आत्महत्या म्हणजे काय?
आत्महत्या म्हणजे स्वतःचे आयुष्य स्वतः संपवणे. कधीकधी काही लोकांना यातना किंवा दुःख यातून बाहेर पडण्याचा हा एक मार्ग वाटतो. जेव्हा कोणी स्वतःचे आयुष्य संपवते, तेव्हा आपण म्हणतो की त्या व्यक्तीने "आत्महत्या केली." एखाद्या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून ती वाचली तर त्याला आपण 'आत्महत्येचा प्रयत्न' असे म्हणतो.
मी आत्महत्त्येचा विचार करत असेन तर मी काय करू शकतो/ शकते?
आत्महत्त्येचा विचार करणे भीतीदायक आहे. ज्या भावनांचा सामना करणे कठीण वाटते अशा तीव्र भावना तुम्हाला जाणवत असू शकतात, परिस्थिती कधीच सुधारणार नाही असे तुम्हाला वाटू शकते, परंतु अशा परिस्थितीतून जाणारे तुम्ही एकटे नाही. बऱ्याच लोकांच्या मनात आत्महत्त्येचा विचार येत असतो. परंतु तुम्ही आत्महत्त्येचा विचार केला म्हणजे तुम्ही आत्महत्त्या करालच असा त्याचा अर्थ नाही. किंवा तुम्ही 'वेडे' झाले आहात असाही त्याचा अर्थ होत नाही. आत्महत्त्येचा विचार करणे हे बर्याचदा तुम्हाला परिस्थितीपासून सुटका हवी असण्याचे लक्षण आहे.
तुम्हाला बरं वाटण्याचे अनेक मार्ग आहेत. लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही. कोणाशीतरी बोलून तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्याशी किंवा विश्वासू मित्राशी बोलू शकता. तुम्ही हेल्पलाईनला देखील कॉल करू शकता. तुम्ही जर डॉक्टर किंवा समुपदेशक यांच्या संपर्कात असाल तर तुम्हाला कसे वाटते आहे ते त्यांना सांगा. आत्महत्त्येचा विचारांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये ते तुम्हाला शिकवतील.
मी स्वतःला आत्महत्त्येपासून कसे वाचवू शकतो/ शकते?
आपल्या मनात आत्महत्त्येचे विचार कधीच येणार नाहीत असे कोणीही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. आत्महत्त्या रोखण्यासाठी तुम्ही दोन महत्त्वाच्या गोष्टी करू शकता. पहिली म्हणजे इतर लोकांशी चांगले नातेसंबंध निर्माण करणे. दुसरी म्हणजे मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी मदत शोधणे.
1. इतर लोकांशी नातेसंबंध निर्माण करणे.
आपण इतर अनेक लोकांशी जोडलेले आहोत ही भावना स्वतःला आत्महत्येपासून वाचवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नातेसंबंध तयार करण्याचे काही मार्ग खाली दिले आहेत.
कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा.
सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रमांना जा.
तुमच्या समाजातील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. उदाहरणार्थ, तुमच्या गावातील किंवा महाविद्यालयातील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा.
इतरांना मदत करा. सामाजिक काम करा.
2. मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी लवकर मदत घेणे
मानसिक आरोग्याच्या समस्या हे आत्महत्येचे एक प्रमुख कारण आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी लवकर मदत शोधून तुम्ही स्वतःला वाचवू शकता.
मानसिक आरोग्य समस्यांची साधारण लक्षणे खालीलप्रमाणे असतात -
- आपल्याला कशानेही आनंद होत नाही असे वाटणे.
- अनेक आठवडे सलग खूप दुःखी किंवा निराश वाटणे.
- तुमच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींचा तुम्ही सामना करू शकत नाही असे वाटणे.
- अनेक आठवडे सलग खूप तणाव किंवा भीती वाटणे.
- विचित्र गोष्टी किंवा विचार मनात येणे व मनातून न जाणे. काही लोकांना इतरांना ऐकू न येणारे आवाज ऐकू येतात.
- नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त झोप.
- नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त खाणे.
- दारू किंवा इतर अमली पदार्थांच्या वापराचे प्रमाण वाढणे.
- कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत गैरहजर राहणे.
- कुटुंब आणि मित्रांना टाळणे.
- सारखं बरं नसल्यासारखं किंवा आजारी असल्यासारखे वाटणे.
तुम्हाला ही चिन्हे दिसल्यास तुमच्या डॉक्टरांशी बोला. तुमचे डॉक्टर तुम्हाला मदत करतील.
आत्म्हत्त्येच्या धोक्याची सूचना देणारी लक्षणे कोणती?
काही लोक आत्म्हत्त्येच्या विचारांबद्दल उघडपणे बोलतात, परंतु बरेच लोक त्यांच्या भावना बोलून दाखवत नाहीत.पुढे धोक्याची काही लक्षणे दिली आहेत. त्यावरून त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे हे कळते. बर्याचदा एकाच वेळी धोक्याची अनेक लक्षणेदेखील दिसू शकतात. काही लक्षणे पुढीलप्रमाणे.
- व्यक्ती स्वत:ला मारून टाकावेसे वाटण्याबद्दल बोलते.
- व्यक्ती नेहमीपेक्षा जास्त मादक पदार्थ किंवा दारू घेते.
- जगण्यासाठी कोणतेच कारण नाही असे म्हणते.
- व्यक्ती खूप घाबरलेली किंवा चिंताग्रस्त दिसते.
- परिस्थितीतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही असे वाटते आहे असे म्हणणे.
- व्यक्तीला भविष्यात कोणतीही आशा दिसत नाही.
- व्यक्तीला इतरांसोबत वेळ घालवावा असे वाटत नाही.
- व्यक्तीला स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते.
- परिणामांचा विचार न करता धोकादायक असू शकेल अशी गोष्ट करणे.
- व्यक्तीचा मूड मोठ्या प्रमाणात बदलतो.
आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीला मी कशी मदत करू शकतो?
जर तुम्हाला दुसर्या कोणाची काळजी वाटत असेल तर त्याच्याशी/ तिच्याशी आत्महत्त्येबद्दल बोलणे महत्वाचे आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर आत्महत्त्येबद्दल बोलल्याने त्यांना आत्महत्त्येचा विचार सुचणार नाही. तुम्ही त्या व्यक्तीला कशी मदत करू शकता हे लक्षात येण्यासाठी आधी त्याबद्दल बोलणे आवश्यक आहे.
त्या व्यक्तीला लवकरच स्वतःचे जीवन संपवायचे आहे का? किंवा तिने त्यासाठी काही नियोजन केले आहे का हे विचारून बोलण्याची सुरवात करा.
जर तिला लवकरच जीवन संपवायचे असेल आणि तिने तसे नियोजन केले असेल तर ही अगदी आणीबाणीची परिस्थिती आहे. समोरच्या व्यक्तीला एकटे सोडू नका. आत्महत्त्या हेल्पलाईन नंबर 1800-784-2433 वर कॉल करा. तुम्हाला गरज असल्यास ते आपत्कालीन परिस्थितीत काम करणार्या लोकांना पाठवू शकतात. तुम्ही जाऊ शकता असे हेल्पलाईनच्या लोकांनी सांगेपर्यंत त्या व्यक्तीला एकटे सोडू नका.
जर त्यांनी आयुष्य संपवण्याचे नियोजन नसेल तरीदेखील त्यांना इतर मदतीची गरज आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेऊन मदत करू शकता. मदतीचे इतर मार्ग शोधण्यासाठी तुम्ही त्यांना सहाय्य करू शकता.
1. ऐकून घ्या.
बर्याच लोकांना असे वाटते की ते त्यांच्या वेदनेचा एकट्याने सामना करत आहेत. त्यांचे ऐकण्यामुळे ते एकटे नाहीत ही भावना आपण त्यांच्या मनात जागी करू शकतो. तुम्ही फक्त त्यांच्यासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे त्या खालील प्रमाणे
- समोरच्या व्यक्तीला गांभीर्याने घ्या. त्यांना वेदना होत आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे.
- मनातील बोलण्यासाठी तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात हे त्या व्यक्तीला जाणवून द्या. त्यांचाविषयी मत बनवू नका किंवा त्यांची थट्टा करू नका.
- विश्वास खूप महत्वाचा आहे. अवाजवी आश्वासने देऊ नका.
- त्यांच्या समस्येचे गांभीर्य तुम्हाला कळले आहे हे जाणवून द्या. "चीअर अप" किंवा "सकारात्मक विचार करा" यासारखा सल्ला देऊ नका.
- 'तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस; तू मरावे असे मला वाटत नाही' असे त्यांना सांगा. किंवा ‘तुला असं वाटतेय हे ठीक आहे परंतु आपण मिळून यातून बाहेर पाडण्याचे मार्ग शोधू शकतो.’ असेही तुम्ही म्हणू शकता.
2. त्यांना आधार देऊ शकतील अशा व्यक्तींशी व सेवांशी त्यांना जोडून द्या.
ते त्यांच्या भावनांबद्दल कोणाशी बोलू शकतात का ते विचारा. उदाहरणार्थ, कुटुंबातील सदस्य, मित्र, डॉक्टर किंवा समुपदेशक. तुम्ही त्यांना आत्महत्त्या प्रतिबंधक हेल्पलाईनचा फोन नंबर देखील देऊ शकता. जे लोक हेल्पलाईन चालवतात त्यांना इतरांना मदत कशी करावी याचे प्रशिक्षण दिलेले असते.
लक्षात ठेवा, तुम्ही समुपदेशक व्हावे अशी कोणाचीही अपेक्षा नाहीये.
तुम्हाला तुमच्याबद्दल किंवा इतर व्यक्तीबद्दल काळजी वाटत असल्यास, खाली दिलेल्या हेल्पलाईनला कॉल करा. जर तुम्हाला वाटत असेल की कोणाचा तरी जीव धोक्यात आहे, तर पोलिसांना किंवा रुग्णवाहिकेला फोन करा.
आत्महत्त्या – समज आणि वस्तुस्थिती
- समज: आत्महत्त्या ही सर्वसाधारणपणे आढळणारी बाब नाही.
- वस्तुस्थिती: जवळजवळ दररोज कोणीतरी आत्महत्त्या करून स्वतःचा जीव संपवतो.
- समज: आत्महत्त्येचा विचार करणे ही सर्वसामान्य बाब नाही.
- वस्तुस्थिती: दर नऊ लोकांपैकी एक जण कधीना कधी आत्महत्त्येचा विचार करतो.
- समज: ज्याला आत्महत्त्या करून मरण्याची इच्छा आहे, त्याला स्वखुषीनेच मरायचे असते.
- वस्तुस्थिती: जे लोक आत्महत्त्या करून मरतात त्यांना आपले जीवन संपवायचे असतेच असे नाही. त्यांना त्यांच्या आयुष्यातील वाईट गोष्टींपासून सुटका मिळवायची असते. त्यांना दुसरे काय करावे हे माहित नसते.
- समज: जे लोक आत्महत्त्येचा प्रयत्न करतात त्यांना फक्त लोकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधून घ्यायचे असते.
- वस्तुस्थिती: आत्महत्त्येचा प्रयत्न हे दर्शवितो की त्या व्यक्तीला मदतीची आवश्यकता आहे. जे लोक आत्महत्त्येचा प्रयत्न करतात त्यांना अनेकदा असे वाटते की त्यांचा त्रास थांबवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यांच्या भावना खूप खर्या असतात आणि त्यांच्याशी सामना करणे त्यांना खूप कठीण जाते.
- समज: जे लोक आत्महत्त्येच्या प्रयत्नातून वाचतात ते पुन्हा कधीही त्यांचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करत नाहीत.
- वस्तुस्थिती: आत्महत्त्येने मरण पावलेल्या बहुतेक लोकांनी त्यापूर्वीही आत्महत्त्येचा प्रयत्न केलेला असतो.
- समज: केवळ मानसिक आजार असलेले लोकच आत्महत्त्येचा विचार करतात.
- वस्तुस्थिती: आत्महत्त्येचा विचार करण्यासाठी तुम्हाला मानसिक आजार असण्याची गरज नाही. काही लोक आत्महत्त्येचा विचार करतात कारण त्यांना आणखी काय करावे हे माहित नसते. पण आत्महत्त्येचा प्रयत्न करणारे किंवा आत्महत्त्येने मरणारे अनेक लोक मानसिक आजाराने ग्रस्त असतात हे सुद्धा खरे आहे. त्यांना कदाचित त्यावेळी हा मानसिक आजार आहे हे माहित नसते.
- समज: आत्महत्त्येबद्दल बोलणे लोकांना आत्महत्त्या करण्यासाठी प्रोत्साहित करेल.
- वस्तुस्थिती: आत्महत्त्येबद्दल बोलण्याने लोक आत्महत्त्या करण्यासाठी प्रवृत्त होत नाहीत. आत्महत्त्येबद्दल प्रामाणिकपणे बोलणे हा एखाद्याला मदतीची गरज आहे का हे ओळखण्याचा एक चांगला मार्ग आहे. आत्महत्त्येबद्दल बोलण्याने ती होण्याचा धोका कमी होतो.
मला प्रिय असणार्या व्यक्तीचा आत्महत्त्येने मृत्यू झाला तर?
एखाद्या प्रिय व्यक्तीला आत्महत्त्येमुळे गमावणे खूप कठीण असू शकते. तुम्ही त्यांना अजून मदत करू शकला असता असे तुम्हाला वाटू शकते. कधीकधी तुम्हाला हे का घडले हेच समजत नाही. तुम्हाला लाज वाटू शकते आणि राग येऊ शकतो. या भावना असतातच आणि त्याचवेळी आत्महत्त्येविषयी काही माहीत नसलेले लोक तुमच्याशी वेगळे वागू शकतात.
कोणाची आत्महत्त्या ही आपली चूक नाही हे ध्यानात घ्या. एखाद्याच्या आयुष्य संपवण्याच्या निर्णयात बऱ्याच गोष्टी सामील असतात.
मृत्यूमुळे झालेली हानी सहन करण्याची ताकद येण्यासाठी खाली काही उपाय दिले आहेत.
- मनात वेगवेगळ्या भावना येणे स्वाभाविक आहे. तुमच्या भावना खऱ्या आहेत हे स्वतःला सांगा.
- तुमचे कुटुंब आणि मित्र यांच्याशी बोला. प्रत्येकाला त्यांच्या भावना व्यक्त करू द्या.
- काही लोकांना तुम्हाला कशी मदत करावी हे माहित नसेल. तुम्हाला काय हवे आहे ते त्यांना सांगणे उचित ठरेल.
- आधारगट शोधा. आत्महत्त्या करून प्रिय व्यक्ती गमावलेल्या इतर लोकांशी बोलणे उपयुक्त ठरू शकेल.
- लक्षात ठेवा की बरे होण्यास वेळ लागतो. तुम्ही तुम्हाला आवश्यक आहे तितका वेळ घेऊ शकता.
- तुम्हाला अर्थपूर्ण वाटणार्या पद्धतीने तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आयुष्याचा सन्मान करा.
तुम्हाला परिस्थितीचा सामना करणे अवघड जात असेल तर समुपदेशकांशी बोला.
खाली भारतातील काही आत्महत्त्या प्रतिबंधक हेल्पलाईन दिल्या आहेत. या तुम्हाला माहीत हव्या.
तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूचे कोणीही, जे तणावपूर्ण काळातून जात आहेत आणि ज्यांची आत्महत्त्या करण्याची प्रवृत्ती आहे , असे लोक अडचणींमध्ये मदत करणाऱ्या या संस्थांना फोन करून मदत घेऊ शकता. तुम्ही या संस्थांना देशातून कुठूनही फोन करू शकता.
आसरा –
मुंबईमध्ये असणार्या या संस्थेची 24 तास चालणारी विनमूल्य हेल्पलाइन आहे. प्रशिक्षित समुपदेशक फोनला उत्तर देण्यासाठी उपलब्ध असतात. हिंदी आणि इंग्रजी भाषेत इथे समुपदेशन उपलब्ध आहे. हेल्पलाईन क्रमांक: +91 98204 66726
फोर्टिस स्ट्रेस हेल्पलाइन
ही 24 तास चालणारी हेल्पलाइन आहे. ज्यांना तणाव,परीक्षा आणि शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित मानसिक आरोग्याच्या अडचणी आहेत अशा विद्यार्थी आणि पालकांसाठी ही सेवा आहे. इंग्रजीतून तसेच प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये संभाषण करू शकेल अशी एक मानसिक आरोग्य तज्ज्ञांची टीम इथे आहे. तुम्ही mindhealth@fortishealthcare.com या मेल आय डी वर लिहूही शकता.
हेल्पलाईन क्रमांक: +9183768 04102
परिवर्तन
बेंगळुरूस्थित परिवर्तनच्या समुपदेशन केंद्रात एक हेल्पलाइन क्रमांक आहे जिथे कोणीही कॉल करू शकतो. व्यावसायिक आणि प्रशिक्षित समुपदेशकांशी संपर्क साधू शकतो, जे इंग्रजी, कन्नड आणि तमिळ भाषेत संवाद साधू शकतात. हेल्पलाईन क्रमांक सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते रात्री 10 पर्यंत चालू असतो. ऑनलाईन समुपदेशन सत्रे देखील उपलब्ध आहेत. जर एखाद्याला त्याची आवश्यकता असेल तर तुम्ही त्यांना parivarthanblr@gmail.com वर ईमेल करू शकता
हेल्पलाईन क्रमांक: +91 76766 02602
कूज मेंटल हेल्थ फाउंडेशन
ह्या गोवा स्थित मानसिक आरोग्य संस्थेकडे ई-समुपदेशन तसेच आत्महत्त्या प्रतिबंध हेल्पलाइन असे दोन्ही क्रमांक आहेत. सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते संध्याकाळी 7 दरम्यान या सेवा फोनवर उपलब्ध आहेत. ई-समुपदेशनासाठी, youmatterbycooj@gmail.com वर ईमेल पाठवू शकता. हे
ल्पलाईन क्रमांक: +832 2252525
स्नेहा फाउंडेशन इंडिया
स्नेहा ही चेन्नई येथे काम करणारी आत्महत्त्या प्रतिबंधक संस्था आहे. Help@snehaindia.org वर ईमेल द्वारे त्यांच्याशी संपर्क साधता येईल. त्यांचा सुसाइड हेल्पलाईन नंबर सर्व दिवस सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत उपलब्ध असतो.
एकदा चेन्नईमध्ये निर्बंध आणि लॉकडाऊन उठले की हा नंबर 24*7 उपलब्ध असेल.
हेल्पलाईन क्रमांक: 044-24640050
आयकॉल सायको सोशल हेल्पलाईन
iCall ही ईमेल आणि टेलिफोन-आधारित समुपदेशन सेवा आहे. ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सद्वारे चालविली जाते. पात्र आणि प्रशिक्षित मानसिक आरोग्य व्यावसायिकांच्या टीमच्या मदतीने ते मोफत सेवा देतात. ते सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 दरम्यान उपलब्ध असतात.
हेल्पलाईन क्रमांक: +91 22 2552111 आणि +91 91529 87821
वांद्रेवाला फाउंडेशन
वांद्रेवाला फाउंडेशन येथे चोवीस तास प्रशिक्षित सल्लागार आहेत. त्यांच्या 24x7 हेल्पलाईन नंबर व्यतिरिक्त, त्यांना help@vandrevalafoundation.com वर ईमेल देखील करता येईल.
हेल्पलाईन क्रमांक: +91 730 459 9836, +91 730 459 9837 आणि 1860 2662 345
द समरिटन्स मुंबई
समरिटन्स मुंबईने तणावग्रस्त, व्यथित, निराश किंवा आत्महत्त्या करत असलेल्यांना आधार देण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवक आणि व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले आहे. संपूर्ण आठवड्यात संध्याकाळी 5 ते रात्री 8 दरम्यान तुम्ही त्यांच्या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकता किंवा talk2samaritans@gmail.com वर ईमेल करू शकता. ते विनामूल्य व्यावसायिक सेवा देखील देतात. अपॉइंटमेंट सेट करण्यासाठी तुम्ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान त्यांच्याशी संपर्क साधू शकता.
हेल्पलाईन क्रमांक: +91 84229 84528, +91 84229 84529 आणि +91 84229 84530