Search

सोशल मिडीया व्यसन

सोशल मीडियाचा अतिरेक म्हणजे काय?

समाज माध्यमांच्या म्हणजे सोशल मिडीया व्यसनाचा विचार करताना 'व्यसन' या गोष्टीशी निगडीत दोन बाबींचा विचार करायाला हवा. एक म्हणजे त्यापायी आपला किती वेळ जातो? आणि एवढा वेळ अशाप्रकारे घालवण्यामागचे कारण काय?

सोशल मिडीया व्यसन असलेल्या किशोरवयीन मुलांना आभासी जगात सहभागी होण्याची तीव्र इच्छा असते. त्यांना अपडेटस तपासणे, नवीन स्टेटस ठेवणे, फोटो पोस्ट करणे किंवा इतर ऑंनलाईन गोष्टी करण्यासाठी अंतर्गत दबाव जाणवत असतो. सोशल मीडियांचे व्यसन असलेल्या व्यक्ती वास्तविक जीवनातील संबंधापेक्षा आभासी जगातील नात्यांना प्राधान्य देतात. किशोरवय मुलांच्या सामाजिक वाढीमध्ये कळीची भूमिका बजावते त्यामुळे सोशल मीडियांचे व्यसन हे त्यांच्या सामाजिक कौशल्यांच्या निरोगी विकासासाठी हानिकारक ठरू शकते.

सोशल मीडियांचे व्यसन जडलेल्या किशोरवयीन मुलांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना स्वतःचे बाह्य रूप अत्यंत आकर्षक असावे व सोशल मीडिया माध्यमांवर लाईक्स देऊन सर्वांनी त्याचे सतत कौतुक करावे असे आभासी जग रचण्याची तीव्र इच्छा असते. अशी मुले एखाद्या गोष्टीचा आनंद घेण्याऐवजी त्या गोष्टीचे फोटो काढण्यात जास्त वेळ घालवतात. समुद्रावर किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर तिथला अनुभव घेण्याऐवजी फोटो घेण्यातच त्यांचा बराच वेळ जातो.

किशोरवयामध्ये आपण चांगले म्हणजे इतरांना आवडू असे असण्याचे खूप दडपण मुलांवर असते. सोशल मीडियांचे व्यसन असलेल्या मुलांमध्ये हे जास्त असते. त्यामुळे खर्‍या अर्थाने स्वतःची ओळख शोधण्याच्या त्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो.

सोशल मीडियांचे व्यसन ही एक वर्तणुकीशी संबंधित व्याधी आहे. या व्यसनाच्या आहारी गेलेली किशोरवयीन मुले किंवा तरुण मुले सोशल मीडिया जास्त प्रमाणात वापरतात, याचा त्यांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो आणि हा वापर कमी करणे किंवा थांबवणे त्यांना शक्य होत नाही. 

बरीच किशोरवयीन मुले वेगवेगळ्या ऑंनलाईन माध्यमांचा दररोज वापर करत असतात (फेसबुक, इंस्टाग्राम, X/ट्विटर, युट्यूब, स्नापचाट आणि विडिओ गेम्स इत्यादि ). या माध्यमांच्या एकत्रित वापरामुळे हे व्यसन वाढते. मुलांना चांगले वाटण्याचा एक मार्ग म्हणून सोशल मीडियावंर असलेली लाईक्स असतात आणि त्याचे दुष्परिणाम दिसत असूनही हे वर्तन रोखणे किंवा त्यावर अंकुश ठेवणे शक्य होत नाही. या व्यसनामुळे मैत्री, लोकांशी असलेले संबंध कमी होऊ शकतात तसेच अभ्यासावर विपरीत परिणाम होऊ शकतात.

  • किशोर आणि प्रौढ व्यक्ती दिवसातून १५० वेळा त्यांचा फोन बघतात. सोशल मीडिया अतिरेकी वापर आणि आपल्या ऑनलाइन रूपाबबात सतत विचार करण्यामुळे किशोर वयीन मुलांच्या आत्मसन्मानवर गंभीर परिणाम होतो, ती खूप चिंताग्रस्त होतात.
  • सोशल मीडिया किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यामध्ये होणारी घसरण वाढवतात. मुलांमध्ये ऑनलाइन गुंडगिरी आणि सायबर गुन्हेगारी वाढते व मुलांच्या भावनिक स्वास्थ्यावर परिणाम होतो.
  • सोशल मीडियांचा व्यसनामुळे इतरांशी संवाद साधणे अनेकदा कठीण जाते. शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होतो.
  • किशोरवयीन मुलांच्या सध्याच्या नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. मन सतत विचलित झाल्यामुळे मित्रांना दिलेला शब्द पाळण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
  • सोशल मीडियांचा वापर करताना आपण स्वतःसाठी ठरवलेली मर्यादा पाळण्यात अडचण येणे किंवा वेळेचे भान न राहणे. उदा. आपण 5 ते 10 मिनिटे सोशल मीडिया वापरायची असे ठरवले असते आणि एक तासानंतर आपल्या लक्षात येते की आपण अद्याप तेच करत आहोत.
  • सोशल मिडीयांवर जास्त वेळ घालवल्यामुळे आयुष्यातील इतर महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होते. उदा. सोशल मिडीयांवर राहण्याला प्राधान्य दिल्यामुळे मित्रांसोबत वेळ न घालवणे. शाळेचा अभ्यास किंवा इतर कामे वेळेत पूर्ण न करणे. दैनंदिन घरगुती कामे देखील वेळेवर न करणे.
  • सोशल मिडीयांपासून दूर असताना मूडमध्ये बदल होणे, चिडचिडेपणा वाढणे.
  • सोशल मिडीयांवर जाऊ न शकण्याच्या विचाराने त्रासणे किंवा चिंतेत लक्षणीय वाढ होणे. जसे की सोशल मीडियांशिवाय अर्धा दिवस घालविण्याचा विचारही अशक्य वाटणे.
  • एखादी व्यक्ती सोशल मीडियांच्या प्रमाणाबाहेर वेळ घालवत आहे व त्या व्यक्तीसंदर्भात ही एक समस्या बनली आहे असे इतरांना वाटणे. तुम्ही सोशल मिडीयावर बराच वेळ घालवत आहात अशी तक्रार तुमचे कुटुंबीय व मित्र करत असतील तर तुमच्या वर्तनात बदल करण्याची वेळ आली आहे असे समजावे.
  • सोशल नेटवर्क डाऊन झाले असताना किंवा नेहमीपेक्षा हळू असताना किंवा इंटरनेट बंद असताना निराश वाटणे.
  • सकाळची उठल्यानंतर पहिली गोष्ट आणि रात्री झोपण्यापूर्वीची शेवटची गोष्ट म्हणजे सोशलमिडिया बघणे.
  • स्मार्टफोन हातात नसताना तणाव जाणवणे.
  • चालताना सुद्धा सोशलमिडीया वापरणे.
  • लाईक्स न मिळाल्यास किंवा चॅटला प्रतिसाद न मिळाल्यास वाईट वाटणे.
  • गाडी चालवताना सोशलमिडीयाचा वापर करणे.
  • समोरासमोर भेट न घेता सोशलमीडियाद्वारे मित्र आणि कुटुंबाशी संवाद साधण्याला प्राधान्य देणे.
  • दररोजच्या गोष्टी सोशल मिडियावर शेअर करण्याची गरज वाटणे.
  • इतरांचे आयुष्य आपल्यापेक्षा चांगले आहे असे त्यांच्या पोस्ट्स पाहून ठरविणे.
  • आपण जाऊ तिथे सतत सोशल मिडिया चेक करत राहणे.

लोकांना सोशियल मीडियाची व्यसन लागण्याची काही संभाव्य कारणे पुढे दिली आहेत.

  • जैवरासायनिक प्रतिसाद: बक्षिस मिळाल्यानंतर सक्रिय होणारी मेंदूतील केंद्रे जेव्हा आपण तंत्रज्ञान वापरतो तेव्हा सक्रिय होतात याचे काही पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे मेंदूत जी रसायने प्रवाहीत होतात त्यामुळे आपल्याला बरे वाटते. आपण इतर विषयांबद्दल बोलण्यापेक्षा जेव्हा इतरांसोबत वैयक्तिक माहिती शेअर करतो तेव्हा ही रसायने अधिक प्रमाणात प्रवाही होतात असे सिद्ध झालेले आहे. सोशल मिडीयांवर इतके लोकप्रिय होण्याचे हे एक कारण असू शकते.

अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की पौगंडावस्थेमध्ये पैसे मिळाल्यावर किंवा चॉकलेट खाल्ल्यावर सक्रीय होणारी मेंदूची केंद्रे सोशल मिडीयांवर लाईक्स मिळतात तेव्हा सक्रीय होतात.

मेंदूत डोपामाईनचा एक उच्चांकी प्रवाह तयार होतो. त्यामुळे अधिक पोस्ट करणे, सतत लाईकसाठी पोस्ट्स तपासणे याचे चक्र चालू होते. सकारात्मक वाटाण्याच्या इच्छेचे हे चक्र असते.

अभ्यास असे सूचित करतात कि सोशल मिडीया व्यसन असलेल्या किशोरवयीन मुलांमध्ये इतर व्यसनांची शक्यता वाढते. मेंदूला अधिकाधिक आनंद मिळण्याची इच्छा होत असल्याने आणि सोशल मिडीया आणि आभासी जगातील प्रतिक्रिया यांच्यामधून ते नेहमीच सहजपणे मिळत नसल्याने तीच संवेदना निर्माण करण्यासाठी किशोरवयीन मुले नंतर मादक पदार्थ, दारू, आणि इतर व्यसने करू शकतात.

  • अप्रिय संवेदनाचे व्यवस्थापन : मानवी जीवनाचा भाग असलेल्या चिंता एकटेपणा, नैराश्य, तणाव, आणि कंटाळा यासह दैनंदिन जीवनातील जबाबदार्‍या आणि अडचणी यांच्यामधून सुटण्याची संधी इंटरनेट देते. सोशलमिडीयाचा वापर केल्यामुळे आपला वेळ चांगला जातो. त्यामुळे अप्रिय संवेदना टाळल्या जाऊ शकतात .
  • प्रतिमा व्यवस्थापन : प्रत्यक्ष आयुष्यात अनुभवास येणार्‍या सामाजिक दबावाला तोंड न देता इतरांशी संबंध किंवा नवीन नाती जोडण्याची संधी व आत्मविश्वास सोशल मिडीयामुळे मिळतो. स्वतःला हव्या त्या पद्धतीने स्वतःची प्रतिमा आपण जगासमोर सादर करू शकतो. आपल्याविषयी इतरांचे काय मत आहे याची ज्यांना चिंता वाटते त्यांना सोशल मिडीयाद्वारे इतरांचा अभिप्राय मिळू शकतो. लोक त्यांची मते, आवडी- निवडी आपल्यापर्यंत पोचवत असल्यामुळे आपण महत्वाचे असल्याची भावना निर्माण होते.

खालावलेली स्व-प्रतिमा, स्वतःविषयी असमाधान, नैराश्य, अतिक्रियाशीलता आणि आपुलकीचा अभाव हे सोशल मीडियांच्या व्यसनाला कारणीभूत ठरणारे सार्वत्रिक मुद्दे आहेत. ही कमतरता भरून काढण्यासाठी किशोरवयीन मुले सोशल मीडियांवर मिळणार्‍या लाईक्सचा आधार घेतात. किंबहुना, बरेच तरुण तीव्र परंतु नेहमीच क्षणभंगुर ठरणारी समाधानाची भावना अनुभवण्यासाठी जवळजवळ सक्तीने लाईक्स मिळालेत का ते बघत राहतात आणि दुसर्‍यांच्या मताचा त्यांच्यावर होणारा परिणाम वाढत जातो.

सर्वसाधारणपणे 16 ते 24 वर्ष वयातील मुलांना सोशल मीडियांचे व्यसन लागते. तज्ञांच्या मते किशोरांना सोशल मीडियांचे व्यसन लागण्याची तीन प्रमुख कारणे असतात: उत्कट असण्याची प्रवृत्ती. व्यापक सामाजिक प्रभावाची वाढती गरज आणि गटामध्ये सतत स्वतःचे स्थान पक्के करण्याची गरज.

इतर व्यसनांप्रमाणेच प्रतिबंध हाच उपचार आहे. खाली काही सोप्या पद्धती नमूद केल्या आहेत, त्यांचा उपयोग करून सोशल मीडियाचा वापर कमी करता येतो:

  •  सोशल मीडियाच्या दोन सेशन्समध्ये किमान १५ मिनिटे मोकळा वेळ ठेवावा.
  •  दिवसाच्या काही महत्वाच्या वेळी (नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण) मोबाईल वापरू नये.
  •  स्वयंचलित सूचना (नोटिफिकेशन्स) बंद कराव्यात.
  •  तुमच्या मोबाईलचा आवाज बंद ठेवा ( सायलेंट मोड) मोबाईलचा मोह टाळण्यासाठी त्याचा घड्याळ किंवा अलार्म म्हणून वापर करणे टाळा.
  •  दररोज थोडा वेळ खेळ, वाचन किंवा संगीत ऐकण्यासाठी घालविण्याचे नियोजन करा.
  •  सोशल मीडियांवरील तुमच्या मित्रांची संख्या कमी करा.
  •  न लागणारी ॲप्स व व्हॉट्सॲप काढून टाका.
  1. सोशल मीडियाच्या व्यसनावर उपचार करण्यासाठी सोशल मीडियापासून लांब राहून वेळ घालवणे आवश्यक आहे. स्वतःला हे व्यसन का लागले याचा विचार करणे, व्यसनाच्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार असणे, व्यसन सुटण्यास कोणत्या गोष्टी उपयोगी पडतील याचा विचार करणे इत्यादि मुद्द्यांबद्दल विचार करणे आवश्यक आहे.
  2. संवादातून उपचार : मनोचिकित्सक व्यावसायिकाशी वैयक्तिक संवाद आणि समुपदेशन यामुळे या व्यसनापासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. यामुळे स्वतः चे व इतरांचे होणारे नुकसान लक्षात येण्यासाठी असा संवाद उपयोगी पडतो. एक असा युक्तिवाद केला जातो की या मुलांच्या संवादाच्या संकल्पना वेगळ्या आहेत परंतु संशोधनातून असे ध्यानात आले आहे की ऑनलाईन माध्यमांच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. या व्यसनाचे तोटे आणि मुळात हे व्यसन लागण्याची कारणे समजून घेतल्यामुळे मुले त्यांचे ऑनलाइन आयुष्य व प्रत्यक्ष आयुष्य यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करतात.
  3. कौटुंबिक उपचार: कधीकधी किशोरवायीन मुलांसोबत त्यांच्या कुटुंबियांबरोबर देखील संवाद करणे फायद्याचे ठरते. गट उपचारमुळे किशोरवयीन मुले कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे समजून घेण्यास तसेच त्यांना कोणत्या पद्धतीने मदत देता येईल हे ओळखण्यासाठी मदत होऊ शकते.
  4. संपूर्ण कुटुंबाने स्वतःमध्ये आवश्यक ते बदल केल्यास किशोरवयीन मुले समस्येला अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात आणि घरातील सर्व व्यक्तींना सोशल मीडियांचे योग्य पद्धतीने वापर करण्यास प्रोत्साहन मिळते.
  5. इतर उपचार – संवाद हे उपचाराचे एक प्रभावी माध्यम आहे. मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशनतज्ञ किशोरांच्या सोशल मिडिया व्यसनाशी निगडीत उपचार करताना याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्याचबरोबर यासाठी इतर अनेक उपचारपद्धती देखील उपयोगी पडतात. योगासने, ध्यान अशा पर्यायी उपचार पद्धतींची देखील मदत होते.
  6. जर एखाद्या किशोरवयीन मुलाला काही वेगळी समस्या आहे असे निदान झाले किंवा तिच्या वर्तनात चिंता किंवा नैराश्याची लक्षणे दिसली तर मानसोपचार तज्ञ त्या विकारांवर देखील उपचार करतात. गरज पडल्यास औषधे देखील वापरतात.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search