Search

भावनिक बुद्धिमत्तेचे शिक्षण

शिक्षकांना भावनिक बुद्धिमत्तेची माहिती का हवी?

किशोरवयीन मुलांच्या विकासात भावनिक बुद्धिमत्ता (EI) खूप महत्वाची मानली जाते. भावनिक बुद्धिमत्ता सामान्य बुद्धिमत्तेपेक्षा भिन्न असते. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे भावना समजून घेण्याची आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याची व्यक्तीची क्षमता. किशोरवयीन मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये व्यक्तींशी आणि भवतलाशी जुळवून घेताना भावनांचा प्रभावी आणि उत्पादनक्षम पद्धतीने वापर करण्याच्या त्यांच्या क्षमतेचा समावेश होतो.

तणावाचा सामना करणे, नातेसंबंध विकसित करणे तसेच 'शाळेतून कॉलेजमध्ये प्रवेश' यासारखी किशोरवयातील संक्रमणे हाताळणे यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता सकारात्मक भूमिका बाजवते. भावनिक बुद्धिमत्ता तरुणांना जीवनात अधिक यशस्वी होण्यास मदत करते; यशाच्या या व्याख्येमध्ये चांगले शिक्षण, मैत्री, शैक्षणिक यश आणि रोजगार या सर्व बाबींचा समावेश होतो.

With a strong understanding of  Emotional Intelligence, teachers can access and implement evidence-based strategies for many things including:

  •       वर्ग व्यवस्थापन
  •       वर्गातील चर्चेनंतरचे अभिप्राय.
  •       वर्गातील किंवा शाळेतील दादागिरी हाताळणे
  •       परीक्षेची चिंता वाटणार्‍या विद्यार्थ्यांना आधार देणे
  •       सर्जनशीलतेची जोपासना

भावनिक बुद्धिमत्तेमध्ये मुख्यतः पाच क्षेत्रांचा समावेश होतो:

1)  स्व-जागरूकता

2) भावनिक नियंत्रण

3) स्वयंप्रेरणा

4) सहानुभूती

5) नातेसंबंधांशी निगडित कौशल्ये

वरील कौशल्यांचा विकास करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करू शकतात. त्यासाठी ते पुढील मार्ग वापरू शकतात

1.  लक्षपूर्वक ऐकणे

शिक्षकांनी लक्षपूर्वक ऐकण्याचा सराव केला पाहिजे. लक्षपूर्वक ऐकण्याचे कौशल्य दोन्ही बाजूनी अर्थपूर्ण संवाद घडविण्यासाठी महत्वाचे आहे आणि हे नुसते लक्ष देणे नाहीये, त्यापेक्षा वेगळे आहे. यामध्ये संभाषण समजून घेणे आणि स्वतःच्या देहबोलीचा वापर करून इतरांना प्रतिसाद देणे याचा समावेश होतो. त्यानंतर, हे संभाषण तुम्हाला समजले आहे हे समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संभाषणाचे तुम्हाला समजलेले मर्म सारांश स्वरुपात सांगणे आवश्यक असते.

शिक्षकांना विद्यार्थांची मनोभूमिका, दृष्टिकोन आणि स्वयंप्रेरणा समजणे महत्त्वाचे असते कारण या घटकांवर त्यांचे प्रयत्न आणि चिकाटी अवलंबून असते आणि म्हणूनच शिक्षकांनी लक्षपूर्वक ऐकणे आवश्यक असते.

शिक्षक व विद्यार्थ्यांतील परस्पर संवाद सुकर होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

  •       त्यासाठी संवादाच्या वेळी स्वतः व विद्यार्थी या दोघांवर लक्ष केंद्रित करणे;
  •       शरीरभाषा व इतर प्रकारे आपण विद्यार्थ्यांना देत असलेल्या ( गैर मौखिक) संकेतांबद्दल जागरूक असणे;
  •       आपण लक्षपूर्वक ऐकले आहे हे योग्य प्रतिसादांद्वारे दाखवून देणे.
  •   आपण कोणत्या परिस्थितीत काम करत आहोत याचे भान राखणे.

शिक्षकाला जेव्हा अभिप्राय द्यायचा असेल तेव्हा असा दृष्टिकोन अधिक प्रस्तुत ठरतो.

2. भावनांसाठी शब्दसंग्रह

विद्यार्थ्यांचा भावनांबद्दलचा शब्दसंग्रह वाढविण्यात मदत करून त्यांचे परस्परसंबंध जोपासण्याबद्दलचे कौशल्य वाढवता येते. शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना "दु:खी", "निराश" आणि "अस्वस्थ" या मधील फरक समजून घेण्यासाठी प्रोत्साहन देतात तेव्हा या प्रत्येक भावनेला सामोरे जाण्याचे स्वतंत्र मार्ग विकसित करण्यासाठी त्याची मदत होते. थोडक्यात, आपण शिकत असलेला भावनाविषयक प्रत्येक शब्द हा भविष्यातील भावनिक बुद्धिमत्तेसाठीचे एक नवे साधन असतो.

अक्षरांचा खेळ हा विद्यार्थ्यांना याची ओळख करून देण्याचा सोपा मार्ग आहे. वर्णमालेतील प्रत्येक अक्षराने सुरू होणार्‍या किती भावनांची नावे तुम्हाला सापडताहेत हे तुम्ही वर्ग म्हणून शोधा. त्यानंतर, त्या भावनांमधील फरक, भावना कशामुळे उद्दिपीत होतात आणि विद्यार्थी त्याला वैयक्तिकरित्या कसा प्रतिसाद देऊ शकतात यावर चर्चा करा.

3. स्वयं जागरूकता व्यायाम

नकारात्मक आत्मसंवादातून चिंता उद्भवू शकते ही एक सिद्ध झालेली बाब आहे.

आपण स्वतःशी काय बोलतो, काय विचार करतो (आत्मसंवाद) याची जाणीव आत्मभान येण्यासाठी आवश्यक आहे. आत्मभान वाढविण्यासाठीचे बौद्धिक व्यायाम हे तर्कहीन आत्मसंवादाला लगाम घालण्याचे पहिले पाऊल असू शकते. आत्मभान विकसित करण्यास सहाय्य करून परीक्षेचा ताण किंवा परीक्षेची चिंता यांच्यासारख्या आव्हानांनाचा सामोरे जाण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करू शकतात.

विद्यार्थ्यांना डायरी ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणे ही आत्मभान विकसित करण्यासाठीची एक महत्त्वाची शिफारस आहे. यामुळे स्वतःचे वर्तन आणि विचार यात नेहमी दिसणारे आकृतीबंध (पॅटर्न) त्यांना जाणवतात आणि स्वतःच्या विचारांबद्दल विचार करण्याची क्षमता त्यांच्याठायी विकसित होण्यास मदत होते.

"यावेळी मी काय वेगळे वागू शकले असते?" असे आत्म-चिंतन करणारे प्रश्न विचारण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा यासाठीचा अजून एक मार्ग असू शकतो.

4. इतरांना सोबत असल्याची खूण म्हणून 'सहानुभूती' दाखवणे

सहानुभाव म्हणजे दुसर्‍या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून बघता येणे. असे करताना चूक, बरोबर न करता त्या व्यक्तीच्या भावना मान्य करणे आणि त्यांचा दृष्टिकोन पुन्हा त्यांना सांगता येणे आवश्यक आहे.

असे आढळले आहे की वाचन हा सहानुभाव विकसित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. दुसर्‍या व्यक्तीच्या दृष्टीकोनाबद्दल विचार केल्याने त्या व्यक्तीला आपण तिला समजून घेत आहोत हे जाणवते. त्यामुळे परस्पर सहकार्याची शक्यता वाढते. इतर व्यक्ती, ज्यामध्ये शिक्षक आणि इतर विद्यार्थीदेखील आले, सहानुभाव कसा व्यक्त करतात याच्या निरीक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये सहानुभाव विकसित होतो. “माझ्या लक्षात येतंय, मला जाणवतंय'' यासारख्या वाक्यांच्या वापर केल्याने, दुसर्‍याचा दृष्टिकोन आपल्याला समजला आहे हे आपण कशा प्रकारे व्यक्त करू शकतो ते विद्यार्थ्यांना समजते.

5. भावनांचे व्यवस्थापन आणि आत्म-नियमन

विचार आणि भावनांची अभिव्यक्ती करण्यास म्हणजेच आत्मनियमन करण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे, हा विद्यार्थ्यांना आधार देण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. माध्यमिक शाळेबाबत हे विशेषत्वाने खरे आहे कारण सनसनाटी गोष्टी करून स्वतःकडे लक्ष वेधून घेणे आणि आवेगावर ताबा असणे यातील अंतर किशोरवयात सर्वात जास्त असते.

जो प्रसंग घडला आहे त्याला अडथळा न समजता संधी म्हणून पाहणे आणि स्वतःला उपयोगी पडेल असा आत्मसंवाद करणे ही आत्मनियमनाची काही उपयुक्त तंत्रे आहेत.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर हे बिंबवले पाहिजे की आपली भावना व्यवस्थापन कौशल्ये ठराविक नसतात, तर ही कौशल्ये विकसित केली जाऊ शकतात. भावनिक कौशल्यांचा विकास ही बराच काळ सावकाशपणे चालणारी प्रक्रिया आहे, यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक दोघांना बरेच प्रयत्न करावे लागतात व संयम बाळगावा लागतो.

 भावनिक बुद्धिमत्तेच्या पाठांचे नियोजन

भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी शिक्षक स्वतः पाठ आखू शकतात किंवा इतरांनी आखणी केलेले पाठ वापरू शकतात.

शिक्षकांना वापरता येतील असे भावनिक बुद्धिमत्तेचे काही पाठ पुढीलप्रमाणे: 

1.आत्मसंवाद : आपले विचार भावनांवर आणि वागण्यावर कसा परिणाम करतात

आपले विचार आपल्या भावनांवर आणि वर्तनावर कसा परिणाम करतात याची जाणीव निर्माण करणारे पाठ आखता येतात. नकारात्मक व तर्कहीन वर्तनाकडे नेणारे विचार आणि आत्मसंवाद मनात कसे आकाराला येतात हे समजण्यासाठी सदर पाठ किशोरवयीन मुलांना मदत करतात.

भाग 1 : शिक्षक 'आत्मसंवाद' या संकल्पनेचा परिचय करून देतात. या विचारांवर चर्चा करा: आपण बऱ्याचदा स्वतःच्या भावनांबद्दल स्वतःच्या मनाशी बोलतो(आत्मसंवाद) आणि हा आत्मसंवाद आपल्या वर्तनावर परिणाम करतो.

भाग 2: कधी ना कधी स्वतःच्या मनाशी बोलणाऱ्यांनी हात वर करा असे विद्यार्थ्यांना सांगता येते. चर्चा गट (sharing circle) हा उपक्रम त्यासाठी विद्यार्थ्यांना उदयुक्त करू शकतो.

स्वतःच्या आत्मसंवादाबद्दल बोलण्यासाठी कोणी आपणहून पुढे आले नाही तरी, आपण सर्वजण मनाशी बोलतो; प्रत्येकवेळी ते आपल्या लक्षात येईलच असे नाही हे विद्यार्थ्यांना सांगा. त्यांचा आत्मसंवाद प्रेमळ- सकारात्मक असतो की स्वतःला बोल लावणारा नकारात्मक असतो याचा त्यांना विचार करायला सांगा. जेव्हा ते एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करत असतात तेव्हा त्यांचा आत्मसंवाद कसा असेल याची काही उदाहरणे त्यांना द्यायला सांगा.

भाग 3: तिसर्‍या भागात आपल्याला विद्यार्थ्यांना यासाठी लागणार्‍या कौशल्यांचा परिचयकरून द्यायचा आहे. यावेळी, आत्मसंवाद ही मानसिक पातळीवर स्वतःला काही सांगण्याची पद्धत आहे आणि बर्‍याचदा हा संवाद आपण कोण आहोत? आपल्याला काय जमू शकते? या बद्दलचा असतो हे शिक्षक स्पष्ट करतील.

हे स्पष्ट करा की आपले विचार आणि वर्तन यांच्यावर आत्मसंवादाचा मोठा परिणाम होतो. आपला आत्मसंवाद सकारात्मक असतो की नकारात्मक यावर हा परिणाम अवलंबून असतो. ज्यावेळी आपण नकारात्मक आत्मसंवाद सकारात्मक आत्मसंवादात बदलू शकतो ती आपली स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवण्याची सुरुवात असू शकते.

“ तुम्हाला कसं वाटतंय' याबद्दलचे तुमचे मत आणि तुमच्या प्रतिक्रिया यावर आत्मसंवाद प्रभाव टाकू शकतो. हा प्रभाव तुम्हाला जाणवेल असे नाही. काहीवेळा आत्म संवाद नकारात्मक आणि हानिकारक बनू शकतो म्हणून त्याबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्यात घरकामापासून ते समाज माध्यमांपर्यंत अनेक गोष्टी व्यत्यय आणत असतात, त्यामुळे आत्म संवादाबद्दलची सजगता कठीण असू शकते. आत्म संवादावर ध्यान केंद्रित करण्यासाठी कधी कधी आपल्याला निवांतपणाची गरज असते. ”

येथे, आपण गटचर्चेमध्ये मांडलेल्या उदाहरणांकडे चर्चा वळवून, नकारात्मक विचारांचे चक्र कसे अस्तित्वात येते हे गटचर्चेतील उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करू शकता. इलियास आणि टोबियस (2018) या लेखकद्वयीचे पुढील उदाहरण उपयोगी पडू शकते.

वाईट गोष्ट घडते आपल्याला वाईट वाटते आपण नकारात्मक आत्म संवाद करतो आपल्याला अधिक वाईट वाटते आपण आपल्या नकारात्मक भावनांवर आधारित प्रतिक्रिया देतो अधिक वाईट गोष्टी घडतात

नकारात्मक गोष्टी घडतात आणि त्यांच्याबद्दल वाईट वाटणे स्वाभाविक आहे हे वास्तव स्वीकारा. आपण जेव्हा या नकारात्मक विचारांचा पुनरुच्चार करतो आणि त्यांना आपला ताबा घेऊ देतो, तेव्हा परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते ही समजूत विकसित करण्यावर भर द्या.

उदाहरणे वापरून आणि विद्यार्थ्यांना पर्यायी सकारात्मक आत्मसंवादाचे नमुने सादर करायला सांगून हे अधिक विकसित करता येईल. नकारात्मक आत्मसंवादाची जाणीव होणे ही त्याला आव्हान देण्याची पहिली पायरी आहे यावर पाठाच्या शेवटी पुन्हा भर द्या.

2. सजगता सुकर करणे

सजगता, ध्यान, आणि भावनिक बुद्धिमत्ता या बाबी एकमेकांशी जोडलेल्या असल्याचे अभ्यासकांच्या लक्षात आले आहे

 जर तुम्ही किशोरवयीन विद्यार्थ्यांना तुमच्यासोबत वर्गात ध्यान करण्यासाठी प्रेरित करू शकला नाहीत तरी हरकत नाही.

किशोरवयीन मुले आणि विद्यार्थ्यांना सजगतेचा पहिला अनुभव घेता यावा या प्रमुख हेतूने एडुटोपिया(Edutopia.org) या संस्थेकडून सामाजिक आणि भावनिक शिक्षणाचा (social and emotional learning, SEL) हा पाठ तयार करण्यात आलेला आहे.

पायरी 1: विद्यार्थ्यांना खुर्च्यांचा गोल तयार करण्यासाठी बोलवा. त्यांना त्यांचे पाय जमिनीवर सरळ ठेवायला सांगा आणि सजगतेच्या फायद्यांविषयी चर्चा करून सत्र सुरू करा . जागरूकता केवळ ध्यान करण्यापुरती मर्यादित नाही, तर त्याचे इतर फायदेदेखील आहेत हे त्यांना सांगा. "हे काटेकोरपणे केलेले ध्यान नाही, तर स्वतःची काळजी घेण्यासाठी स्वतःच्या मनाला आधार देण्याचा हा सराव आहे ."

पायरी 2: विद्यार्थ्यांना या क्रीयेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या तसेच त्यांना सहभागी व्हयचे नसेल तरी त्यांना बाहेर पडण्याची संधी द्या. या वर्गाशी तुमचा आधीपासून परिचय असेल तर विद्यार्थ्यांचा सहभाग कसा मिळवावा याची तुम्हाला चांगली कल्पना असेल.

पायरी 3: सजगतेच्या सरावाचे तुम्हाला झालेले फायदे त्यांना सांगा.नकारात्मक भावनांनावर मात करण्यासाठी, सजगतेचा वापर करून तणावाचा सामना करणे किंवा यासारख्या इतर पद्धतींची तुम्हाला कशी मदत झाली याचा एखादा वैयक्तिक अनुभव देखील तुम्ही त्यांना सांगू शकता.

पायरी 4 : पुढे जाताना प्रत्येक पायरीची रूपरेषा आणि औचित्य ठरवा . विद्यार्थ्यांना त्यांचे डोळे बंद करण्यास सांगून तीन मंद आणि खोल श्वास घ्यायला व सोडायला सांगा. त्यांना चिंतन करायला सांगायच्या आधी तुम्ही गटात ही कृती करून एकत्र मूक चिंतन करू शकता.

या चिंतनाचे विषय वेगवेगळे असू शकतात. तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या सद्य स्थितीवर चिंतन करायला सांगून सुरुवात करू शकता. त्यांना कसे वाटतेय हे विचारून काहीही चूक-बरोबर न करता ही भावना त्यांना स्वीकारायला सांगा. त्यानंतर तुम्ही चिंतांनासाठी तुम्ही नियोजन केलेल्या पुढील विषयाकडे जाऊ शकता

पायरी 5 :सूचना देण्यासाठी लागणारा वेळ आणि विद्यार्थ्यांना चिंतांनासाठी उपलब्ध असणारा वेळ यामध्ये प्रत्येक टप्प्यावर समतोल साधणे गरजेचे आहे. तुम्ही पुढीलप्रमाणे सूचना देऊ शकता,"आता थोड्या काळासाठी आपण नीट ध्यान केंद्रित करणार आहोत. आता आपण शरीरात प्रवेश करणार्‍या आणि शरीरातून बाहेर पडणार्‍या श्वासावर लक्ष केंद्रित करणार आहोत."

पायरी 6: 'सजगतेसाठी हानिकारक असणार्‍या वर्तनाबद्दल बोला. जसे की, खिदळणे किंवा गोंधळ करणे, या वर्तनाबद्दल सजगतेचे तंत्र वापरुन कसा विचार करावा याची तुम्ही चर्चा करू शकता. सजगतेतून आपल्याला काय साध्य करायचे आहे याबद्दल शांतपणे आणि हळुवार शब्दात बोला.

पायरी 7 : सजगतेच्या नुकत्याच घेतलेल्या अनुभवाबद्दल चिंतन करा आणि विद्यार्थ्यांचे अभिप्राय गोळा करा. सजगतेचा अभ्यास करण्यामागील अर्थ समजावून घेणे हा या टप्प्यामागील हेतू आहे.विद्यार्थ्यांना वर्गमित्रांशी चर्चा करणे अधिक सोयीचे वाटू शकते, ते थेट तुमच्याकडे अभिप्राय नोंदवू शकतात हे देखील त्यांना सांगा.

3. सामाजिक संभाषण कौशल्य: ठामपणा

किशोरवयीन मुलाला किंवा विद्यार्थ्याला ठामपणा विकसित करण्यास मदत व्हावी म्हणून NobelCoaching.com ने एक अभ्यासक्रम बनवला आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना जर एका जोडीदारसमवेत काम करायला संगितले तर गट कार्यासाठी देखील तुम्ही हा अभ्यासक्रम वापरू शकता. यामुळे, आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाची. घडण करताना विद्यार्थ्यांना नेमके काय वाटते याबद्दल ते व्यक्त होऊ शकतात.

इतरांना नाही म्हणणे कधीकधी कठीण, परंतु आवश्यक असते. या अभ्यासाचा भाग म्हणून सुरू केलेल्या संवादात त्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करताना दुसर्‍यांना देखील माहिती विचारावी लागते.

हा अभ्यास सुरू करण्यासाठी, 'सामाजिक आव्हानांची एक यादी' तयार करा. प्रत्येक कार्डावर एक एक आव्हान लिहून त्या कार्डांचा एक गठ्ठा तयार करा. विशेषत्वाने किशोर वयात ज्या सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागते त्यांचा यामध्ये समावेश असावा. प्रत्येक विद्यार्थी त्यातील एक कार्ड निवडेल आणि पुढील दिवशी किंवा काही दिवसात ते आव्हान पार करेल - तुम्हाला उपलब्ध असलेल्या वेळेवर हे ठरेल.

सामाजिक आव्हानांची काही उदाहरणे खालील प्रमाणे:

  •   तुमच्या आवडत्या दुकानाच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधून तुम्हाला आवडलेल्या उत्पादनाबद्दल माहिती विचारा;
  •       वर्गमित्राबद्दल सहा नवीन गोष्टी शोधा किंवा
  •   एखाद्याची प्रामाणिकपणे प्रशंसा करा

एक महत्त्वाचा अंतिम टप्पा म्हणून, या आव्हानांना सामोरे जाताना कसे वाटले याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद करा. कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने ते स्वतःला व्यक्त करू शकले असते, प्रश्न विचारू शकले असते किंवा विनंती करू शकले असते? याबद्दल त्यांना विचार करायला सांगा.

Teaching Emotional Intelligence to Teens and Students (Incl. PPTs) (positivepsychology.com)

Emotional intelligence: why it matters and how to teach it | Teacher Network | The Guardian

Emotional Intelligence: What It Is and How to Apply It to Your Life (healthline.com)

MiddleWeb.com.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search