Search

भावनिक बुद्धिमत्ता जोपासणे

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या सभोवतालच्या लोकांशी असलेले आपले नाते समजून घेणे, आपल्याला त्यांच्या विषयी काय वाटते याची पोच देणे आणि नाते जोपासणे. आपल्या मुलांना सहानुभाव व सामाजिक कौशल्यांचा विकास करण्याची संधी देणे हा त्यांचे जीवन सुसज्ज करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. शाळेतील मैत्रीपासून ते अपयशाला सामोरे जाताना मनामध्ये निर्माण होणार्‍या भावनांचे व्यवस्थापन करण्यापर्यंत अनेक प्रसंगी भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग होतो.

तुम्हाला तुमच्या मुलाला भावनिकदृष्ट्या सक्षम बनवायचे आहे आणि सुरवात कुठून करावी हे कळत नाहीये? 

तुम्ही पुढील पाच पायर्‍यांपासून सुरवात करू शकता.

1. तुमच्या मुलाचा दृष्टीकोन जाणून घ्या आणि त्याकडे सहानुभावाने बघा

तुमच्या मुलाच्या मनामध्ये चाललेल्या गोंधळाविषयी तुम्ही काही करू शकत नसला तरी त्याला/तिला समजून घ्यायचा प्रयत्न करा. आपल्या मनातील भावना कोणीतरी समजून घेत आहे हे जणावले की माणसाच्या मनातील त्रासदायक भावना कमी होण्यास मदत होते. तुमच्या मुलाच्या भावना गरजेपेक्षा जास्त तीव्र आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर ध्यानात ठेवा की आपण सर्वजण मनात भावना साठवत असतो आणि कधीतरी वेळ आल्यानंतर त्यांना वाट करून देत असतो.

सहानुभाव दर्शवणे म्हणजे तुम्ही त्याच्याशी सहमत आहात असे सांगणे नाही तर तुम्ही त्याच्या बाजूने देखील विचार करताय हे सांगणे. अंतिमतः तुमच्या मुलाला कदाचित तुमचे म्हणणे मान्य करावे लागेल पण त्याचा/तिचा दृष्टीकोन समजून घेणे महत्वाचे आहे. आपले म्हणणे समोरच्याला पटले नाही तरी आपल्या दृष्टीकोनाला समोरची व्यक्ती महत्व देते आहे हे समजले की आपल्याला निश्चितच बरे वाटते. 

"तुझ्यासाठी आता खेळ थांबवून रात्रीच्या जेवणाला येणे कठीण आहे, तरीही आता जेवणाची वेळ झाली आहे."

“मी फक्त आणि फक्त तुझेच असावे असे तुला वाटते ना?”

"पाऊस पडत असल्यामुळे तुझी खूप निराशा झाली ना."

यामुळे भावनिक बुद्धिमत्ता वाढायला कशी मदत होते:

  • समोरच्याने आपले म्हणणे समजून घेतले कि भावनांना सुखावणारी रसायने (biochemicals) स्त्रवतात. असे वारंवार घडल्याने मज्जासंस्थेचा मार्ग (neural pathway) आपोआप बळकट होतो व भावना शांत करण्यासाठी काय करायचे हे मुलांना कळते. मुले जसजशी मोठी होत जातात तसतसा ह्याचा उपयोग स्वत:ला शांत करण्यासाठी करू शकतात.
  • मुले इतरांकडे बघून, त्यांना मिळालेल्या अनुभवातून स्वतःमध्ये सहानुभाव वाढवतात.
  • त्याच्या भावना समजून घेताना तुम्ही तुमच्या मुलाला त्याच्या/तिच्या अनुभवावर विचार करून कोणत्या भावना कशामुळे निर्माण झाल्या हे समजून घेण्यास मदत करत आहात. स्वतःच्या भावना समजणे हे भावना व्यवस्थापन करण्यासाठीचे महत्वाचे साधन आहे.

2. अभिव्यक्तीस परवानगी द्या.

लहान मुले "स्वत:मध्ये" आणि त्यांच्या भावनांमध्ये फरक करू शकत नाहीत. आपल्या मुलाच्या भावना नाकारण्या किंवा कमी करण्यापेक्षा त्यांच्या भावना स्वीकारा. यामुळे कोणतीही भावना लज्जास्पद किंवा अस्वीकार्य नाही ह्याची मुलांना जाणीव होते.

मुलांची भीती किंवा राग तुम्ही नाकारल्याने, मुले या भावनांना रोखू शकत नाही, परंतु यामुळे त्यांच्या भावना दडपल्या जाऊ शकतात. दुर्दैवाने, भावना दडपल्याने कमी होत नाहीत तर भावनांविषयी मोकळेपणे बोलल्याने त्यातून बाहेर पडता येते. अनेक मुले विविध भावनांमध्ये अडकलेली असतात व त्यातून बाहेर पाडण्यासाठी मार्ग शोधत असतात. जेव्हा एखादं मुलं त्याच्या बहिणीला मारते, मुलाला दुःस्वप्न पडते किंवा मुल चिंतेमुळे नखं कुरतडू लागते तेव्हा ह्या भावना त्यांच्या नियंत्रणाबाहेर जातात आणि अचानक बाहेर येतात.

त्याऐवजी, आपल्यामध्ये सर्व प्रकारच्या भावना असणे हे समजण्यासारखे आहे आणि आपण माणूस असल्याचा भाग आहे परंतू आपल्या कृती योग्य असल्या पाहिजेत हे मुलांना शिकवा.

  • “तुझ्या भावाने तुझ्या खेळण्यांचे तुकडे केले आणि तुला खूप राग आला आहे हे मी समजू शकते, पण आपल्याला किती ही राग आला असेल तरीही कोणाला मारणे चूकच आहे. तुला जे काही वाटत असेल ते तू शब्दांत सांग, मारून नाही.

  • “आज तुला सहलीबद्दल काळजी वाटते आहे असे दिसतेय. मी बालवाडी मध्ये असताना मलासुद्धा सहलीला जाताना चिंता वाटायची. तुला या विषयी बोलायचंय का?”

  • "तू खूपच वैतागलेली दिसते आहेस! आज सकाळी तुझ्या मनासारखं काहीच घडत नाहीये का! तुला नुसत रडावसं वाटतंय का? प्रत्येकाला कधी ना कधी रडावसं वाटतं. ये माझ्याकडे, मला मिठी मारून हवं तितकं रड!"

यामुळे भावनिक बुद्धिमत्ता वाढायला कशी मदत होते:

  • आपण आपल्या आणि मुलांच्या भावना स्वीकारल्या की आपल्या मुलाला त्याच्या/तिच्या स्वतःच्या भावना स्वीकारण्यास मदत होते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या भावनांचे निराकरण करण्याची आणि पुढे जाण्यासाठी संधी मिळते. यातून मुले स्वतःच्या भावना नियंत्रित करण्यास अधिक सक्षम होत जातात.
  • आपण आपल्या आणि मुलांच्या भावना स्वीकारल्या की मुले, भावना भीतीदायक किंवा लज्जास्पद गोष्ट नसून त्या सार्वत्रिक असतात आणि भावनांचे व्यवस्थापन करता येते हे शिकतात. स्वत: मधील कमी सुखद भाग देखील स्वीकारायचा असतो, आपण जसे आहोत तसे अगदी छान आहोत आणि मुख्य म्हणजे भावना व्यवस्थापन शिकण्याच्या प्रक्रियेत एकटे नाही हे मुलांना समजते.

3. आपल्या मुलाच्या भावना ऐका.

लक्षात ठेवा, राग ऐकल्याशिवाय कमी होत नाही. आपल्या मुलाचे वय 6 महिने किंवा सोळा वर्षे असले तरी त्याने/तिने व्यक्त केलेल्या भावना आपण ऐकणे गरजेचे आहे असे त्याला/ तिला वाटत असते. एकदा तिने भावना व्यक्त केल्या की त्यांचा निचरा होईल. खरं तर, मुलांना काय वाटते हे दर्शवण्याची संधी दिली की मुले किती प्रेमाने वागतात आणि लगेच सहकार करतात हे बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. परंतु मुलांना तुमच्यासमोर बोलण्यासाठी सुरक्षित वाटावे यासाठी तुम्ही त्यांचे बोलणे नीट लक्ष देऊन ऐकले पाहिजे. आपल्या पालकांसोबत बोलणे सुरक्षित आहे याची मुलांना खात्री झाली की मुले आपोआप पालकांशी बोलून आपल्या भावनांचा निचरा करायला शिकतात आणि अगदीच शांत होतात व सर्व कामांत सहकार्य करतात. यात मग तुमच काय काय म्हणता? तुमच काम इतकच की मुलांना त्यांचे अनुभव घेउ द्या. प्रत्यक्ष उपस्थित रहा, मुलांच्या सर्व त्रासदायक भावना निघून जाव्यात अशी इच्छा थांबवा. आपल्या मुलाला स्वतःला कसे कसे सावरावे हे चांगलेच माहित असते.

  • “तू आत्ता खूप दु:खी आहेस असे दिसतेय. प्रत्येकजण कधीकधी अस्वस्थ होतो ... मी तुझ्या सोबत आहे. तुला बोलायचं का आता ह्याविषयी?"
  • “तू खूप दु:खी आहेस, चिडली आहेस, तुला फक्त ओरडावे, किंचाळावे आणि रडावेसे वाटतेय. प्रत्येकालाच कधीकधी असे वाटते. मी इथेच आहे तुझ्याजवळ. तू मला काही सांगू शकतेस.
  • “तू आता खूप चिडला आहेस आणि म्हणून मला निघून जायला सांगत आहेस. मी मागे जाते. परंतु राग, चीड भावना त्रासदायक आणि भीतीदायक असू शकतात. अशा वेळी मी तुला एकत नाही सोडणार. तू सुरक्षित आहेस आणि मी इथेच आहे. तुला जितकं दु:खी वाटतंय, जितका राग आलाय तो येउ दे. आणि जेव्हा तू मला सांगायला तयार असशील तेव्हा मी इथेच असेन, तुला मिठी मारण्यासाठी. ”

यामुळे भावनिक बुद्धिमत्ता वाढायला कशी मदत होते:

  • आपल्याला आपल्या भवन जाणवणे, भावनांमुळे विचारांचा गोंधळ निर्माण होणे परंतू हळूहळू त्या भवना मागे सोडून आपल्याला पुढे जाता येणे हे आपण भावनिक दृष्ट्या सुधृढ असल्याचे लक्षण आहे. जर आपण भावना व्यक्त नाही केल्या तर त्या मनामध्ये साठून राहतात. मुले त्यांच्या तीव्र भावनांनी घाबरतात. भावना व्यक्त करणे त्यांना जोपर्यंत सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत ते अशा भावना रोखण्याचा प्रयत्न प्रयत्न करतात. भावना आपल्या शरीरातच निर्माण होतात आणि साठवल्या जातात, आरडओरडा करणे, मोठ्यामोठ्याने रडणे किंवा दंगा करणे हा लहान मुलांचा साठवलेल्या भावना व्यक्त करण्याचा नैसर्गिक मार्ग आहे.
  • जेव्हा आपण आपल्या मुलांना त्यांच्या भावना अनुभविण्यास आणि व्यक्त करण्यास सुरक्षित वाटावे म्हणून मदत करतो, तेव्हा आपण त्यांना त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत करत असतो तसेच त्यामुळे मुलांना स्वतःची भावनिक प्रक्रिया समजून घेण्यास मदत होते, ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ते त्यांच्या भावना चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. 
  1. समस्या सोडवणे शिकवा

भावना संदेश असतात, दिवसभर लोळत बसता येईल अशी गादी नव्हे. आपल्या मुलांना, भावनांवर कृती न करता, त्या अनुभवायला शिकवा. भावनांसोबत जगायला शिकवा आणि तीव्र भावनांच्या विळख्यात नसताना कृती करणे व समस्या सोडविणे योग्य ठरते हे शिकवा.

बहुतेक वेळेस, मुलांना (आणि प्रौढांनासुद्धा) त्यांच्या भावना समजून घेतल्या गेल्यात आणि त्या स्विकारल्यात, असे कळाल्यानंतर भावनांची तीव्रत कमी होऊन यामुळे समस्येचे निराकरण होण्याची शक्यता निर्माण होते. कधीकधी, मुले स्वत: हे करू शकतात तर कधीकधी, त्यांना मंथन करण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता असते. परंतु जोपर्यंत ते तुम्हाला मदतीसाठी विचारत नाहीत तोपर्यंत त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी निर्माण होणार्‍या इच्छेला थोपावा. (यामुळे, तुमच्या मुलांमध्ये समस्या सोडविण्याची क्षमता आहे यावर तुमचा विश्वास नाही असा संदेश जाऊ शकतो.)

 “मिना आजारी असल्यामुळे येऊ शकणार नाही म्हणून तू निराश झाला आहेस. मला माहिती आहे, की तुला तिच्याबरोबर खेळण्याची खूप इच्छा होती. पण आता ते शक्य नाही त्यामुळे, तू जेव्हा तयार असशील तेव्हा आपण थोडा विचार करू आणि इतर कोणत्या गोष्टी केल्यामुळे तुला मजा येईल यावर चर्चा करू.”

“शिखर तुला खेळायला देत नाही म्हणून तू अगदी वैतागली आहेस. कधीकधी तुला असे वाटते की यापुढे कधी त्याच्याबरोबर खेळूच नये.. पण तुला ही त्याच्याबरोबर खेळायला आवडतं. तुला काय वाटते? तू शिखरला काय सांगितलंस की तो तुझं म्हणणं ऐकून घेईल आणि तुला ही खेळायला देईल?

यामुळे भावनिक बुद्धिमत्ता वाढायला कशी मदत होते:

  • मुलांनी त्यांच्या भावना व्यक्त करणे आवश्यक आहे, परंतु भावनांमधून बाहेर पडून समस्यांचे विधायक उपाय कसे शोधावे हे देखील त्यांना माहित असणे आवश्यक आहे. मुले हे हळूहळू सरावाने आणि इतरांचे बघून शिकतात.
  • संशोधन असे दर्शविते, की आपल्या मुलांबाबत सहानुभूती व्यक्त करणे हे त्यांना भावना व्यवस्थापन शिकविण्यासाठी अपुरे आहे. मुलांचा अनेकदा त्यांच्या भावनांवर ताबा नसतो. आपल्या भावना, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा संकेत असतात. तो संकेत जाणून घेऊन त्यावर काम करणे मुलांना शिकवले पाहिजे.
  • सर्वच मुलांना, दुसर्‍या व्यक्तीवर हल्ला न करता त्यांच्या गरजा व्यक्त करणे शिकवणे आवश्यक आहे.

5. करून बघा

जेव्हा काही नकारात्मक गोष्टी विकसित होत आहेत असे आपल्याला दिसते, तेव्हा आपल्या मुलाला काही समस्या आहेत आणि त्या कशा हातळव्यात हे त्याला/तिला कळत नाहीये हे समजून घ्या. ह्या समस्या सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे खेळणे.

उदाहरणार्थ, कदाचित तुमच्या चार वर्षांच्या मुलीला नेहमीच तिची आई पाहिजे असते. ही समस्या न ओरडता, सर्वांनी मिळून सोडवता येऊ शकते. असा एखादा खेळ खेळता येऊ शकतो, जिथे, मुलीचे बाबा, आई आणि तिच्या मध्ये येऊन त्या दोघींना एकमेकींपासून दूर ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात. वडील आई आणि मुलगी यांच्या मध्ये येऊन ओरडून सांगतात, “मी तुला आईकडे जाऊ देणार नाही …. अरे, तू कित्ती पटकन धावत गेलीस! ... तू मला लगेच ढकललेस! ... तू खूप बलवान आहेस! .. .. पण यावेळी तू मला हरवू शकणार नाहीस!”

या खेळातून आपले चार वर्षांचे मुलं हसेल आणि बढाई मारेल की ती नेहमीच तिच्या आईकडे जाऊ शकते. या खेळामुळे आई बरोबर नसताना वाटणाऱ्या तिच्या चिंता कमी होतील आणि सतत आई बरोबर असण्याच्या भावनेवर ताबा मिळवणे सोपे होईल.

यामुळे भावनिक बुद्धिमत्ता वाढायला कशी मदत होते:
  • सर्व मुले दररोज तीव्र भावना अनुभवतात. त्यांना बर्‍याच वेळेस आपण कमी महत्वाचे आहोत, आपले कोणी ऐकत नाही, राग, उदासीनता, भीती किंवा मत्सर वाटत असतो. भावनिकदृष्ट्या सुदृढ मुले या भावनांना खेळाद्वारे मात करतात, जे सर्व प्रजातीतील लहान मुले शिकतात. आपल्या मुलांना खेळातून त्यांच्या अंतर्गत संघर्षांचे निराकरण व्हावे यासाठी मदत करा; जेणेकरून वयानुसार योग्य विकासात्मक टप्पे ते पार पाडू शकतील.
  • आपले मूल अनेकदा त्याच्या भावनिक संघर्षांना शब्दात मांडू शकत नाही; बहुतेक प्रौढांसाठीही ते कठीण आहे. परंतु तो त्यांना प्रतिकात्मकरित्या खेळाच्या माध्यमातून बाहेर काढू शकतो आणि त्यांच्याबद्दल न बोलता ते सोडवू शकतो.
  • जसे आपले अश्रू तणाव घालवणारी संप्रेरके निर्माण करतात व आपल्याला बरे वाटते तसेच हास्य देखील तणाव घालवणारी संप्रेरके निर्माण करतात आणि हसून तणाव दूर करणे अधिक मजेदार आहे.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search