Search

आपल्या भावनांचे व्यवस्थापन

भावना आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. त्या आपल्याला सभोवतालच्या जगाशी जोडण्यासाठी मदत करतात. भावना आपल्याला स्वतःबद्दल आणि सभोवतालच्या वातावरणाबद्दल माहिती देतात.

 दररोजच्या आयुष्यात देखील आपल्याला जाणवत असलेल्या भावनाच आपल्याला कृती करायला लावतात आणि आपल्या लहान मोठ्या निर्णयांवर प्रभाव टाकतात. भावना हा विषय समजून घेण्यासाठी, भावनांचे तीन भाग समजून घेणे आवश्यक आहे.

भावनांचे तीन भाग पुढीलप्रमाणे:

  1. व्यक्तिनिष्ठ घटक (आपण भावनांचा अनुभव कसा घेतो?)
  2. मानसिक घटक (आपले शरीर भावनेला कशी प्रतिक्रिया देते?)
  3. अभिव्यक्ती घटक (आपण एखाद्या भावनेला प्रतिसाद म्हणून कसे वागतो?)

प्रत्येकाला अधूनमधून राग येतो. इतर भावनांप्रमाणे, रागही मानसिक आणि जैविक बदल घेऊन येतो. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढतात, तसेच आपल्या संप्रेरकातील अड्रेनलिनचे (adrenaline) प्रमाणही वाढते. बाह्य आणि आंतरिक अशा दोन्ही घटनांमुळे आपल्याला राग येऊ शकतो. आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर (जसे की मित्र किंवा सहकर्मी) किंवा एखाद्या गोष्टीवर ( ट्रॅफिक जाम, कोविडमुळे लागलेली टाळेबंदी ) रागवू शकतो किंवा एखाद्या वैयक्तिक समस्येवर खूप चिंता केल्यामुळे आपला राग येऊ शकतो.

 

कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या रागाची कारणे स्पष्ट असतात. कधीकधी आपला रागावर ताबा का राहत नाहीये याचा आपल्याला काहीच अंदाज येत नाही. यामुळे राग का येतोय हे महत्त्वाचे नाही. राग आल्यावर आपण काय करतो आणि त्या रागाला कसे सामोरे जातो हे जास्त महत्वाचे आहे.

जेव्हा रागावर ताबा राहत नाही आणि तो विध्वंसक बनतो, तेव्हा तो अडचणी निर्माण करतो. या अडचणी कामाच्या ठिकाणी निर्माण होतात. आपल्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये आणि आपल्या जीवनातील एकूण गुणवत्तेमध्येही राग समस्या निर्माण करू शकतो.

राग व्यक्त करण्याचा सर्वात नैसर्गिक मार्ग म्हणजे आक्रमक प्रतिसाद देणे. एखादी धमकी मिळाली तर राग ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. जेव्हा आपल्यावर हल्ला होतो तेव्हा राग स्वतःचा बचाव करण्याची मुभा देतो, म्हणून आपल्या अस्तित्वासाठी काही प्रमाणात राग येणे ही गरजेची गोष्ट आहे. दुसरीकडे, आपण आपल्याला त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्ती किंवा वस्तूवर थेट प्रहार करू शकत नाही. तेथे आक्रमक होण्यापासून रोखण्यासाठी कायदे, सामाजिक नियम आणि सामान्य ज्ञान वापरायला हवे.राग व्यक्त करण्याचा सर्वात नैसर्गिक मार्ग म्हणजे आक्रमक प्रतिसाद देणे. एखादी धमकी मिळाली तर राग ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. जेव्हा आपल्यावर हल्ला होतो तेव्हा राग स्वतःचा बचाव करण्याची मुभा देतो, म्हणून आपल्या अस्तित्वासाठी काही प्रमाणात राग येणे ही गरजेची गोष्ट आहे. दुसरीकडे, आपण आपल्याला त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्ती किंवा वस्तूवर थेट प्रहार करू शकत नाही. तेथे आक्रमक होण्यापासून रोखण्यासाठी कायदे, सामाजिक नियम आणि सामान्य ज्ञान वापरायला हवे.

रागाला प्रतिक्रिया देण्याच्या तीन मुख्य पध्दती आहेत:
१. राग व्यक्त करणे: राग खंबीरपणे(आक्रमकपणे नाही) व्यक्त करणे, हा राग व्यक्त करण्याचा आरोग्यदायी मार्ग आहे. हे करण्यासाठी, आपल्या गरजा आपल्याला स्पष्ट असल्या पाहिजेत आणि इतरांना त्रास न देता त्या कशा पूर्ण करायच्या हे आपण शिकले पाहिजे. ठाम असण्याचा अर्थ आपलेच म्हणणे रेटणे असा होत नाही. ठाम असण्याचा अर्थ आपण इतरांबरोबर स्वतःचा देखील आदर करतो असाही होऊ शकतो.

२. राग दडपून टाकणे: राग दडपलाही जाऊ शकतो आणि नंतर रूपांतरित किंवा पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो. जेव्हा आपण आपला राग मनात दाबून ठेवता, त्याबद्दल विचार करणे थांबवता आणि एखाद्या सकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करता तेव्हा असे घडते. हे करण्यामागे राग रोखणे आणि त्याचे विधायक कृतीत रूपांतर करणे हा आपला हेतू असतो. उदा. जर तुम्हाला तुमच्या पालकांचा राग येत असेल तर तुम्ही तुमची खोली स्वच्छ करून त्या रागाचा सामना आणि निचरा करु शकता; जर तुम्हाला तुमच्या मित्राचा राग आला तर तुम्ही मैदानावर जाऊन एखादा खेळ खेळू शकता. जर तुम्ही सतत तुम्हाला येणारा राग मनातल्या मनात ठेवलात तर त्यामुळे उच्च रक्तदाब, किंवा नैराश्य येऊ शकते. 

जर आपण राग व्यक्त केला नाही तर तो अतिशय घातक रीतीने बाहेर येऊ शकतो आणि इतरांबरोबरच्या आपल्या नात्यावर परिणाम करतो. रागामुळे आपण सतत इतरांना कमी लेखू शकतो. प्रत्येकच गोष्टीवर टीका करण्याचे कारणही राग हे असू शकते.

३. राग शांत होऊ देणे: रागाची तिसरी आणि शेवटची अभिव्यक्ती म्हणजे तुम्ही आतून शांत होऊ शकता. शांत होणे याचा अर्थ केवळ आपल्या बाह्य वर्तनावर नियंत्रण ठेवणे नव्हे तर आपल्या अंतर्गत प्रतिसादांवरही नियंत्रण ठेवणे. हृदयाचे ठोके कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, , स्वत:ला शांत करु शकता आणि भावनांना शांत होऊ देऊ शकता.

राग हा अनेकदा नकारात्मक मानला जातो. आपल्याला शिकवले जाते की दुःख व्यक्त करणे, घाबरणे, हे सर्व ठीक आहे. परंतु राग व्यक्त करणे मात्र चुकीचे आहे. परिणामी, राग कसा हाताळायचा किंवा रचनात्मकपणे तो कसा वापरायचा हे आपल्याला शिकवले जात नाही. रागाला सामोरे जाण्याचे काही मार्ग खाली दिले आहेत.

दीर्घ श्वसन आणि प्राणायाम या गोष्टी राग शांत करण्यासाठी मदत करू शकतात. राग शांत करण्यासाठी काही सोप्या पायऱ्या:

  • तुमच्या पोटातून खोल श्वास घ्या; तुमच्या छातीतून श्वास घेतल्याने तुम्हाला आराम मिळणार नाही. 
  • हळू हळू शांतपणे "शांत शांत किंवा relax" असे शब्द खोल श्वास घेताना उच्चारा. त्याची पुनरावृत्ती करा.
  • कल्पना करा की तुम्ही अतिशय शांत झालेले आहात. ज्यावेळी तुम्ही विश्रांतीची स्थिती अनुभवली होती अशा एखाद्या अनुभवाचे स्मरण करा किंवा तुमच्या कल्पनेचा वापर करून विश्रांतीचा अनुभव घ्या.
  • योगासारखे, ताण निर्माण न करणारे व्यायाम तुमच्या स्नायूंना आराम देऊ शकतात आणि तुम्हाला अधिक शांत वाटू शकते.

दररोज या तंत्रांचा सराव करा.तुम्हाला खूप शांत वाटेल. जेव्हा तणावपूर्ण स्थितीत असाल तेव्हा तुम्ही आपोआप या गोष्टी कराल अशी सवय लावून घ्या.

 

 संतप्त लोक इतरांना शिव्या देऊ शकतात आणि इतरांना मारण्याचा प्रयत्न करू शकतात. जेव्हा आपण रागावतो, तेव्हा आपले विचार स्पष्ट आणि सुसंघटित नसतात. 

या अस्पष्ट विचारांना तर्क करून फाटा देता येतो का ते बघा. उदाहरणार्थ, स्वतःला, "अरे, हे भयानक आहे, ते भयंकर आहे, सर्व काही संपले आहे," असे सांगण्याऐवजी असे सांगा की "हे निराशाजनक आहे आणि मी याबद्दल नाराज आहे हे मला समजते आहे, परंतु हा काही जगाचा शेवट नाही आणि मी करत असलेला राग राग कोणत्याही प्रकारे मूळ गोष्ट दुरुस्त करणार नाहीये."

स्वतःबद्दल किंवा इतर कोणाबद्दल बोलताना "मी कधीच असे केले नाही " किंवा "तू नेहमी असं करतोस/करतेस " यासारख्या वाक्यांपासून सावध रहा. "हा मूर्ख फोन कधीही नीट चालत नाही," किंवा "तू नेहमी गोष्टी विसरतोस/विसरतेस" अशी वाक्ये काही तंतोतंत खरी नसतात. आपला राग न्याय्यच आहे आणि समस्येचे निराकरण करण्याचा कोणताही मार्ग नाहीये अशी भावना सदर वाक्ये निर्माण करतात. तुमच्या चांगल्यासाठी आणि तुमच्या समस्येचे निराकारण करण्यासाठी तुम्हाला मदत करणारी माणसे ही देखील अशाने तुमच्यापासून दूर जातील.

स्वत: ला सांगा की रागाने काहीही ठीक होणार नाही. त्याने तुम्हाला बरे वाटणार नाही (खरंतर तुम्हाला वाईट वाटू शकते. ) स्वतःला आठवण करून द्या की "जग तुम्हाला त्रास देण्यासाठी काम करत नाही", तुम्ही दैनंदिन जीवनातील फक्त काही वाईट काळ अनुभवत आहात. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा तुम्ही असा विचार करा. तुम्हाला छान वाटेल आणि हे तुम्हाला अधिक संतुलित दृष्टिकोन मिळविण्यात मदत करेल.

कधीकधी, तुमचा राग आणि निराशा तुमच्या आयुष्यातील अत्यंत वास्तविक समस्यांमुळे उद्भवते. त्या समस्या सोडवणे प्रत्येकवेळी शक्य असतेच असे नाही. अशावेळी तुम्ही समस्या कशी हाताळता आणि तिला कशा पद्धतीने सामोरे जाता हे महत्त्वाचे ठरते. त्यावर लक्ष केंद्रीत करा.

समस्या सोडविण्याचा एक आराखडा बनवा आणि तुमची प्रगती तपासत रहा. समस्येचे निराकरण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा, परंतु जर लगेच उत्तर मिळाले नाही तर स्वतःला शिक्षा करू नका. जर तुम्ही तुमच्या सर्वंकष प्रयत्नांअंती समस्या सोडवू शकला नाही पण तुम्ही समस्येला सामोरे जाण्याचा गंभीर प्रयत्न मात्र केला असेल तरीही तुमचा संयम वाढेल.

रागामुळे आपण जे बोलायचे नसते ते बोलतो आणि जे करायचे नसते ते करतो. तुम्ही वाद घालत असाल तर पहिली गोष्ट म्हणजे उत्तर देण्यापूर्वी शांत व्हा आणि विचार करा. त्याच वेळी, दुसरी व्यक्ती काय म्हणत आहे ते काळजीपूर्वक ऐका आणि उत्तर देण्यापूर्वी आपला वेळ घ्या.

तुमच्या रागाचे कारण काय आहे ते स्वतः शोधा. उदाहरणार्थ, तुमचे पालक तुमच्याकडून खूप अपेक्षा करतात, तुमच्या मित्रांकडे तुमच्यापेक्षा जास्त पैसे असतात किंवा तुम्हाला नोकरी कशी शोधावी हे माहित नसते असे एखादे तुमच्या रागाचे कारण असू शकते. एकदा तुम्हाला तुमच्या रागाचे कारण कळले की त्यावर उपाय करण्याचा मार्ग शोधा.

 

विनोद किंवा जोक्स हे कधीकधी आपल्याला कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मदत करतात. तथापि, जेव्हा आपण एखाद्या परिस्थितीवर हसता तेव्हा सावधगिरी बाळगा. समस्या निर्माण झाल्या झाल्याच त्यावर हसून ती सोडून देऊ नका. त्याऐवजी, परिस्थितीकडे कमी गांभीर्याने बघा जेणेकरून आपण त्यास सामोरे जाण्याच्या चांगल्या मार्गांचा विचार करू शकाल. दुसरे म्हणजे, जेव्हा तुम्ही एखाद्या परिस्थितीवर हसता तेव्हा इतरांना दुखावू नका . हे राग व्यक्त करण्याचे आणखी एक चुकीचे रूप आहे. या सगळ्या रागावर नियंत्रण ठेवण्याच्या तंत्रात काही साम्य असेल तर ते हे आहे की ही सर्व तंत्रे असे सांगतात की तुम्ही स्वतःला खूप जास्त अति गंभीरपणे घेऊ नका. हसत खेळत जगा.

कधीकधी आपल्या आजूबाजूचा परिसर आपल्या चिडचिडीचे कारण असतो. अडचणी आणि जबाबदाऱ्या यांचा आपल्याला भार होतो आणि "सापळ्यात" अडकल्यासारखे वाटते. तुम्हाला त्या जाळ्यात अडकवणारे सर्व लोक आणि गोष्टी यांचा तुम्हाला राग येऊ शकतो.विश्रांती घ्या. स्वतःसाठी वेळ काढा. तुम्हाला आनंद मिळतो अशा गोष्टी तुम्ही करू शकता. (फुटबॉल, क्रिकेट यासारखे खेळणे, मित्रांशी गप्पा मारणे, संगीत ऐकणे, चित्रपट पाहणे)

दुःख, तीव्र दुःख आणि नैराश्य

दुःख ही एक मानवी भावना आहे. प्रत्येक माणसाला कधी ना कधी त्यांच्या आयुष्यात दुःख होतेच. भावनिक अस्वस्थता किंवा वेदना निर्माण करणार्‍या परिस्थितीत उदास वाटणे ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. दुःखाची वेगवेगळी रुपे असतात. परंतु इतर भावनांप्रमाणेच दुःख तात्पुरते असते आणि कालांतराने नाहीसे होते. म्हणून दुःखाची भावना ही उदासीनतेपासून वेगळी आहे.

नैराश्य हा दीर्घकालीन मानसिक आजार आहे. त्याचा परिणाम तुमच्या कामावर, तुमच्या नात्यांवर, तुमच्या खाण्याच्या आणि झोपेच्या सवयींवर होतो

जर तुमचे दुःख दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकले आणि इतर लक्षणेही सोबत असतील तर याचा अर्थ असा होऊ शकतो की ते फक्त दुःखापेक्षा अधिक काहीतरी आहे. अशावेळी ते उदासीनतेच्या इतर घटकांशी जोडले गेले असेल- उदाहरण ऊर्जा कमी होणे, लक्ष केंद्रित करता न येणे किंवा निर्णय घेता न येणे , झोप न येणे, खाण्याच्या सवयी खूप सतत बदलणे, आशा न वाटणे, निराशेच्या भावना मनात येणे किंवा आत्महत्येचे विचार मनात येणे.

जबरदस्त नुकसान झाल्यावर दुःख होणे ही एक सामान्य प्रतिक्रिया आहे. जर तुम्ही एखादी महत्त्वाची गोष्ट गमावली किंवा एखादी महत्त्वाची व्यक्ती गमावली, तर तुम्ही दीर्घ काळासाठी दुःखाने त्रस्त असू शकता. नैराश्याच्या दोन आठवड्यांच्या निकषापेक्षा जास्त काळ दुःखाची भावना तुमच्या मनात घर करून राहू शकते. तुम्हाला कोणतीही गोष्ट मनोरंजक किंवा आनंददायक वाटत नाही. तुम्ही कशा प्रकारे दुःख करता आणि तुम्ही दुःखाच्या कोणत्या टप्प्यावर आहात यावर हे अवलंबून आहे. अनेक लोक अशा वेळी समुपदेशनाकडे वळू शकतात. मदत घेण्याचा तो एक मार्ग आहे. दुःखाशी सामना करण्यासाठी समुपदेशनाची मदत होऊ शकते.

जर आपण उदास आहोत असे आपल्याला वाटत असेल तर आपण समुपदेशन घ्यायला हवे. नैराश्याच्या आजाराचे निदान झालेले नसेल तरी ते आपल्यासाठी हितकारक असते

जर तुम्ही बराच काळ दुःखी असाल आणि ते दुःख तुमच्या आयुष्यात व्यत्यय आणत असेल, किंवा तुम्ही तणावाशी झुंजत असाल आणि त्याचा तुमच्यावर शारीरिक परिणाम होत आहे असे तुम्हाला वाटत असेल (तुम्ही खात नाही, वजन कमी झाले आहे, झोप नाहीये किंवा अति झोप येते आहे), तर व्यावसायिक मदत घेणे चांगले. अवघड भावनांना सामोरे जाण्याची रणनीती आखण्यासाठी समुपदेशकाची भेट उपयुक्त ठरू शकते. मग तुम्हाला नैराश्य आलेले असो किंवा नको. काही लोकांचे, दुःख आणि तीव्र दुःख मोठ्या नैराश्यात बदलू शकते. "जर तुम्हाला नैराश्याचा त्रास उद्भवतो हे तुम्हाला माहीत असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही भूतकाळात उपचार घेतले असतील, तर गोष्टी वाढण्याची वाट पाहू नका. जेव्हा तुम्ही खूप दुःखी असाल किंवा दुःखाने ग्रस्त असाल, तेव्हा मानसिक आरोग्य क्षेत्रातील लोकांशी बोला.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search