Search

भावनिक बुद्धीमत्ता

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि भवतालच्या व्यक्तींच्या भावना समजून घेण्याची आणि त्या हाताळण्याची क्षमता. उच्च भावनिक बुद्धय़ांक असलेल्या व्यक्तींना स्वतःच्या भावना, त्यांचा अर्थ आणि त्यांचा इतर व्यक्तींवर होणारा परिणाम कळतो.

भावनिक बुद्धय़ांक ही संकल्पना लोकप्रिय करण्यात मोलाचे योगदान असलेले अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॅनियल गोलमन यांच्या मते भावनिक बुद्धिमत्तेचे पाच मुख्य घटक आहेत:

  1. स्व-जागरूकता
  2. स्व-नियमन
  3. प्रेरणा
  4. समानुभूती / संवेदना
  5. सामाजिक कौशल्य

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?

ताण कमी करणे, प्रभावी संवाद साधणे, इतरांप्रती सहानुभूती बाळगणे, आव्हानांवर मात करणे तसेच संघर्ष कमी करणे यासाठी आपल्या स्वतःच्या भावना समजून घेण्याच्या, वापरण्याच्या आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याच्या क्षमतेला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात. मजबूत नातेसंबंध निर्माण करणे, शिक्षणात व कामात यशस्वी होणे आणि आपले करिअर व ध्येय साध्य करणे यासाठी भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला मदत करते. तसेच स्वतःच्या भावनांशी जोडण्यास, हेतू प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास आणि महत्वाच्या बाबींसंबंधी योग्य निर्णय घेण्यास भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला मदत करते.

सर्वसाधारणपणे भावनिक बुद्धिमत्ता चार गुणांद्वारे परिभाषित केली जाते:

  1. स्वःव्यवस्थापन – आपण आपल्या आततायी भावना आणि वर्तन नियंत्रित करू शकणे, आपल्या भावनांचे योग्य मार्गाने व्यवस्थापन करू शकणे. दिलेल्या वचनांचे पालन करू शकणे आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकणे.
  2. स्व-जागरूकता – आपण स्वतःच्या भावना आणि त्यांचा आपल्या विचारांवर व वर्तनावर होणारा परिणाम ओळखणे. स्वतःची ताकद, कमकुवतपणा यांची आपल्याला कल्पना असणे.
  3. सामाजिक सजगता – इतरांच्या भावना, गरजा आणि चिंता समजावून घेऊ शकणे. सामाजिक दृष्ट्या सुरक्षित वाटणे.गट किंवा संस्थेतील गतीशीलता ओळखणे.
  4. नातेसंबंध व्यवस्थापन/हाताळणे – चांगले नातेसंबंध कसे निर्माण करायचे? ते टिकवायचे कसे? समस्या कश्या हाताळायच्या ?तसेच गटाला कसे प्रोत्साहन द्यायचे? त्यांच्यावर प्रभाव कसा पाडायचा? आणि इतरांसोबत चांगले काम कसे करायचे? हे माहित असणे.

भावनिक बुद्धिमत्ता इतकी महत्वाची का आहे?

आपल्याला माहितच आहे की, काही लोक प्रचंड हुशार नसले तरी ते जीवनात यशस्वी झालेले दिसतात. तसेच आपल्याला असेही लोक माहित असतात की, जे शैक्षणिकदृष्ट्या प्रचंड हुशार आहेत मात्र तरीही सामाजिक दृष्ट्या किंवा वैयक्तिक संबंध जोपासण्यात अयशस्वी आहेत. हे खरं आहे की, आपली बौद्धिक क्षमता चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास मदत करू शकते मात्र हेही खरं आहे की, अंतिम परिक्षांना सामोरे जातानाचे तणाव हाताळण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता मदत करते. एका व्यक्तीत एकाच वेळी भावनिक बुद्धिमत्ता आणि बौद्धिक क्षमता असतात तेव्हा ती व्यक्ती सर्वात प्रभावी असते.

भावनिक बुद्धिमत्ता खालील गोष्टींवर परिणाम करते:

  • शैक्षणिक किंवा कामाच्या ठिकाणची कामगिरी: उच्च भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला कामाच्या ठिकाणची सामाजिक गुंतागुंत समजून घेण्यास, नेतृत्व करण्यास, इतरांना प्रेरित करण्यास आणि आपली कामगिरी उंचावण्यास मार्गदर्शन करते. आज जेव्हा नोकरीसाठी उमेदवारांची निवड करण्याचा प्रश्न येतो तेव्हा अनेक कंपन्या तांत्रिक कौशल्याइतकेच भावनिक बुद्धिमत्तेला महत्त्व देतात आणि निवड करण्यापुर्वी उमेदवाराचा भावनिक बुद्ध्यांक तपासतात.
  • शारिरीक आरोग्य: स्वतःच्या भावना हाताळता आल्या नाहीत तर आपल्याला आपला तणाव हाताळता येऊ शकत नाही, त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अनियंत्रित तणाव रक्तदाब वाढवतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो, हृदयविकाराचा झटक्याचा धोका वाढवतो, आणि लवकर म्हातारपणाकडे लवकर वाटचाल सुरू होते. म्हणून तणावांचे व्यवस्थापन करायला शिकणे ही भावनिक बुद्धिमत्तेची पहिली पायरी आहे.
  • मानसिक आरोग्य: अनियंत्रित भावना आणि तणाव आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे आपण चिंता आणि नैराश्याला बळी पडू शकतो. मनाचा गोंधळ उडाला असेल, काय करावे समजत नसेल तर निवांत होणे, स्वतःच्या भावनांचे व्यवस्थापन करणे उपयोगी ठरते. मजबूत नातेसंबंध निर्माण करणे, परिस्थितीविरुद्ध संघर्ष करणे यासाठी देखील ते आवश्यक आहे. अनियंत्रित भावना आणि तणावामुळे आपल्याला एकटेपणा जाणवू शकतो.
  • नातेसंबंध: आपल्याला कोणत्या भावना जाणवतात? त्यांचे नियंत्रण कसे करावे? त्या कशा व्यक्त कराव्यात? हे आपण समजून घेतले, इतरांना काय वाटते हे समजून घेण्यास आपण सक्षम असलो तर आपण अधिक प्रभावी संवाद साधू शकतो व सार्वजनिक तसेच खाजगी जीवनात मजबूत नातेसंबंध निर्माण करू शकतो.
  • सामाजिक बुद्धिमत्ता: स्वतःच्या भावनांशी सूर जुळलेले असण्याला एक सामाजिक परिमाण आहे. सामाजिक बुद्धिमत्तेमुळे आपल्याला शत्रू आणि मित्रातील फरक समजतो. दुसर्‍या व्यक्तीला आपल्यात किती रस आहे याचा अंदाज येतो. ताण कमी करता येतो. सामाजिक सहभाग आणि संवाद यातून आपली चित्तवृत्ती संतुलित ठेवता येते आणि इतरांचे प्रेम आणि आनंद या भावनांचा अनुभव येतो.

भावनिक बुध्दिमत्ता विकसित करण्यासाठीची मुख्य चार कौशल्ये:

भावनिक बुद्धिमत्ता जोपासण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये कधीही शिकता येऊ शकतात. परंतु भावनिक बुद्धिमत्तेविषयी शिकणे आणि ते ज्ञान प्रत्यक्ष आपल्या जीवनात लागू करणे यात फरक आहे. एखाद्या गोष्टीचे महत्त्व आपल्याला कळते याचा अर्थ आपण ती गोष्ट करतोच असे नव्हे. विशेषतः आपण जेव्हा तणावात असतो तेव्हा नव्याने शिकलेली कौशल्ये वापरणे कठीण असते. कठीण प्रसंगात भावनिक बुद्धिमत्ता वापरण्याची आपली इच्छा असेल तर तर दरोजच्या आयुष्यात, नातेसंबंधात तिचा वापर करून तणावाला कसे सामोरे जावे ते शिकणे आवश्यक आहे.

स्वतःची भावनिक बुद्धिमत्ता जोपासणे, स्वतःच्या भावनांच्यावरील ताबा वाढवणे, आणि इतरांशी जोडून घेणे यासाठी पुढील कौशल्ये महत्वाची आहेत.

  • स्वःव्यवस्थापन
  • स्व-जागरूकता
  • सामाजिक सजगता
  • नातेसंबंध व्यवस्थापन/हाताळणे

१) स्व-व्यवस्थापन

भावनिक बुद्धिमत्तेकडे लक्ष देण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या वर्तनाबद्दलचे महत्त्वाचे निर्णय घेताना भावनांचा उपयोग करता यायला हवा. जेव्हा तुम्हाला खूप ताण येतो तेव्हा तुम्ही भावना आणि वर्तनावरील ताबा गमावू शकता.

ज्यावेळी तुम्ही खूप ताणाखाली होता अशी वेळ आठवा. अशावेळी तुम्हाला स्पष्टपणे विचार करणे किंवा तर्कशुद्ध निर्णय घेणे सोपे होते का? बहुतेक नाही! जेव्हा तुम्ही जास्त ताण घेता तेव्हा तुमची स्वतःची तसेच इतरांची भावना स्पष्ट व अचूकपणे जाणून घेण्याची क्षमता कमी होते.

तणाव व्यवस्थापनाविषयी अधिक जाणून घ्या.

भावना आपल्याला स्वतः आणि इतरांबद्दल माहिती देणारा महत्वाचा घटक आहे. मात्र आपण जेव्हा तणावाखाली असतो तेव्हा आपल्याला सगळे अति झालेले असते आणि आपला स्वतःवरील ताबा सुटतो. परंतु ताण हाताळता आला आणि भावना सांभाळता आल्या तर त्रासदायक माहितीसुद्धा आपण स्वतःवरील ताबा न सुटता हाताळू शकतो. मनाला येईल तसं वागण्यापेक्षा भावनांचे योग्य व्यवस्थापन करून, ठरवल्याप्रमाणे वागून बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो.

२) स्व-जागरूकता

तणावाचे व्यवस्थापन करणे ही भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्याची पहिली पायरी आहे. राग, दुःख, भिती आणि आनंद यांसारख्या प्रमुख भावनांचे व्यवस्थापन करण्याची तुमची क्षमता तुमच्या बालपणातील भावनिक अनुभवांचा दर्जा आणि त्यातील सातत्य यावर अवलंबून असते. जर लहानपणी तुमची काळजी घेणार्‍या व्यक्तीने तुमच्या भावना समजून घेतल्या असतील, त्यांची कदर केली असेल तर भावना हा तुमच्या प्रौढवयातील मौल्यवान ठेवा ठरतो. पण जर बालपणीचे तुमचे भावनिक अनुभव दुःखदायक, गोंधळाचे, त्रासदायक असतील असतील तर तुम्ही भावनांपासून दूर राहणेच पसंत करण्याची शक्यता असते. परंतु स्वतःच्या भावनिक अनुभवाशी जोडलेले असणे. क्षणोक्षणी बदलणार्‍या भावनांची जाण असणे हे भावना आपल्या विचारांवर आणि कृतीवर कसा प्रभाव टाकतात हे समजून घेण्यासाठी आवश्यक आहे.

तुम्हाला भावनांचा प्रवाह जाणवतो का? प्रसंगानुरूप क्षणोक्षणी बदलत जाणाऱ्या तुमच्या भावना तुम्ही अनुभवता का?

आपल्या भावना शारीरिक संवेदनांशी संलग्न असतात, त्यांचे परिणाम तुम्ही पोट, घसा किंवा छाती सारख्या अवयवांवर अनुभवता का?

 

दुःख, राग, आनंद, भिती यातील प्रत्येक भावनेचा परिणाम चेहर्‍यावर पडतोच, तो तुम्ही अनुभवता का?

तुमचे व इतरांचे लक्ष वेधण्याइतपत तीव्र भावना तुम्ही अनुभवू शकता का?

तुम्ही तुमच्या भावनांकडे लक्ष देता का? त्यांचा तुमच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पडतो का?

तुम्हाला हे कोणतेही अनुभव जाणवले नसतील तर तुम्ही भावनाच नाकारल्या किंवा बंद केल्या असतील. भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी आणि भावनिकदृष्टया निरोगी होण्यासाठी आपल्या गाभ्याच्या भावनांशी पुन्हा जोडले जाणे, त्यांना स्वीकारणे आवश्यक आहे. यासाठी आपण सचेतना (mindfulness) या ध्यानधारणेतील संकल्पनेचा उपयोग करू शकतो.

सचेतना ही तुमच्या प्रत्येक चालू क्षणाकडे, मोकळेपणाने लक्ष केंद्रित करण्याची क्रिया आहे. याची मुळे बौद्ध धर्मातील तत्वज्ञानात आहेत, मात्र जवळपास सर्वच धर्मात कमी अधिक फरकाने हा ध्यान धारणेचा प्रकार दिसून येतो. सचेतना ध्यानधारणा तुमचे अनेकविध गोष्टीत गुंतलेले मन, तुमच्या शारीरिक मानसिक संवेदनांकडे वळवण्यास मदत करते आणि जीवनाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन देते. या प्रक्रीयेमुळे तुमची मनःशांती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता व स्वतः विषयीची जागरूकता वाढते.

भावनांविषयी सजग होणे

भावनिक जागरूकता विकसित करण्यासाठी तुम्ही आधी ताणतणावांचे व्यवस्थापन करायला शिकणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अप्रिय भावना कश्या अनुभवता, त्यांना कसा प्रतिसाद कसा देता याकडे पाहणे तुम्हाला अधिक सोपे जाईल. 

३) सामाजिक सजगता

संवादाच्या वेळी व्यक्ती एकमेकांना आशाब्दिक संकेत देत असतात. हे संकेत घ्यानात घ्यायला आणि त्याचा अर्थ ओळखायला शिकणे हे सामाजिक सजगतेमुळे शक्य होते. इतरांना खरोखर काय वाटते? त्यांची मनस्थिती कशी बदलते? आणि त्यांच्यासाठी खरोखर काय महत्वाचे आहे याची कल्पना येण्यासाठी हे संकेत उपयोगी पडतात.

जेव्हा लोकांचे अनेक गट सारखेच आशाब्दिक संकेत देतात तेव्हा आपल्याला त्यातून त्यांच्यातील सत्तासंबंध आणि त्यांच्या सामायिक भावना समजतात.

भावनिक आणि सामाजिक सजगतेसाठी सचेतना (mindfulness) आवश्यक आहे.

सामाजिक सजगतेच्या प्रक्रियेत सचेतनेचे महत्व ओळखणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्या डोक्यात सतत विचार चालू असतात, किंवा आपण मोबाईल बघत असतो तेव्हा आपण सूक्ष्म, अशाब्दिक संकेत समजावून घेऊ शकत नाही. तनमन एकत्र असणे हे सामाजिक सजगतेसाठी गरजेचे आहे. आपण बरेचजण एकावेळी अनेक कामे करता येण्याच्या ( मल्टीटास्किंग) आपल्या कौशल्याचा अभिमान बाळगतो मात्र यामुळे अनेकदा अशाब्दिक संवाद, संकेत याकडे आपले दुर्लक्ष होतं.

  • मनातील इतर विचार बाजूला ठेवून, परस्परसंवादावरच लक्ष केंद्रित करण्यातून आपले सामाजिक हेतू सिद्ध होण्याची शक्यता वाढते.
  • दुसर्‍या व्यक्तीच्या भावनिक प्रतिसादांचा मागोवा प्रभावीपणे घेणे ही एक देवाण घेवाणीची प्रक्रिया आहे. त्यासाठी आपल्याला स्वतः च्या भावनिक अनुभवांतील बदलांबाबत देखील सजग असावे लागते.
  • दुसर्‍याकडे लक्ष दिल्यामुळे तुमचे आत्मभान कमी होत नाही तर दुसर्‍यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ दिल्यामुळे व त्यासाठी मेहनत घेतल्यामुळे अनायसे आपल्याला स्वतःची भावनिक स्थिती, मूल्ये, धारणा याबद्दल अंतदृष्टी प्राप्त होते.

४) नातेसंबंधांचे व्यवस्थापन

लोकांसोबत पटणे ही एक प्रक्रिया असते. भावनिक सजगता आणि इतर लोक कशातून जात आहेत हे ओळखण्याची व समजून घेण्याची आपली क्षमता हे या प्रक्रीयेसाठी आवश्यक असलेले मूलभूत घटक आहेत. आपण भावनिकदृष्ट्या जागरुक असल्यास नाती अधिक प्रभावी, फलदायी व परिपूर्ण बनवणारी सामाजिक व भावनिक कौशल्ये आपण शिकून घेऊ शकतो.

  • आपण अशाब्दिक संकेत किती प्रभावीपणे वापरू शकतो याबद्दल जागरूक असणे: आपले विचार आणि भावना याबद्दल आपण नेहमी आपले विचार आणि भावना याबद्दल आपण नेहमी nonverbal messages इतरांसोबत शब्दहीन संकेतांची देवाणघेवाण करतो, ती टाळणे अशक्य आहे. चेहर्‍यावरील अनेक स्नायू विशेषतः डोळे, नाक, तोंड आणि मस्तक यांच्या जवळचे स्नायू आपल्या स्वतःच्या भावना व्यक्त करण्यास तसेच इतरांच्या भावना समजून घेण्यास मदत करतात. आपल्या मेंदूतील भावनिक भाग सतत जागा असतो आणि आपण त्यांच्या संदेशांकडे दुर्लक्ष केले तरी त्याकडे इतरांचे लक्ष असते. आपण इतरांना देत असलेले शब्दहीन संदेश आपले नातेसंबंध सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
  • ताण हलका करण्यासाठी विनोद व खेळांचा वापर करा: नर्मविनोद, हास्य व खेळ हा ताणतणावावरील नैसर्गिक उतारा आहे. हास्याविनोदामुळे आपला ताण कमी होतो, मज्जासंस्था संतुलित राहते,आपले मन शांत व तरतरीत होते आणि मनामध्ये दुसर्‍याप्रति सहानुभाव जागृत होतो.
  • भांडण, असहमती याकडे संधी म्हणून पहायला शिका: भांडणे व मतभेद मानवी संबंधांमध्ये अपरिहार्य आहेत. दोन व्यक्तींची मते, गरजा आणि अपेक्षा नेहमी समान असू शकत नाहीत आणि असे असणे ही काही वाईट गोष्ट नाही. योग्य मार्गाने मतभेद दूर करणे हे नात्यातील विश्वास दृढ करण्यासाठी महत्वाचे आहे. मतभेद, भांडणं यांना मनभेद, शिक्षा समजले नाही तर त्यामुळे नातेसंबंधातील स्वातंत्र्य, सर्जनशीलता, सुरक्षितता वाढते.

भावनिक बुद्धिमत्ता कशी मोजायची?

भावनिक बुद्धिमत्ता पातळीचे मोजमाप करण्याच्या निरनिराळ्या मूल्यमापन पद्धती आहेत. सर्वसाधारणपणे हे मूल्यमापन दोन प्रकारे केले जाते: स्व-अहवाल (self report), क्षमता चाचणी ( ability test)

स्व-अहवाल चाचणी घेणे आणि देणे खूप सोपे असल्याने ही चाचणी सर्वात लोकप्रिय आहे. या चाचणीत, स्वतःच्या वर्तनाचे मूल्यमापन करणारे प्रश्न आणि विधाने यांना प्रतिसाद द्यायचा असतो. उदाहरणार्थ एक विधान पाहू: मला नेहमी असे वाटते की, मी इतरांच्या भावना समजू-उमजू शकतो. या विधानाच्या उत्तरासाठी सर्वसाधारणपणे चाचणी घेणारा असहमत, पूर्ण असहमत, सहमत, पूर्ण सहमत असे पर्याय देतो.

जर तुम्हाला तुमच्या भावनिक बुद्धिमतत्तेचे मूल्यांकन करायचे असेल तर येथे क्लिक करा.

भावनिक बुद्धीमत्तेचे परिणाम

अलिकडच्या वर्षांमध्ये भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता शिकवण्याचे व शिकण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनेक शाळांमध्ये हा विषय शालेय अभ्यासक्रमातील महत्वाचा विषय म्हणून शिकवला जातो.

या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट केवळ मानसिक आरोग्य सुधारणे नाही तर त्यासोबतच विद्यार्थ्यी शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी होणे, दादागिरी रोखणे हे देखील आहे. भावनिक बुद्धिमत्ता आपल्या दैनंदिन आयुष्यात कशी उपयुक्त ठरते याची अनेक उदाहरणे आहेत.

प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करणे

भावनिक बुद्धिमत्ता विकसित असलेल्या व्यक्तींना भावनेची ताकद आणि क्षणिकता ठाऊक असते. जेव्हा सोबत काम करणारी व्यक्ती राग, चीड येईल असे वागते तेव्हा भावनिक बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती प्रतिसाद देण्यापूर्वी थोडा वेळ घेते, मन शांत करते. आणि तर्कशुद्ध, सारासार विचार करून प्रतिसाद देते.

स्व-जागरूकता वाढवणे

भावनिक बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती केवळ इतरांना काय वाटते, त्यांच्या भावना याचा विचार करत नाहीत तर स्वःच्या भावनांबद्दलही विचार, आकलन करतात. स्व- जागरूकतेमुळे भावानांवर प्रभाव टाकणारे अनेक घटक आपल्या लक्षात येतात.

इतरांविषयी सहानुभूती असणे

लोक काय विचार करतात, त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घ्यायला भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला सक्षम करते. आपण विशिष्ट परिस्थितीत त्या व्यक्तीच्या ठिकाणी असतो तर कसे वागलो असतो याचा विचार आपण करू शकतो.

भावनिक बुद्धिमत्ता विकसित असलेल्या व्यक्ती इतर माणसांचा दृष्टिकोन, भावना, अनुभव लक्षात घेऊन त्यांच्या वर्तवणूकीचे विश्लेषण करतात.

भावनिक बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा?

भावनिक बुद्धिमत्ता आपल्या दैनंदिन जीवनात निरनिराळ्या प्रकारे वापरली जाऊ शकते. ती वापरण्याचे काही प्रकार खालील प्रमाणे:

  • टीका आणि जबाबदारी स्वीकारायला शिकणे
  • स्वतःची चूक स्वीकारून त्यातून पुढे जाणे
  • जेव्हा नाही म्हणण्याची गरज असते तेव्हा नाही म्हणणे
  • आपले अनुभव, भावना इतरांना सांगता येणे
  • सर्वांना फायदा होईल अशाप्रकारे समस्यांचे निराकरण करता येणे
  • इतरांबद्दल समानुभूती / संवेदना असणे
  • उत्तम श्रवण कौशल्य असणे
  • आपण करत असलेल्या गोष्टी आपण का करत आहोत म्हणजेच त्या गोष्टी करण्यामागील आपला हेतू काय आहे याची जाणीव असणे
  • इतरांच्या बाबतीत न्यायाधीशाच्या भूमिकेत न वावरणे

परस्परांमधील प्रभावी, उत्तम संवादासाठी भावनिक बुद्धिमत्ता अत्यंत महत्वाची आहे. काही तज्ञ असे मानतात की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्तेपेक्षा भावनिक बुद्धिमत्ता महत्वाची ठरते.

भावना समजून घेणे ही चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठीच्या व प्रभावी संभाषणासाठीच्या कौशल्याची गुरुकिल्ली आहे. 

भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्याकरीता टिप्स:

भावनिक बुद्धिमत्ता असणे महत्त्वाचे आहे. सामाजिक व भावनिक बुद्धिमत्ता सुधारण्यासाठी काय करता येईल? इथे काही टिप्स देत आहोत.

  • श्रवण: 

भावना समजून घेण्यासाठी त्या व्यक्तीकडे लक्ष द्या. ही भावना समजून घेण्याची पहिली पायरी आहे. शब्द वापरुन आणि शब्दांशिवाय लोक तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करत आहेत याच्याकडे लक्ष द्या. दहबोलीला खूप अर्थ असतो. जेव्हा तुम्हाला व्यक्तीच्या विशिष्ट भावना जाणवतात तेव्हा त्यासाठी कारणीभूत असलेल्या संभाव्य घटकांचा विचार करा.

  • सहानुभाव:

दुसर्‍याच्या भावना ओळखता येणे महत्त्वाचे आहे. मात्र त्याचवेळी त्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण असतो तर आपण काय केले असते? ही कल्पना करणेही गरजेचे आहे. त्यातून आपण दुसर्‍याचा दृष्टिकोन खर्‍या अर्थाने समजू शकतो. इतरांप्रती सहानुभाव बाळगण्याचा सराव करा. तुम्ही त्यांच्या परिस्थितीत असाल तर तुम्हाला कसे वाटेल याची कल्पना करा. विशिष्ट परिस्थितीचे आकलन होण्यासाठी हा सराव तुम्हाला उपयोगी पडेल तसेच उत्तम भावनिक कौशल्ये विकसित होण्यासाठी देखील त्याची मदत होईल.

  • चिंतन:

भावनांमधील सारासार विवेक शोधता येणे हा भावनिक बुद्धिमत्तेतील महत्त्वाचा घटक आहे. तुमच्या भावना तुमच्या वर्तनावर आणि निर्णय प्रक्रियेवर किती प्रभाव टाकतात याचा विचार करा. इतरांच्या वर्तवणूकीचा विचार करताना, त्यामागे कोणत्या भावना असतील याचा विचार करा

या व्यक्तीला असे का वाटते? या भावनांच्या मुळाशी आजपर्यंत ध्यानात न आलेले काही दुर्लक्षित घटक असतील का? त्यांच्या आणि तुमच्या भावना का वेगळ्या आहेत? तुम्ही जेव्हा अशा प्रश्नांचा धांडोळा घ्याल तेव्हा विचार आणि वर्तन यावर भावना कसा प्रभाव टाकतात हे समजणे सोपे जाईल.

नोकरीच्या / कामाच्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता का महत्त्वाची ठरते?

नोकरीच्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता हे महत्त्वाचे कौशल्य का मानले जाते? नोकरीसाठी उमेदवारांची निवड करणाऱ्या व्यवस्थापकांच्या एका सर्वेक्षणनुसार, जवळपास 75% व्यवस्थापक उमेदवाराच्या भावनिक बुद्धिमत्तेला त्याच्या बुद्धिमत्तेपेक्षा अधिक प्राधान्य देतात.

भावनिक बुद्धिमत्ता हे एक मौल्यवान कौशल्य असल्याचे आता सर्वत्र मान्य झाले आहे. संवाद कौशल्य,व्यवस्थापन कौशल्य,प्रश्न निराकरण कौशल्य, आणि कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. प्रशिक्षण आणि सराव यातून हे कौशल्य विकसित करता येते असे संशोधकांचे मत आहे.

उच्च भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती
  • योग्य निर्णय घेतात व समस्या सोडवतात
  • ताणतणावत शांत राहतात
  • भांडणे, मतभेद सोडवतात
  • अधिक सहानुभाव बाळगतात
  • विधायक टीका समजून घेतात, त्यावर विचार करतात आणि त्याला प्रतिसाद देतात
कमी भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती
  • स्वतः पीडित असल्यासारखे वागतात किंवा चुकांची जबाबदारी घेणे टाळतात
  • त्यांची संवादशैली प्रभावहीन किंवा आक्रमक असते.
  • संघभावनेने काम करणे टाळतात  
  • इतरांवर जास्त टिका करतात किंवा इतरांची मते नाकारतात

 प्रेरीत होणे

प्रेरणा हा भावनिक बुद्धिमत्तेतील आणखी एक महत्वाचा घटक आहे. ज्या व्यक्तींजवळ उच्च भावनिक बुद्धिमत्ता आहे त्या व्यक्ती स्वतःचे लक्ष साध्य करण्यासाठी अधिक प्रेरीत असतात. इतर कोणीतरी कौतुक करेल, परितोषिक देईल या हेतूने त्या काम करत नाहीत तर स्वतः ला अर्थपूर्ण वाटणार्‍या व स्वतः ला ज्याची आस आहे अशा गोष्टी ते करतात.

पैसा, प्रतिष्ठा, प्रशंसा महत्वाचे आहे. मात्र करिअरमध्ये अधिक यशस्वी असलेले लोक याहून अधिक गोष्टींनी प्रेरीत झालेले असतात. ते ज्या गोष्टी करतात त्या उत्कटतेने करतात. त्यांना कामाप्रति बांधिलकी असते. नवीन आव्हाने स्वीकारणे त्यांना आवडते आणि त्यांचा उत्साह संसर्गजन्य असतो. कठीण प्रसंगी कामाशी असलेली बांधिलकी ते सोडून देत नाहीत. सतत भरपूर कष्ट करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी ते सोबताच्या व्यक्तींना प्रेरणा देतात.

तुमच्या कामापैकी तुम्हाला आवडणार्‍या भागावर लक्ष केंद्रीत करा. कामाच्या ठिकाणी आवडणारी, नावडणारी कामे करावी लागतात. मोठ्ठा प्रकल्प पूर्ण केल्यानंतरची भावना किंवा तुमच्या ग्राहकाला त्याचे हेतू साध्य करण्यासाठी केलेली मदत यासारख्या तुम्हाला आवडणार्‍या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करा. तुमच्या कामातील अशा जागा शोधा आणि त्यावर लक्ष केंद्रीत करा.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक व्यक्ती कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांना कसे प्रेरीत करतात याकडे लक्ष द्या. अश्या प्रकारचा दृष्टिकोन स्वीकारल्याने तुम्हाला कामाबद्दल सकारात्मकता वाटण्यास मदत होते.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search