Search

लैंगिक अत्याचाराच्या प्रसंगातून सावरत असलेल्या मित्र/मैत्रिणीला मदत करणे

जेव्हा तुमच्या जवळचं कोणी तुम्हाला त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगते तेव्हा ते ऐकणे तुम्हाला जड जाऊ शकते. आपण काय बोलावे, त्यांना कसा आधार देणे सगळ्यात योग्य ठरेल याबद्दल तुमच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. लक्षात ठेवा की लैंगिक अत्याचारातून सावरण्याची प्रत्येक व्यक्तीची प्रक्रिया वेगळी असते. त्याला/तिला काय हवे आहे ते तुमच्या मित्राला/ मैत्रिणीला विचारा आणि त्यांच्या निर्णयांचा आदर करा.

जेव्हा तुमचा मित्र किंवा मैत्रिणी त्याच्यावर/ तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगते तेव्हा काय करावे याच्या सहा टिप्स येथे दिल्या आहेत.


१. तुमचा मित्र/ मैत्रीण सुरक्षित असल्याची खात्री करा

तुमच्या मित्राला कोणत्याही प्रकारचा तत्काळ धोका नाही ना? हे तपासा. विशेषत: जर ते लैंगिक हल्ल्यानंतर थोड्याच वेळात तुमच्याकडे मदतीसाठी आले असतील तर तुम्ही पोलिस किंवा रुग्णवाहिका बोलवण्याची त्यांना गरज असू शकते.

बहुतेक प्रकरणांमध्ये, आठवडे, महिने किंवा अगदी काही वर्षांपूर्वी लैंगिक अत्याचार झालेले असतात. काहीही असले तरी तू ठीक आहेस का? तू सुरक्षित आहेस का?' असे प्रश्न त्यांना विचारा.

जर ती व्यक्ती आत्महत्त्या करेल अशी काळजी तुम्हाला वाटत असेल तर अशा व्यक्तींच्या सुरक्षेसाठी निर्माण करण्यात आलेल्या सेवांना तुम्ही फोन करू शकता.

२. तुमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचे आभार माना

लैंगिक अत्याचाराबद्दल बोलण्यासाठी खूप धैर्य लागते.

नॉर्दर्न सिडनी लैंगिक अत्याचार सेवा कक्षातील वैद्यकीय संचालक एली फ्रीडमन म्हणतात: 'जर आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे कोणी तुम्हाला सांगत असेल तर तुमच्या नात्यात त्यांना सुरक्षित वाटते असा त्याचा अर्थ आहे. माणूस म्हणून आपल्याला सगळ्यांनाच असे वाटत असते की आपण तातडीने गोष्टी सुरळीत केल्या पाहिजेत पण त्या व्यक्तीने हे तुम्हाला सांगणे ही तिच्यासाठी मोठी गोष्ट होती आणि ती हे तुम्हाला सांगू शकली याचे तुम्हाला समाधान आहे हे ध्यानात ठेवा.

३. तुमच्या मित्राला सांगा की तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे

तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे हे तुमच्या मित्राला/ मैत्रिणीला समजणे महत्त्वाचे आहे.लैंगिक अत्याचार ही त्यांची चूक होती असे सुचवणारे काहीही करणे किंवा तसे बोलणे टाळणे देखील महत्त्वाचे आहे.

'अग पण त्या रात्री तू खरोखरच खूप दारू प्यायली होतीस' असे म्हणणे किंवा 'तू त्याच्यासोबत एकटी होतीस का?' असे बोचरे प्रश्न विचारणे यामुळे तुम्ही तिलाच दोष देत आहात असे तिला वाटू शकते.

जर ते स्वतःला दोष देत असतील तर त्यांना आश्वस्त करा की त्यांनी काहीही घातलेले असो, किंवा त्या दारू पीत असो किंवा त्या फ्लर्ट करत असो त्यांच्यावरील लैंगिक अत्याचार ही त्यांची चूक नाही. लक्षात ठेवा: जोपर्यंत तुम्ही स्पष्टपणे 'हो' म्हणत नाही तोपर्यंतच्या तुमच्या कोणत्याही वागण्याला संमती म्हणता येत नाही. तसेच लैंगिक कृत्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही पुढे जाण्यास नकार दिल्यानंतर घडलेले कोणतेही कृत्य तुमच्या संमतीशिवाय घडलेले असते.

४. तुमच्या मित्राला इतरांची मदत घेण्यासाठी प्रोत्साहित करा…

अशावेळी काय करावे हे तुम्हाला माहीत असेलच असे नाही. ते तुम्हाला माहीत नसेल तर तसे सांगा. पर्याय शोधण्यासाठी कदाचित तुम्हाला थोडा वेळ लागेल.

लैंगिक अत्याचारातून वाचलेल्यांसाठी, मोफत हेल्पलाईन, समुपदेशन या सारखी बरीच संसाधने उपलब्ध आहेत. तुम्ही एखाद्या डॉक्टरला किंवा स्थानिक रुग्णालयाला भेट देऊ शकता, ते देखील तुम्हाला योग्य लोकांपर्यंत पोचवू शकतात.

तुमच्या मित्राला त्वरित वैद्यकीय मदत किंवा आरोग्य तपासणीची आवश्यकता असू शकते. लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलिसांना द्यावी की नाही याबद्दल त्यांना खात्री नसल्यास,समुपदेशकाशी चर्चा करून निर्णय घेण्यात मदत होईल असे तुम्ही सुचवू शकता.

५. … त्यांना पुढील पायऱ्या ठरवू द्या

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुढे काय करायचे हे तुमच्या मैत्रिणीला ठरवू द्या, जरी तिचे मत तुमच्यापेक्षा वेगळे असेल तरी तो तिचा निर्णय आहे. त्यांना पुढे काय करायचे आहे आणि तुम्ही कशी मदत करू शकता हे त्यांना विचारा.

एली फ्रीडमन स्पष्ट करतात: " एखाद्याच्या इच्छेविरुद्ध, तिच्या संमतीशिवाय लैंगिक अत्याचार केले गेलेले असतात. त्यामुळे आपण त्यांना परिस्थितीवर शक्य तितका ताबा मिळवू देण्यासाठी मदत केली पाहिजे. बऱ्याचदा इतरांना असे वाटते की त्यांना सल्ला देण्याची गरज आहे आणि "तुम्हाला पोलिसांकडे जावे लागेल" किंवा "तुम्हाला रुग्णालयात जावे लागेल" अशा गोष्टी ते सांगतात.'

परंतु, तुमच्या मित्राला पर्याय द्या. ' तुला पोलिसांकडे जायचे आहे का? ?' किंवा 'तुला रुग्णालयात जायचे आहे का?' असे विचारा. यामुळे त्यांना स्वतःचा निर्णय स्वतः घेता येतो आणि आयुष्यावर ताबा मिळवायला त्याची मदत होते.

६. स्वतःची काळजी घ्या

लैंगिक अत्याचाराच्या किंवा गैरवर्तनाच्या परिणामांना सामोरे जाणार्‍या आपल्या प्रिय व्यक्तीला बघणे खरोखर कठीण, त्रासदायक असू शकते तुम्हाला चिंता, दडपण किंवा राग येऊ शकतो. अशावेळी, तुमच्या विश्वासातील एखाद्या व्यक्तीशी बोला, जसे की कुटुंबातील व्यक्ती किंवा समुपदेशक, किंवा आधार देणार्‍या सेवेशी संपर्क साधा. आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी करण्यासाठी वेळ काढा.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search