होणारे आजार वगळता) आणि आजीवन व्याप्ती (lifetime prevalence) 9.54 टक्के असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 13-17 वयोगटातील मानसिक विकारांचे प्रमाण (व्यसनाधारित आजार वगळता) 7.3 टक्के आहे.

बहुतेक तरुण लोक निरोगी आहेत असे मानले जाते परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या माहिती नुसार; दरवर्षी, 10 ते 24 वर्षे वयोगटातील 2.6 दशलक्ष तरुण मरण पावतात. अनेक तरुण वर्तनाशी निगडीत आजारांनी ग्रस्त आहे, ज्यामुळे त्यांची वाढ आणि विकास करण्याची क्षमता यामध्ये अडथळा निर्माण होतो. जवळजवळ दोन तृतीयांश अकाली मृत्यू आणि प्रौढांमध्ये एकूण आजारांचा एक तृतीयांश भाग त्यांच्या तारुण्यात निर्माण झालेली परिस्थिती किंवा वर्तन ह्याच्याशी संबंधित आहे (उदा . तंबाखूचा वापर, शारीरिक निष्क्रियता, धोकादायक लैंगिक वर्तन, दुखापत, हिंसा आणि इतर). विकासाच्या या टप्प्यावर केलेल्या वर्तनाचा परिणाम, तरुणांच्या आरोग्याची तत्कालीन स्थिती तसेच पुढच्या आयुष्यामध्ये एखादा मोठा आजार होण्याची संभावना ह्यावर होतो.

मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक:

तुमच्या आयुष्यात, जर तुम्हाला मानसिक आरोग्य समस्येचा सामना करावा लागला, तर तुमची विचारसरणी, मनःस्थिती आणि वागणूक यात बदल होऊ शकतो. जैवमनोसामाजिक (biopsychosocial) मॉडेलनुसार मानसिक आरोग्याचा विचार करताना तीन प्रमुख घटकांचा विचार होतो:

  1. जैविक घटक : अनुवंशिक घटक, शारीरिक आजार, जैवरासायनिक, रासायनिक असंतुलन. बौद्धिक किंवा शारीरिक अपंगत्व
  2. मानसशास्त्रीय घटक : बालपणीचे अनुभव, स्वभाव, परिस्थितीला तोंड देण्याचे कौशल्य; व्यक्तिमत्व घटक जसे दृष्टीकोन, पूर्वग्रह, आत्मसन्मान, लवचिकता; व्यक्तीवर परिणाम करणारे जीवनातील प्रसंग (उदा. अपघात, आजारपण, नुकसान, शोषण (abuse), गुंडगिरी, हिंसा), जीवन कौशल्ये
  3. सामाजिक घटक: कुटुंब, समवयस्क, शिक्षक, समाज, सोशल मीडिया, लिंग, धर्म, संस्कृती, सामाजिक व आर्थिक स्थिती, गरिबी, जीवनशैली इत्यादींचा प्रभाव

चांगले मानसिक आरोग्य म्हणजे केवळ मानसिक आजार नसणे असे नाही.चांगले मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची सर्व बाजूंनी भरभराट होऊ शकते व ती व्यक्ती जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकते.

प्रत्येकजण आयुष्यात वाईट काळ अनुभवत असतो. नकारात्मक अनुभवांना सामोरे जाण्याची क्षमता ही प्रत्येक व्यक्तिमध्ये वेगवेगळी असते आणि बर्याच अंशी ही क्षमता, लोक त्यांच्या जीवनाचा आनंद घेतात की नाही हे निर्धारित करते.

तरुणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे काही घटक खालीलप्रमाणे आहेत:

  1. स्व-प्रतिमा- आपण स्वत:चे मूल्य काय समजतो व आपली स्व-प्रतिमा किती सकारात्मक आहे ह्यावर आपली स्व-प्रतिमा ठरते. सकारात्मक स्व-प्रतिमा असलेले लोक सामान्यतः सकारात्मक दृष्टीकोन ठेवतात आणि बहुतेक वेळा स्वतःवर समाधानी असतात.
  2. प्रेमात न्हाऊन निघणे- ज्या मुलांना त्यांच्या पालकांकडून आणि इतरांकडून प्रेम, विश्वासार्हता मिळते आणि आपल्याला स्वीकारल्याची भावना त्यांच्या मनात तयार होते त्यांची स्व-प्रतिमा चांगली असण्याची शक्यता जास्त असते. अशा मुलांना आरामदायक, सुरक्षित आणि निश्चिंत वाटण्याची अधिक शक्यता असते आणि ते इतरांशी संवाद साधण्यास आणि सकारात्मक संबंध विकसित करण्यास अधिक सक्षम असतात.
  3. आत्मविश्वास- तरुणांना त्यांच्या स्वतःमधील वेगळे गुण शोधण्यासाठी प्रोत्साहित केले गेले पाहिजे. आव्हानांना सामोरे जाण्याचा आणि जोखीम स्विकारण्याचा आत्मविश्वास त्यांच्या मध्ये असला पाहिजे. स्वत: मध्ये आत्मविश्वास असणारे तरुण सकारात्मक दृष्टिकोन बाळगतात आणि आनंदी आणि उत्पादक जीवन जगतात.
  4. कौटुंबिक ताटातुट किंवा मृत्यू- घटस्फोट, पालक विभक्त होणे, पालक किंवा भावंड गमावणे हे अत्यंत वेदनादायक असते. या घटनांमुळे घडलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठीचे मार्ग शोधणे प्रत्येकासाठी, विशेषतः तरुणांसाठी महत्वाचे आहे. चुकीच्या मार्गाने दुख हाताळले गेले तर पुढील आयुष्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मुलांना दुखाचा सामना करण्यास अडचण येत असेल तर त्यांना व्यावसायिक मदतीची शिफारस केली पाहिजे.
  5. त्रासदायक वर्तन- जेव्हा लोक दुःखी असतात, तेव्हा ते एकतर त्यांचे दुख आतमध्ये साठवून ठेवतात किंवा अयोग्य मार्गाने व्यक्त करतात. अपमानजनक भाषा वापरणे, आक्रमक/हिंसक होणे, मालमत्तेचे नुकसान करणे, चोरी करणे, खोटे बोलणे, शाळेत/घरी विनंत्या आणि अपेक्षांचे पालन करण्यास नकार देणे, इतर अनुचित कृती करणे इत्यादी मधून ते दिसून येते. जर असे वर्तन गंभीर आणि सातत्याने होत असेल तर तरुण व्यक्तीला आणि तिच्या कुटुंबाला व्यावसायिक मदतीची आवश्यकता असू शकते.
  6. शारीरिक आजार- मादक पदार्थांचा वापर) थेट मेंदूच्या रसायनशास्त्रावर परिणाम करू शकतात आणि त्यामुळे मानसिक आजार होऊ शकतात. अनेकदा कमकुवत शारीरिक आरोग्य हे स्व-प्रतिमा आणि व्यक्तीचे ध्येय साध्य करण्याची क्षमता यावर परिणाम करू शकते, ज्यामुळे अतीव दुःख वाटू शकते किंवा नैराश्ययेऊ शकते. अशा परिस्थितीत, चांगल्या मानसिक आरोग्यासाठी, शारीरिक समस्या आणि त्याचे मानसिक परिणाम या दोन्हीवर उपचार मिळवणे योग्य ठरते.
  7. शोषण (abuse)- शोषण (abuse) झालेल्या मुलांचे मानसिक आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात असते. शोषण (abuse) झालेल्या मुलांना बालपणात आणि प्रौढत्वामध्ये मानसिक विकार किंवा मानसिक आजार होण्याची शक्यता असते. शोषण (abuse) हे शारीरिक, लैंगिक, मानसिक किंवा मौखिक असू शकते. ते नेहमीच स्पष्ट किंवा सहज ओळखले जाईल असे नाही. कुठल्याही स्वरूपातले शोषण सहन केले जाऊ नये. मुलांना शोषणापासून सुरक्षित ठेवणे आणि त्याचे नकारात्मक परिणाम दूर करण्यास मदत करणे आवश्यक आहे. शोषणामुळे मुलाच्या मनात कमी आत्मसन्मान व आत्मविश्वास, नैराश्य, एकटेपणा, संताप इत्यादी भावना निर्माण होऊ शकतात. अशा भावना मुलाला आनंदी जीवन जगण्यात अडथळा ठरू शकतात.

मुलांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना जोपासणे, त्यांची काळजी घेणे हे शोषणातून बाहेर पाडण्यासाठीचे काही मार्ग आहेत. काही मुले ह्यातून स्वतःहून बाहेर पडू शकतात. अशा परिस्थितीत मुलांना आधार देणे महत्वाचे आहे. काहीवेळा त्यांना व्यावसायिक समुपदेशनाची आवश्यकता भासू शकते. जर शोषण लवकर ओळखले गेले, तर मुलाची मानसिक स्थिती निरोगी होण्याची आणि गंभीर मानसिक विकार टाळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

‘सातत्यपूर्ण मानसिक आरोग्य पट’ म्हणजे काय? 

मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक आजार ह्या ‘सातत्यपूर्ण मानसिक आरोग्या’च्या पटावर दोन टोकाला असलेल्या श्रेणी आहेत. एखादी व्यक्ती ‘सातत्यपूर्ण मानसिक आरोग्या’च्या पटावर कुठल्या बिंदूवर येणार हे त्या व्यक्तीच्या अंतर्गत आणि बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते. स्थिती बदलली किंवा बिघडली तर त्या बिंदू मध्ये फरक पडतो.

‘सातत्यपूर्ण मानसिक आरोग्या’च्या पटावर वेगळी चिन्हे (मार्कर) आहेत:

सुदृढ बिंदू

जे लोक ह्या बिंदू वर असतात ते सहसा त्यांच्या आयुष्यात समाधानी आणि आनंदी असतात. ते भावनिकदृष्ट्या संतुलित, स्थिर आणि ध्येयाभिमुख असतात.

घातक बिंदू

हा सातत्यपूर्ण मानसिक आरोग्या’च्या पटाचा मध्यबिंदू आहे. जे लोक या बिंदू वर असतात त्यांना काही त्रास असू शकतात तसेच त्यांच्यामध्ये जुळवून घेण्याच्या क्षमतेची कमतरता असू शकते. परंतु दैनंदिन जीवनातील कार्ये पार पाडण्यास अशी माणसे सक्षम असतात.

अस्वस्थता बिंदू

हा सातत्यपूर्ण मानसिक आरोग्या’च्या पटाचा अंत्यबिंदू आहे, आणि नावाप्रमाणेच, या श्रेणी अंतर्गत येणारे लोक तणावाचा सामना करू शकत नाहीत आणि त्यांचे विचार, वर्तन आणि कृतींमध्ये महत्त्वपूर्ण बदल दाखवू शकत नाहीत.

सातत्यपूर्ण मानसिक आरोग्य पटाच्या (MHC) आकृतीवर एक नजर

आपण दररोज तणाव अनुभवतो. काहीवेळा त्याचा आपल्या आनंदावर आणि स्वास्थ्यावर परिणाम होतो. आपल्यापैकी बरेचजण चिंतेवर मात करण्यात यशस्वी होतात आणि जीवनात परत पाहिल्यासारखे जगतात, त्यांचे आंतरिक संतुलन अबाधित राहते. परंतु काही अप्रिय गोष्टी मनाला अस्वस्थ करत राहतात, त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आधाराची आवश्यकता असू शकते.

आपण स्वतः ताणताणावांचे प्राथमिक प्रतिसादकर्ता असतो. जितके महत्व आपण गंभीर संकटांना देतो, तितकेच महत्व आपण दैनंदिन संघर्षांना सुद्धा दिले पाहिजे. उदाहरणार्थ, परीक्षा, नातेसंबंध किंवा आर्थिक संकटे हे मोठे ताण आहेत जे एका दिवसात आपले मानसिक स्थैर्य घालवू शकतात. तथापि, आपण हे लक्षात घेतले पाहिजे की पालकांशी वाद होणे, कोविड दरम्यान आपल्या सुरक्षिततेची चिंता वाटणे असे रोजच्या आयुष्यात घडणारे छोटे छोटे प्रसंगसुद्धा तितकेच तणावदायी असू शकतात.

MHC चा सिद्धांत सांगतो की, आपण कोणत्या बिंदू वर आहोत हे ओळखताना, आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या सर्व छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि त्या कमी करण्यासाठी काम केले पाहिजे. सातत्यपूर्ण मानसिक स्वास्थ्याचा पट, आपल्याला मानसिक विकार व त्याने आपल्या स्वास्थ्यावर होणारे परिणाम आणि त्यावरचे उपाय ह्याबद्दल माहिती देतो.

MHC ची आकृती काय दर्शवते:

  • सुदृढ अवस्था आणि परीस्थितीशी जुळवून घेण्याची स्थिती
  • सौम्य आणि परत होण्यासारख्या त्रासाची अवस्था
  • गंभीर किंवा सातत्याने होणारा बिघाड
  • वैद्यकीयदृष्ट्या ओळखला जाणारा मानसिक विकार

हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की आपण सर्व सातत्यपूर्ण मानसिक आरोग्यपटाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाण्यास सक्षम असतो. आपण रेड झोनमध्ये आहोत म्हणजे आपण कधी ग्रीन झोनमध्ये जाऊच शकत नाही आणि तसेच आपण ग्रीन झोनमध्ये आहोत मध्ये कधीही रेड झोनमध्ये जाणारच नाही हा खोटा समज आहे. ‘सातत्यपूर्ण मानसिक आरोग्या’च्या मॉडेलच्या मुख्य वैशिष्ट्यांचे संक्षिप्त वर्णन खालील प्रमाणे:

टप्पा

वैशिष्ट्ये

सुधारण्याचे / टिकवण्याचे मार्ग

सकारात्मक, आरोग्यदायी

किमान चढउतारांसह स्थिर मूड.

मनाची स्थिती एकंदरीत स्थिर आणि शांत.

समाधानी जीवन.

स्वयंप्रेरित आणि उत्साही.

शारीरिकदृष्ट्या निरोगी.

कामांना प्राधान्य द्या.

समस्यांचे लहान भागांमध्ये विभाजन करा आणि एका वेळी एका वर काम करा.

निरोगी जीवनशैली ठेवा.

तटस्थ, प्रतिक्रियाशील स्थिती.

अस्वस्थता आणि काळजी.

तणाव असुरक्षितता.

सतत भावनाविवश होणे.

आत्म-संशयामुळे चिंता निर्माण होणे.

उर्जेचा अभाव, थकवा जाणवणे.

क्षमता आणि मर्यादा ओळखा.

निरोगी आहार योजना बनवा आणि तंदुरुस्त राहा.

अधिक सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घ्या.

पुरेशी विश्रांती घ्या.

थोडा बिघाड आणि बर्‍यापैकी आजारी

सतत दुःखी असणे आणि अपुरेपणाची भावना.

अस्वस्थता आणि चिडचिडेपणा.

नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी प्रेरणेचा अभाव.

दैनंदिन कर्तव्ये पार पाडण्याविषयी उदासीनता.

वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांमध्ये बिघाड.

व्यसन आणि मादक पदार्थांचे सेवन.

स्व-जागरूकता

तणावाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा.

मदत घ्या.

भावनिक आधार प्रणाली मिळवा (उदा. कुटुंब, मित्र, मुले, थेरपिस्ट, सहकारी).

तीव्र मानसिक आजार

तीव्र चिंतेमुळे समाजापासून दुरावणे.

मूड मध्ये सतत मोठे बदल होणे.

झोपेचे आणि खाण्याचे विकार.

दारू किंवा मादक पदार्थाचे सेवन.

मूलभूत स्व-काळजी यासह दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडण्यास असमर्थता.

शैक्षणिक किंवा व्यावसायिक यशामध्ये बदल होणे.

तज्ञांची मदत घ्या.

शक्य तितक्या इतरांच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करा.

उपचाराच्या नियोजनाचे पालन करा.

तुमची पूर्वीची आरोग्यपूर्वक दिनचर्या पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करा.

सातत्यपूर्ण स्वास्थ्य-अस्वास्थ्य पट (Illness-Wellness Continuum)

डॉ जॉन ट्रॅव्हिस यांचा आपण लोकांवर उपचार करण्याऐवजी त्यांना प्रेरणा द्यावी असा हेतू होता. त्यांनी 1972 मध्ये ‘सातत्यपूर्ण स्वास्थ्य-अस्वास्थ्य पट’ (Illness-Wellness Continuum) तयार केला. या पटाचा वापर करून आपण आपल्या जीवनशैली बदलू शकतो. असा बदल आपल्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल आणू शकतो आणि आपल्याला सातत्यपूर्ण स्वास्थ्याचा दिशेने नेऊ शकतो.

ही संकल्पना जबाबदारी, भावनिक नियंत्रण, सखोल अंतर्ज्ञान सजग आणि सर्वांगीण जागरूकता याद्वारे स्वास्थ्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते. ‘सातत्यपूर्ण स्वास्थ्य-अस्वास्थ्य पट’ सुदृढतेच्या तीन मुख्य संकल्पनांवर चालतो:

  • स्वास्थ्य ही एक प्रक्रिया आहे. आपले स्वास्थ्य कायम बदलत असते. स्वास्थ्याच्या एका बिंदूवरून दुसर्‍या बिंदूकडे जाणे म्हणजे मोठी कामगिरी करणे किंवा कमतरता दर्शवणे नाही, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक व्यक्ती या चढ-उतारातून जात असते.
  • एखाद्या व्यक्तीला कोणता आजार असेल तर त्या व्यक्तीचे स्वास्थ्य चांगले नसते आणि व्यक्ती पूर्ण निरोगी असल्यास तिचे स्वास्थ्य उत्तम असते अशी कल्पना करणे चूक आहे. त्याच्या उलटपण. आजारी असणे आणि स्वास्थ्य चांगले असणे हे एकमेकांचे विर्रुधार्थी शब्द नाहीत.
  • प्रत्येक क्षणी, आपल्याकडे आजारपणापासून स्वास्थ्याकडे ढकलण्याची क्षमता असते.

मानवी मनाची आयुष्याचा सामना करण्याची परिणामकारकता नेहमी बदलत असते हा ‘सातत्यपूर्ण मानसिक स्वास्थ्य पट’ या संकल्पनेतील कळीचा मुद्दा आहे. आपण स्वतःला पूर्ण नकारात्मकतेकडून थोड्या सकारात्मकतेकडे आणि पुढे सातत्यपूर्ण मानसिक स्वास्थ्य पटाच्या पूर्ण सकारात्मक बिंदूकडे घेऊन जाऊ शकतो.

मानसिक आरोग्याचा जैवमनोसामाजिक नमूना

आपण आपले जीवन जगत असताना आजूबाजूचे वातावरण बदलत असते, मेंदू आणि त्याचे कार्य देखील बदलत असते. यासर्वांबरोबरच एखाद्या व्यक्तीमधील आनुवंशिकता त्याच्या आजूबाजूचे वातावरण याचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर, जैविक आरोग्यावर आणि मेंदूच्या कार्यावर खोल परिणाम होतो. एखाद्याचे मानसिक आरोग्य नीट समजून घेण्यासाठी, त्याच्या आरोग्य आणि स्वास्थ्याविषयी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपण त्या व्यक्तीला प्रभावित करणारे सकारात्मक आणि नकारात्मक घटक विचारात घेतले पाहिजेत.

जॉर्ज एंजेल आणि जॉन रोमानो, यांच्या नुसार मानसिक आजाराच्या कारणांचे विश्लेषण करताना जैवमनोसामाजिक दृष्टीकोन अधिक योग्य आहे. हा सिद्धांत मानसिक आरोग्य समजण्यासाठी जैविक, मानसिक आणि सामाजिक निर्धारक असतात हे आपल्याला सांगतो. ही संकल्पना बाह्य जगाला कोणाच्याही जीवशास्त्र आणि मानसशास्त्राशी जोडते. यात आपली चेतना, भावना आणि वर्तन देखील समाविष्ट आहे.

जैवमनोसामाजिक दृष्टीकोन हे स्पष्ट करतो की "निरोगी" दिसणाऱ्या काही लोकांना सुद्धा मानसिक आजार होऊ शकतात. काही लोकांना मानसिक आजार होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते. जे मानसिकदृष्ट्या निरोगी असतात, बहुधा व्यायाम करतात, ज्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि सामाजिक बंध मजबूत असतात, त्यांना सुद्धा मानसिक आजार होऊ शकतात. जैवमनोसामाजिक दृष्टीकोन पुरावा देतो की कोणी आयुष्याच्या एका टप्प्यावर मानसिकदृष्ट्या निरोगी असले, तरीही त्यांचे जैवमनोसामाजिक समतोल बिघडल्यास ते मानसिक आजारांना सामोरे जाऊ शकतात.

  • जैवमनोसामाजिक नमुन्यानुसार लोकांच्या मधील आनुवंशिकता, मानसिक आरोग्य आणि व्यक्तिमत्व(मानसिक), आणि सामाजिक (सामाजिक जग) यामधील संवाद हा आरोग्य किंवा आजार याला हातभार लावतात.
  • मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार यावर जैविक प्रभाव असतो जो वैविध्यपूर्ण आणि त्यामध्ये आनुवंशिकता, संसर्ग, शारीरिक आघात, पोषण, संप्रेरके आणि द्रव्य यांचा समावेश असतो.
  • मानसिक घटक आरोग्याच्या समस्येसाठी संभाव्य मानसशास्त्रीय घटक करणीभूत असतात जसे की स्वतःवरील नियंत्रणाचा अभाव, भावनिक गुंतागुंत किंवा नकारात्मक विचार.
  • सामाजिक आणि सांस्कृतिक घटक हे तणावपूर्ण घटनांचा एक विशिष्ट संच म्हणून साठवले जातात (उदाहरणार्थ, काढून टाकलेले ) ज्याचा व्यक्ती आणि त्याच्या किंवा तिच्या सामाजिक संदर्भानुसार मानसिक आरोग्यावर भिन्न परिणाम करू शकतात.
  • जैवमनोसामाजिक सिद्धांत पुढे असे सांगतो यातील प्रत्येक घटक हा आरोग्य किंवा मानसिक आजार यासाठी पुरेसा नाहीये, परंतु यामधील परस्पर क्रिया ही तो होण्याची गती ठरवते.

हा दृष्टिकोन मानसिक आजारी रुग्णावर उपचार करताना वैद्यकीय काम करणार्‍यांना अनेक फायदे देऊ शकतो. ते आता रुग्णाच्या जीवनातील आजारावर लागू होणार्‍या प्रत्येक पैलूचा विचार करण्यास सक्षम आहेत. मानसिक आजार असणाऱ्यांना आता आत्मजागृतीची भावना प्राप्त होऊ शकते. मानसिक आजाराने ग्रस्त लोक त्यांचे अनेक भागांचे एकत्रित काम म्हणजे पूर्ण आरोग्य म्हणून समजू शकतात. यापुढे आपला मानसिक आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक करतो. जैवमनोसामाजिक दृष्टीकोन देखील मानसिक आजारांवरील कलंकांना आव्हान देते ज्यामुळे लोक हे समजण्यास सक्षम होतात की कोणीही मानसिक आजाराने ग्रस्त होऊ शकतो कारण आपल्या सर्वांमध्ये जैविक, मानसिक आणि सामाजिक प्रभाव असतो.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search