सोशल मीडिया म्हणजे काय?
एखादा डिजिटल प्लॅटफॉर्म, सिस्टम, वेबसाइट किंवा अॅप यांचा वापर करून लोक माहिती तयार करतात, एकमेकांना पाठवतात व त्या मार्फत एकमेकांच्या संपर्कात राहतात. त्यांना समाज माध्यमे म्हटले जाते. आपली किशोरवयीन मुले समाज माध्यमांचा इतका वापर का करतात हे समजणे पालकांना अनेकदा कठीण जाते. पालकांना वाटते की ती नेहमी ऑनलाइन राहतात आणि समोर प्रत्यक्ष घडणार्या आयुष्यामध्ये पुरेसा सहभाग घेत नाहीत. समाज माध्यमे हा किशोरवयीन मुलांचा त्यांच्या मित्रांशी संपर्कात राहण्याचा एक मार्ग आहे. समाज माध्यमे येण्याच्या आधी मुलं शाळेनंतर बस स्टॉपवर, बागेमध्ये, फोनवर त्यांच्या मित्रांबरोबर बोलत असत, आता त्यांना अजून एक माध्यम मिळालं आहे.
- फेसबूक
ही एक विनामूल्य साइट आहे. तेरा वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाचे नोंदणीकृत वापरकर्ते येथे त्यांच्या मित्रांबरोबर चित्रे, लिंक, व्हिडिओ आणि अन्य माहिती शेअर करू शकतात. हे नोंदणीकृत वापरकर्ते एकमेकांना मित्र बनवतात. असे करता करता परिचितांचे एक जाळे तयार होते. बर्याच वेळा, आपण फेसबुकवर शेअर केलेली गोष्ट आपल्या फेसबुकच्या मित्रयादीत असलेल्या लोकांनाच दिसते. फेसबुक नियमितपणे गोपनीयतेबद्दलची सेटिंग्ज बदलत असते म्हणून त्याची सेटिंग्ज आणि धोरणे याबद्दल आपण अद्ययावत रहाणे महत्वाचे आहे.
- इंस्टाग्राम
ही एक फोटो शेअर करण्याची विनामूल्य सुविधा आहे, जी मुख्यतः मोबाइलवरुन वापरली जाते. इतर समाजमाध्यमांप्रमाणेच इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण ओळख नसलेल्या परंतु समान आवडीनिवडी असलेल्या लोकांना जोडून घेऊ शकतो. आपले इंस्टाग्राम खाते सार्वजनिक किंवा खाजगी असू शकते, ज्यावर फक्त आपले इंस्टाग्राम वरील मित्रच आपली पोस्ट पाहू शकतात. इन्स्टाग्रामची स्वतःची गोपनीयता सेटिंग्ज देखील आहेत.
- स्नॅपचॅट
हे एक मोबाइल फोन मध्ये वापरण्याचे संदेशवहन अॅप आहे. याद्वारे एकावेळी एका किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना फोटो किंवा व्हिडिओ पाठवता येतात. संदेश पाठवणारी व्यक्ती हे संदेश किती वेळ दिसावेत याचे नियोजन करू शकते. त्याप्रमाणे हे संदेश फक्त काही सेकंद एवढा कमी वेळ देखील दिसू शकतात. तरीपण फोन मधील इतर क्लुप्त्या वापरुन हे फोटो जतन करता येतात.
- टंब्लर
ही एक ब्लॉगिंग वेबसाइट आहे. येथे लोक त्यांचे स्वतःचे लेख प्रकाशित करून, त्यांचा ब्लॉग किंवा प्रोफाइल फॉलो करणार्या लोकांबरोबर ते शेअर करू शकतात. ते ज्या लोकांना फॉलो करतात त्यांचे लेखन बघू शकतात. टंब्लरवर, सामान्यपणे ओळखीच्या लोकांपेक्षा अनोळखी लोकांशी संपर्क साधला जातो.
- व्हॉट्सअॅप आणि मेसेजिंग सेवा
व्हॉट्सअॅप आणि मेसेजिंग द्वारे आपण आपल्या मित्रांबरोबर संपर्कात राहू शकतो. यासाठी इंटरनेट डेटा (किंवा वायफाय)चा वापर करावा लागतो, त्यामुळे खर्च कमी होतो. वायफाय नेटवर्कच्या कक्षेत असल्यास सिम कार्डशिवाय त्याचा वापर करता येतो. यामार्फत आपण मित्रांच्या गटाला एकाच वेळी संदेश पाठवू शकतो त्यामुळे हे लोकप्रिय आहे.
- इतर खेळ आणि साइट्स
यूट्यूब, क्लब पेंग्विन किंवा वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट सारख्या ऑनलाइन गेमना सुद्धा समाज माध्यमे मानले जाते कारण त्यांच्यामुळे बर्याच सामाजिक आंतरक्रीय घडून येतात.
किशोरवयीन मुलांसाठी समाज माध्यमे हा मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहण्याचा एक मार्ग आहे. समाज माध्यमांच्या आधीपासून मुलं शाळेजवळ, बसस्टॉपवर, बागेत, फोनवर एकमेकांशी गप्पा मारत रेंगाळायची . आता त्यांना अजून एक माध्यम मिळालले आहे.
आधुनिक जगात सामाजिकरण आणि संपर्काचे हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. प्रामुख्याने खालील कारणांसाठी किशोरवयीन मुले नियमितपणे समाज माध्यमांचा वापर करतात.
मित्रांशी बोलण्यासाठी
गटातील संभाषणामध्ये सहभाग घेण्यासाठी
सध्या घडणार्या घटनांची माहिती घेण्यासाठी किंवा ऑनलाइन जगात मिळणारी माहिती अद्यावत ठेवण्यासाठी.
नवीन लोकांना भेटण्यासाठी
काही करण्यासारखे नसेल तर किंवा कंटाळा आला आहे म्हणून
सोशल मीडियावर नेहमी राहिलं नाही तर आपण काही तरी गमावू अशी भावना.
आपल्या मुलाच्या मानसिक विकासासाठी सामाजिक जोडलेपण खूप महत्वाचे आहे. समाज माध्यमांवर याची बरीच संधी मिळते. समाज माध्यमांद्वारे इतरांशी संपर्क साधून, आपले मूल पुढील गोष्टी करू शकते:
चांगले सामाजिक कौशल्य विकसित करणे.
एकटेपणा कमी करणे.
नवीन सांस्कृतिक आणि सामाजिक कल्पना आणि विषयांबद्दल जाणून घेणे.
मैत्री घट्ट होणे.
मजा करणे.
सर्जनशील होणे आणि स्वतःच्या कल्पना मित्रांबरोबर शेअर करणे.
सक्रिय नागरिक होण्यासाठी सुसज्ज होणे.
जगात जगताना लागणारी कौशल्ये विकसित करून त्यामार्फत स्वतंत्र होण्यास मदत होणे.
जागतिक घटना आणि चालू घडामोडी याविषयी जाणून घेणे.
कोणत्याही सामाजिक संबंधांप्रमाणेच समाज माध्यमांमध्येदेखील धोके आहेत:
सोशल मीडियावरती जास्त वेळ घालविल्यामुळे वास्तवातील जगाशी संपर्क तुटणे.
ऑनलाइन गुंडगिरीला बळी पडणे.
ऑनलाइन प्रतिष्ठेला धोका निर्माण होणे.
वैयक्तिक माहीत ऑनलाइन शेअर होणे.
नकोशा व्यक्तीकडून छळ किंवा त्रास होणे.
ऑनलाइन घोटाळ्याला बळी पडणे.
स्व-प्रतिमा ढासळणे (काही किशोरवयीन मुलांसाठी)
जसे वास्तवामध्ये आपल्या मुलाला धोक्यापासून वाचविण्यासाठी आपण काही गोष्टी करतो तसेच त्यांना ऑनलाइन जगातील धोक्यापासून वाचवण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो. जर वरील गोष्टी घडल्या तर त्यांना कसा प्रतिसाद द्यावा यासाठी मुलांना तयार करणे महत्वाचे आहे.
कधीकधी किशोरांना त्यांची समाज माध्यमावरील खाती वारंवार बघण्याची 'सक्ती' वाटू शकते, परंतु हे केवळ काही प्रकरणांमध्येच होते. आपल्या किशोरवयीन मुलास समाज माध्यमे वापरण्यापासून नियमित ब्रेक घेण्यासारख्या सवयी विकसित करण्यासाठी मदत करा. नोटिफिकेशन बंद केली आहेत याची खात्री करुन घ्या,जेणेकरून त्यांचे चित विचलित होणार नाही व समाज माध्यमे वारंवार तपासण्याची त्यांची सवय कमी होईल.
आपली मुले काहीही करत असली तरी ती नीट वागताहेत ना व ती बरी आहेत ना याकडे आपले लक्ष असले पाहिजे. खालील गोष्टीत मोठे बदल दिसले तर सावध व्हावे.
रोजच्या जीवनातील त्यांची ऊर्जा आणि उत्साह.
सामान्य संभाषणामध्ये सहभाग.
इतर गोष्टी करण्यासाठी ते घालवत असलेला वेळ. जसे की खेळ, अभ्यास आणि इतर छंद
त्यांचा आत्मसन्मान आणि स्वत:चे मूल्य जाणण्याची भावना
असे जाणवले तर त्यांच्याशी समाज माध्यमांच्या वापराबद्दल बोलावे. स्क्रीन ऑडिटची मदत घेऊन आपण घरातील सर्वांनी स्क्रिनचा वापर करण्यासंबंधीचे नियम देखील ठरवू शकतो.
खेळ, संगीत, संगणकाचे भाग सुटे करून जोडणे, स्वयंसेवक म्हणून काम करणे अशा आवडीच्या कोणत्याही गोष्टीत भाग घेतल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढू शकतो. त्यांना ज्यात रस आहे आणि ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो अशी कोणतीही गोष्ट चालेल. ते कसे दिसतात आणि त्यांच्या मालकीच्या किती वस्तू आहेत याच्यापेक्षा त्यांना काय काय करता येते यामुळे जर त्यांचा आत्मविश्वास वाढला तर ती जास्त आनंदी राहतात व त्यांच्या भविष्याची अधिक चांगली पायाभरणी होते.
बाल आणि किशोरवयीन मुलांसाठी समाज माध्यमांच्या धोक्याचे व्यवस्थापन करणे
समाज माध्यमांच्या वापराबद्दल बोलणे
बोलणे हा आपल्या मुलाला समाजमाध्यमांच्या जोखमीपासून वाचविण्याचा आणि त्यांची इंटरनेट सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा उत्तम मार्ग आहे. बोलण्यातून आपल्याला मुलांना मदत करण्याची संधी मिळते:
ऑनलाइन जगात त्यांनी इतरांशी व इतरांनी त्यांच्याशी कसे वागावे असे त्यांना वाटते? याबद्दल चर्चा करा. उदाहरणार्थ, तुम्ही त्यांना केवळ सकारात्मक टिप्पणी करण्यास प्रोत्साहन देऊ शकता.
समाज माध्यमांचा वापर करण्यातील धोके समजावून सांगा. - उदाहरणार्थ, तिला/ त्याला पार्टीत घेतलेल्या लाजिरवाण्या फोटोमध्ये टॅग केले जाऊ शकते
धोका कसा कमी करावा ते जाणून घ्या - उदाहरणार्थ, जर तुमच्या मुलाने एखादा सेल्फी टाकला असेल तर त्याच्यासोबत इतर कोणत्याही वैयक्तिक माहितीचा समावेश न करता ते धोका कमी करू शकतात.
ऑनलाइन वावरताना लोकांनी वैयक्तिक तपशील विचारले, तुमच्या मुलाचे लाजीरवाणे फोटो टाकले पोस्ट करतात किंवा त्याच्याकडे निर्देश करणारी काही माहिती शेअर केली तर अशावेळी काय करावे ते शिका.
सोशल मीडियाबद्दल अधिक माहिती शोधत राहणे.
समाज माध्यमे आणि त्यांचा वापर करण्याची पद्धत यात सतत बदल होत असतो. त्यामुळे आपले मूल जे समाज माध्यम वापरते त्या बद्दलची अद्ययावत माहिती नेहमी मिळवत राहायला हवी. कोणती समाज माध्यमे लोकप्रिय आहेत आणि तुमचे मूल त्यापैकी कोणती समाज माध्यमे वापरते याची माहिती घ्या. ते समाज माध्यम कसे वापरायचे हे तुम्ही तुमच्या मुलकडूनच शिकू शकता.
वयाच्या शिफारसींविषयी विचार करणे
बर्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वयाचे बंधन असते, जे बहुतेकदा लागू केले जात नाही. तुमच्या मुलाच्या मैत्रिणी वय पूर्ण नसताना ते विशिष्ट समाज माध्यम वापरत असतील व तेच तुमच्या मुलाला पण वापरायची इच्छा असेल ती परिस्थिती हाताळणे थोडे अवघड होऊ शकते.
तुम्हाला तुमच्या मुलाला त्याचे योग्य वय होईपर्यंत थांबवायचे असेल तर पुढे काही पर्याय सुचवले आहेतः
तुम्ही तडजोड करू शकता का? जर समाज माध्यमावर एक कौटुंबिक खाते उघडले व तुमच्या मुलाचे वय पूर्ण होईपर्यंत त्याने ते खाते वापरले तर काय होईल? समाज मध्यमवरील त्या खात्याचा वापर करून तुमच्या मुलाला मित्र- मैत्रिणींच्या संपर्कात राहता येईल.
यू ट्यूब किड्स किंवा मेसेंजर किड्स सारखी मुलांसाठी अनुकूल समाज माध्यमे आपले मूल वापरू शकेल का ? येथे त्यांच्या वयाला साजेसे कार्यक्रम व घडामोडी होतात. तसेच यांची सेटिंग्ज अधिक सुरक्षित असतात.
समाज माध्यमे हा आपल्या वातावरणाचा अविभाज्य भाग बनत आहेत. संपर्क, शिकणे, खेळ, माहिती, अशा अनेक गोष्टींसाठी समाज माध्यमे मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत, त्यामुळे त्यावर बंदी घालणे कठीण आहे. समजा बंदी घातली तरी मुलांना तुमच्यापासून लपवून त्याचा वापर करण्याचा मोह होऊ शकतो. बंदी घालून आपण समाज माध्यमांवर कसे व्यक्त व्हावे आणि तेथील धोक्यांचे व्यवस्थापन कसे करावे हे मुलाला शिकवण्याची संधी गमावतो.
धोका ओळखणे, धोकादायक परिस्थिती हाताळणे आणि आपला डेटा तसेच खाजगीपणा सुरक्षित राखणे हा इंटरनेटविषयक सुरक्षिततेचा महत्त्वाचा भाग आहे.
परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्याची तंत्रे त्यांना शिकवा: दुःख कमी करण्यासाठी म्हणून जेव्हा समाज माध्यमांचा वापर केला जातो तेव्हा त्याचा तत्काळ नकारात्मक परिणाम होतो आणि मुलाला अधिकच रितेपणा,मत्सर आणि निराशा जाणवते. परिसस्थितीशी सामना करण्याच्या प्रभावी तंत्रांमुळे त्रास, दुःख यापासून पळ काढण्याऐवजी त्याला सामोरे जाणे, त्यावर मात करणे, परिस्थितीशी जुळवून घेणे शिकता येते. शारीरिक व मानसिक स्तर उंचविण्यासाठीचा छंद जोपासणे, ध्यान करणे, दूरवर रपेट मारणे किंवा एखाद्या तज्ञ व्यक्तीबरोबर वेळ घालवणे या माध्यमांतून ताणाचा निचरा होतो आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मदत मिळते. सकारात्मक वर्तनातून समस्या सोडवण्याचे दिशदिग्दर्शन देखील यामुळे मिळते.
- मुलांच्या स्क्रीन टाइमचे व्यवस्थापन करणे: माहिती आणि मनोरंजनाचा ऑनलाइन स्रोत म्हणून इंटरनेट वापरले पाहिजे. परंतु सतत समाजमाध्यमे वापरायची सवय लागली तर इतर कशाचा विचार करणे किंवा इतर गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणे अशक्य बनत जाते. जेव्हा हात आणि विचार पडद्यावर आणि ऑनलाइन जगावर केंद्रित असतात तेव्हा एखाद्या व्यक्तीने वास्तविक जगात काही करावे अशी अपेक्षा तरी कशी करणार? इंटरनेटमुळे आपले आयुष्य एवढे व्यापले आहे की बरीच मुले ऑनलाइन जग आणि प्रत्यक्ष जगण्यातील जबाबदार्या व आव्हाने यांत संतुलन राखण्यासाठी संघर्ष करत असतात. किशोरवयीन मुलांच्या स्क्रीनवरच्या वेळेचे व्यवस्थापन करणे आणि त्यांचे स्वत:चे आरोग्य आणि भविष्य यासाठी त्यांना स्वतःला हे करायला प्रोत्साहन देणे ही अत्यंत कठीण बाब आहे.
- बरे झाल्यानंतर देखील उपचारांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी प्रोत्साहन द्या: समाज माध्यमाच्या व्यसनावरील उपचार हे थोड्या कालावधीसाठी मदत करू शकतात, परंतु त्या उपचारांचा पाठपुरावा करणे व उपचारांची मदत घेत राहण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. आपण पुन्हा घसरतोय किंवा आपल्याला भावनिक त्रास जाणवतोय हे ध्यानात आल्यावर लगेच मदत घेण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
समाज माध्यमांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे
समाज माध्यमांबद्दलची काही लिखित मार्गदर्शक तत्वे तुमच्या मुलाला समाज माध्यमांचे फायदे व त्याचा जबाबदार आणि सुरक्षित वापर करण्याचे भान दोन्हीही देऊ शकतात. सदर मार्गदर्शक तत्वे ही तुमच्या कौटुंबिक माध्यमवापर आराखड्याचा भाग असू शकतील . जर या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये तुमच्या सोशल मीडिया वापराचा समावेश असेल तर तुम्ही तुमच्या मुलीसाठी एक सकारात्मक आदर्श ( रोल मॉडेल) बनू शकता.
तुमच्या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो.
समाज माध्यमांचा वापर
यामध्ये समाविष्ट असणार्या मूलभूत गोष्टी:
समाज माध्यमे कधी वापरावीत व तुमच्या मुलाला समाजमाध्यमांवर किती वेळ घालवायची परवानगी आहे?
गृहपाठ करताना, जेवताना, घरातल्यांच्यासोबत गप्पा मारताना समाजमाध्यमे वापरली तर चालेल का?
समाज माध्यमे कोठे वापरता येतील? - उदाहरणार्थ, केवळ घराच्या माजघरात वापरता येतील. झोपायच्या खोलीत किंवा बाथरूममध्ये नाही.
माहिती व कमेंट टाकताना
तुमच्या मुलाने हे मान्य करणे महत्त्वाचे आहे.
अयोग्य संदेश, चित्र, फोटो आणि व्हिडिओ अपलोड किंवा सामायिक करू नयेत.
जी गोष्ट आपण सामोरासमोर असताना करत नाही ती गोष्ट ऑनलाइन जगात वावरताना देखील करू नये. उदाहरणार्थ आपण प्रत्यक्ष बोलताना जी भाषा वापरत नाही ती भाषा प्रतिसाद देताना वापरू नये.
दुसर्यांचे फोटो शेअर करताना त्यांची परवानगी घ्यावी.
गोपनीयतेचे रक्षण करणे
गोपनीयता रखण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे प्रत्येक समाज माध्यमाच्या सेटिंग्जमध्ये दिलेली असतात. पालकांनी आपल्या मुलासोबत त्या सूचना जरूर वाचाव्या व कोणती सेटिंग्ज निवडणे योग्य ठरेल याबद्दल चर्चा करावी.
पुढे दिलेल्या गोष्टींशी सहमत होऊन तुमचे मूल त्याच्या गोपनीयतेचे संरक्षण करू शकते:
फोन नंबर, ठिकाण आणि जन्मतारीख यासारखी वैयक्तिक माहिती ही अनोळखी व्यक्तींबरोबर शेअर करू नका
खाजगी प्रोफाइलमध्ये फोन नंबर किंवा जन्मतारीख यासारखे वैयक्तिक तपशील जोडू नका
मोबाइल फोनची गोपनीयता आणि स्थान सेटिंग्ज नियमितपणे तपासा.
पासवर्ड आणि लॉग-इन तपशील गोपनीय ठेवा आणि मित्रांना सांगू नका.
सार्वजनिक संगणक वापरल्यानंतर लॉग आउट करा.
एकाच वेळी तीच पोस्ट एकापेक्षा जास्त सोशल मीडिया साइटवर टाकण्यासारखे पर्याय निवडू नका.
समाज माध्यमांवर सुरक्षित राहणे
मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक गोष्टीं:
अनोळखी लोकांना किंवा अस्वस्थ करणार्या टिप्पण्या किंवा माहिती पोस्ट करणार्या लोकांना ब्लॉक करणे आणि त्याबद्दल प्रौढ व्यक्तींना सांगणे.
पॉप-अप वर क्लिक न करणे – काही सुरक्षित वाटणारी पॉप-अप पोर्नोग्राफी साइट्सकडे नेतात किंवा वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती विचारू शकतात.
फक्त ओळखीच्या लोकांनी केलेली मैत्रीची विनंती स्वीकारणे.
समाज माध्यमांवर त्यांच्या संदर्भात ज्या आक्षेपार्ह गोष्टी येतील त्यांचे स्क्रीनशॉट पुरावा म्हणून काढून ठेवणे आणि विश्वासार्ह प्रौढ व्यक्तीशी त्याबद्दल बोलणे..
समाज माध्यमे वापरणे हा आपण आणि आपल्या किशोरवयीन मुलांसाठी एक सकारात्मक अनुभव असू शकतो. स्वतःच्या वर्तनातून आपण समाजमाध्यमांच्या यथायोग्य वापराचे उदाहरण मुलांसमोर ठेऊ शकतो.
तुमच्या उदाहरणातून मुलांना शिकू द्या
सोशल मीडिया कसे कार्य करते हे जाणून घेणे आणि त्यांच्याशी सकारात्मक पद्धतीने संवाद साधणे ही तुमच्या मुलांना ऑनलाइन काय करायला बरोबर आहे आणि काय नाही हे दाखवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. येथे तुमच्या मुलांसाठी अनुकरणीय अशा सकारात्मक ऑनलाइन वर्तनाचे काही उदाहरण आहेत.
तुमची स्वतःची गोपनीयता सेटिंग्ज अद्ययावत ठेवा आणि तुमच्या मुलांना त्यांची गोपनीयता सेटिंग्ज अद्ययावत कशी ठेवावी ते दाखवा.
समाज माध्यमावर काही टाकण्यापूर्वी विचार करा. कमेंट करण्यापूर्वी ती विधायक आहे की नाही हे स्वतःला विचारा.
प्रोफाइल फोटोच्या आड दडता येते असे समजू नका.सोशल मीडियावर अज्ञातपणे वावरता येत नाही. आपला ऑनलाइन नावलौकिक बराच काळ आपल्याबरोबर राहतो. आपण एखाद्याच्या तोंडावर जे बोलणार नाही ते ऑनलाइन बोलू नका.
समाज माध्यमांवर आपण कोणाशी संपर्क साधायचा आणि कोणाशी नाही त्याविषयी स्वतःसाठी 'नियम' ठरवा.जसे की, आपण रस्त्यात थांबून ज्यांच्याशी दोन शब्द बोलू शकतो अशा व्यक्तींना फेसबुक मित्र म्हणून जोडावे. यामुळे ऑनलाइन जगातील मैत्रीच्या सीमारेषा आपल्या ध्यानात येतात.
तुमच्या कुटुंबाच्या आवडीचे विषय शोधा आणि समाज माध्यमांवर त्या विषयांवर चर्चा करणार्या गटात सहभागी होऊन चर्चा करा. समाज माध्यमांवर आपण आपण सुरक्षिततेचे व सभ्यपणाचे सर्व नियम पाळून, आपल्याला आवडेल असे संभाषण कसे करू शकतो याचा वस्तूपाठ मुलांसमोर निर्माण करा.
समोरच्याचा आदर जपून ऑनलाइन संभाषण कसे करावे हे दाखवा.आपल्या बद्दल काही लोकांचे मत वेगळे असू शकते हे आपल्या मुलाला सांगा. समोरासमोर बोलताना आपण जसे वागू आणि बोलू तसेच समाज माध्यमांवर व्यक्त होण्याविषयी मुलांना सांगा. कोणी ट्रोल करत असेल किंवा गुंडगिरीचे वर्तन करत असेल तर त्यांना त्याविषयी तुमच्याशी बोलायला सांगा.
आपल्या किशोरवयीन मुलांचे ऑनलाइन 'मित्र' बना
समाज माध्यमांवर आपल्या किशोरवयीन मुलांचे मित्र असणे ही खूप सकारात्मक गोष्ट असू शकते. समाज माध्यमांवर आपले वर्तन कसे असावे हे तुम्ही त्यांना स्वतःच्या उदाहरणातून दाखवू शकता तसेच तुम्ही समाज माध्यमांवरील काही अनुभव एकत्रपणे घेऊन त्यावर चर्चा करू शकता. ऑनलाइन जगात मुलांचे मित्र बनताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:
समाज माध्यमांवरील सामाजिक अवकाश ही तुमच्या मुलांची खाजगी बाब आहे.हे प्रत्यक्ष आयुष्यात मित्रांबरोबर भटकण्यासारखेच आहे. त्यांच्या प्रत्येक पोस्ट वर टिप्पणी टाकणे, लाइक करणे टाळा व त्यांचा खाजगीपणा जपा.
त्यांच्या ऑनलाइन वर्तनाबद्दल ऑफलाइन बोला. जर तुमच्या मुलाच्या समाज माध्यमावरील आयुष्यात काही घडले असेल आणि तुम्हाला त्याची दखल घेणे आवश्यक वाटत असेल तर त्याबाबद्दल समाज माध्यमावर न बोलता मुलाशी समोरासमोर बोला. समाज माध्यमांवर खाजगी संभाषण किंवा वैयक्तिक टीका टिप्पणी करणे योग्य नाही. तुयांच्या नात्यातील विश्वास व मुलांना तुमच्याबद्दल वाटणारा आदर त्यामुळे कमी होऊ शकतो. त्याऐवजी ऑनलाइन काय झाले आणि ते अधिक सकारात्मक प्रतिक्रिया कशा देऊ शकतील याबद्दल समोरासमोर चर्चा करा.
कदाचित तुमची किशोरवयीन मुलं तुम्हाला त्यांच्या समाज माध्यमावरील संपूर्ण मजकूर दाखवत नसतील.ठीक आहे. तरुण मुलांना तंत्रज्ञानाविषयी बर्यापैकी माहिती असते आणि कदाचित काही पोस्ट पाहण्यापासून तुम्हाला त्यांनी ब्लॉक केलेले असू शकते. आपण त्यांच्या खाजगीपणाचा आदर करणे आवश्यक आहे. त्यांचे वागणे पुरेसे मोकळे व पारदर्शक नाही असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्याशी चर्चा करणे महत्वाचे आहे.
सकारात्मक अनुभवांना प्रोत्साहान द्या
तंत्रस्नेही लोकांसाठी समाज माध्यमे ही आता अमूर्त जागा उरलेली नाही. हे एक समांतर जग आहे, जिथे आपण आपल्या कृतीसाठी जबाबदार आहे. तुम्ही जर राजकरणी, नट नट्या यांना त्यांचे कपडे, दिसणे, बोलणे यावरून नावे ठेवायला लागलात तर तुम्ही तुमच्या मुलासमोर चुकीचा आदर्श ठेवत आहात. तुमचे जबाबदार ऑनलाइन वर्तन हा तुमच्या मुलासमोरील आदर्श असणार आहे.
किशोरवयीन मुलांना त्यांच्या ऑनलाइन वागण्याचे परिणाम लक्षात येण्यामध्ये पालक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करू शकता.
त्यांना त्यांच्या ऑनलाइन वर्तनासाठी जबाबदार धरणे.
ऑनलाइन जगातील गुंडगिरी ही खेळाच्या मैदानावरील गुंडगिरी इतकीच गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. तुमचे मूल ट्रोलिंग किंवा इतर समाजविघातक वर्तनात सहभागी होत आहे असे तुमच्या लक्षात आले तर त्याच्याशी त्याबद्दल समोरासमोर बोला.
आपल्या मुलास ऑनलाईन धमकावले जात असल्यास , त्या व्यक्तीस कसे ब्लॉक करावे आणि शाळा किंवा पोलिसांकडे ऑफलाइन तक्रार कशी करावी हे त्यांना दाखवा.
जर तुम्ही तुमच्या मुलांचे ऑनलाइन मित्र असाल तर त्यांच्या ऑनलाइन वर्तनातील तुम्हाला आक्षेपार्ह वाटणार्या गोष्टींबद्दल त्यांच्याशी बोला. त्यांच्या ऑनलाइन कृतींचा वास्तविक जगातील लोकांवरही प्रभाव पडतो याची त्यांना आठवण करून द्या.
बनावट नावाने प्रोफाइल काढले तरी त्यायोगे खर्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे किती सहजपणे शक्य होते हे त्यांना स्पष्ट करून सांगा.
सायबर धमकी अनेक प्रकारची असते. खाली काही प्रकार दिले आहेत.
ईमेल तसेच इतर समाज माध्यमांवरून त्रास होईल असे संदेश पाठवणे.
ऑनलाइन विश्वात एखाद्याविषयी अफवा पसरवणे.
एखाद्याचा अपमान करण्याच्या हेतूने चित्र किंवा व्हिडिओ पाठवणे.
धमक्या पाठवणे.
एखाद्याला त्रास देण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी बनावट ऑनलाइन प्रोफाइल तयार करणे आणि वापरणे.
धमकावणे हे एक असे वर्तन आहे जे हेतुपुरस्सर हानी पोहचवण्याच्या हेतूने केले जाते. सार्वजनिक आणि अनियंत्रित स्वरूपामुळे सायबर धमकी आणखी त्रासदायक ठरू शकते. उदाहरणार्थ:
सायबर गुंडगिरीत कोण भाग घेईल आणि ती कोणाच्या नजरेस पडेल याला काही मर्यादा नाहीत
ऑनलाइन सामायिक केलेली सामग्री काढणे खूप अवघड असते.
गुंडगिरी करणार्या व्यक्ती अज्ञात राहू शकतात.
सर्चइंजिनाद्वारे जुनी माहिती शोधता येते.
तंत्रज्ञान वापरणार्या लोकांना या प्रकारच्या गुंडगिरीपासून सुटका करून घेणे अवघड आहे. तरुण मुलांनी प्रत्यक्ष जीवनापेक्षा ऑनलाइन जीवनात एखाद्याला धमकावण्याची शक्यता जास्त असते कारण ऑनलाइन विश्वाचे स्वरूप असे असते की माणूस समोर नसल्याने आपल्या कृतीला आपण जबाबदार आहोत असे त्यांना वाटत नाही.
आपल्या किशोरवयीन मुलांना सायबर गुंडगिरी पासून सुरक्षित ठेवा
केवळ १० पैकी १ तरुण मूल पालक किंवा प्रौढांना सायबर गुंडगिरीबद्दल माहिती देते. मुलांना याविषयी बोलायची लाज वाटते तसेच पालक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत, हे हसण्यावारी नेतील, फोन काढून घेतील अशी भीती देखील त्यांच्या मनात असते. सायबर गुंडगिरीच्या त्रासाविरुद्ध आपण कोणकोणते मार्ग वापरू शकतो याविषयी मुलाला व्यवस्थित माहिती दिल्यास अशा परिस्थितीत ते आपली मदत मागण्याची शक्यता वाढते.
किशोरवयीन मुलांवर सायबर धमकीचे परिणाम खालीलप्रमाणे असू शकतात:
शाळेची हजेरी व कामगिरी खालावणे
ताण व चिंतेमध्ये वाढ
भीती व एकटेपणाची भावना
एकाग्रता कमी होणे
औदासिन्य/ नैराश्य
आत्मविश्वास व स्वप्रतिमा ढासळणे
काही केसेसमध्ये मुले आत्महत्या करू शकतात
सायबर गुंडगिरीचे परिणाम प्रत्यक्षातील गुंडगिरीच्या परिणामांसारखेच आहेत, परंतु मुख्य फरक म्हणजे ते टाळणे खूपच कठीण आहे. शाळेपासून घरापर्यंत सगळीकडे ही गुंडगिरी त्यांचा पाठपुरावा करू शकते आणि ते यातून कधीही सुटू शकणार नाहीत असे त्यांना वाटू शकते. आपल्या मुलास याची जाणीव करून द्या की ही त्यांची चूक नाही, ते एकटे नाहीत आणि सायबर गुंडगिरी हाताळायचे अनेक मार्ग आहेत.
सायबर गुंडगिरी टाळण्यासाठी काय करावे?
सायबर गुंडगिरी टाळण्यासाठी आपण हे करू शकता:
तुमचे मूल फक्त मित्र आणि ओळखीच्या लोकांशीच समाज माध्यमांवर गप्पा मारते ना याची खात्री करून घ्या.
तुमच्या मुलाच्या सर्व सोशल मीडिया खात्यांची गोपनीयता सेटिंग्ज व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्या.
पासवर्ड कुणाला सांगायचं नसतो हे तुमच्या मुलाला माहीत आहे ना याची खात्री करून घ्या.
ऑनलाइन त्रास देणार्या व्यक्तीला ब्लॉक करणे, हटविणे किंवा त्याचा अहवाल देणे हे तुमच्या मुलाला माहित आहे ना हे तपासा.
आपल्या किशोरवयीन मुलाला सायबर गुंडगिरीपासून कसे सुरक्षित ठेवावे?
सायबर गुंडगिरीबद्दल माहिती घ्या आणि त्यातून सुटका करून घेण्याच सर्वोत्तम मार्ग कोणता याचा विचार करून ठेवा, म्हणजे जर तुम्हाला याचा सामना करावा लागला तर तुम्ही त्याला तोंड देण्यास तयार असाल.
ऑनलाईन फोटो शेअर करण्याबद्दल मुलांशी बोला. काही स्फोटक फोटो त्यांना शेअर करायचे असतील तर एकदा कोणताही फोटो किंवा संदेश ऑनलाइन विश्वात गेल्यावर आपले त्यावर नियंत्रण रहात नाही आणि त्यातून त्रास निर्माण होऊ शकतात हे स्पष्ट करा.
अनोळखी लोकांच्या संदेशांकडे दुर्लक्ष करण्याची त्यांना आठवण करून द्या. नवीन मित्र बनवण्याकरिता इंटरनेट ही एक उत्तम जागा ठरू शकते, परंतु बनावट खाती आणि ट्रोलमुळे जास्तीची सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे
त्यांच्या समाज माध्यमांचे सेटिंग 'खाजगी' आहे ना हे बघण्यासाठी तुम्ही त्यांचे नाव गुगल करा. जर त्यांचे खाते खाजगी असेल तर गुगल केल्यावर त्यांचे कोणत्याही समाजमाध्यमवरील खाते दिसू शकत नाही.
सायबर गुंडगिरी करणे चुकीचे आहे आणि त्यांनी हे करता कामा नये हे त्यांना माहित आहे का याची खात्री करा. ते इतरांना त्रास देत असतील तर इतरांना त्यांना त्रास देण्याची मुभा असल्यासारखे वाटते हे त्यांच्या लक्षात आणून द्या.
त्यांना ऑफलाइन कामांमध्ये व्यस्त ठेवा . त्यामुळे जर ऑनलाइन जगात काही बिनसले तर त्यांच्या आवडीच्या इतर गोष्टी उपलब्ध असतात.
लक्षात ठेवा, ते त्यांचा फोन, लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही उपकरणावर जितका कमीत कमी वेळ घालवतील तितका त्यांचा सायबर गुंडगिरीचा धोका कमी होतो.
आपल्या मुलास सायबर गुंडगिरीस तोंड द्यावे लागत आहे हे आपल्याला माहिती असल्यास काय करावे?
सायबर धमकावणीचे निराकरण कसे करावे याबद्दल कोणतेही अचूक धोरण नाही, तथापि, तुमच्या मुलाला सायबर गुंडगिरीचा त्रास होतोय हे तुम्हाला माहीत असेल तर सर्वात आधी त्याला आधार द्या आणि त्याला समजून घ्या. ही त्यांची चूक नाहीये हे त्यांना माहीत आहे ना याची खात्री करून घ्या. सायबर गुंडगिरी ही गंभीर आणि अस्वस्थ करणारी असते, म्हणून आपल्या मुलास 'बरे वाटावे ' यासाठी समस्येला क्षुल्लक करण्याचा प्रयत्न करु नका. आपल्या मुलास ऑनलाइन जाण्यापासून रोखण्याचा मोह टाळा; यामुळे कदाचित पुन्हा असे घडले की ते आपल्याला सांगणार नाहीत.
आपल्या मुलास भावनिक आधार देण्याचे काही उपाय:
मुलाशी बोला आणि त्यांचे म्हणणे नीट ऐकून घ्या. ते तुमच्याशी बोलले याबद्दल तुम्हाला बरे वाटले आहे हे त्यांना सांगा आणि ही गुंडगिरी रोखायची तुमची इच्छा आहे हे देखील त्यांना सांगा.
सायबर गुंडगिरीचा त्रास झाल्यामुळे तुमच्या मुलाला दोष देऊ नका. तरुण लोक ज्या प्रकारे ऑनलाइन संवाद साधतात ते मोठ्यांना अति वाटू शकते परंतु कोणीतरी आपल्याला त्रास देणे हा आपला दोष नसतो.
त्यांच्या भावना स्वीकारा आणि जरी तुम्हाला त्यात काही विशेष वाटत नसले तरी त्यांचे म्हणणे उडवून लावू नका.
यासाठी मदत करू शकतील असे बरेच लोक आहेत असा त्यांना विश्वास द्या. यामध्ये त्यांचे शिक्षक किंवा इतर व्यावसायिक सेवांचा समावेश होतो.
जर आपल्या मुलास गुंडगिरीमुळे त्रास होत असेल तर एखाद्या मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीबरोबर बोलण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या किंवा त्यांना मदत करू शकणार्या इतर सेवांशी जोडून द्या. ह्यामध्ये कदाचित एखाद्या शाळेचा समुपदेशक असेल किंवा किड्स हेल्पलाइन सारखी सेवा असेल.
आपल्या मुलाला सायबर गुंडगिरीचा त्रास होत असेल तर काय करावे?
गुंडगिरी सहन करणार्या तरुण व्यक्तीला आपण एकटे आहोत, कोणी आपली मदत करू शकणार नाही असे वाटू शकते. जर तुमच्या मुलाला सायबर गुंडगिरीचा त्रास होत असेल तर आपल्याला मदत मिळू शकते याची त्याला खात्री वाटणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. तुम्ही ह्या त्रासाविषयी सायबरबाप (CyberBAAP) वर तक्रार करू शकता. सायबर गुंडगिरी हा गुन्हा आहे. त्याची ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी राष्ट्रीय साइबर अपराध रिपोर्टिंग पोर्टल ह्या वेबसाइट लॉग इन करा.
राष्ट्रीय साइबर अपराध रिपोर्टिंग पोर्टल हेल्पलाईन: 1930