Search

समवयस्कांचा दबाव कसा हाताळावा?

समवयस्कांचा दबाव (पीअर प्रेशर) म्हणजे काय?

समवयस्क व्यक्तींमध्ये सामावले जाण्यासाठी आपण विशिष्ट प्रकारे वागले पाहिजे याचा ताण म्हणजे समवयस्कांचा दबाव किंवा पीअर प्रेशर. हा दबाव आंतरिक किंवा बाह्य असू शकतो. चांगल्या किंवा वाईट गोष्टी करण्याचा दबाव असू शकतो. अगदी दहाव्या वर्षापासून शाळेत गट तयार होण्यापासून सुरुवात होऊन इतर अनेक मुद्द्यांबाबत समवयस्कांचा दबाव यायला सुरुवात होते. प्राथमिक शाळेत व माध्यमिक शाळेत शिकत असताना, किशोर वयाच्या संपूर्ण काळात हा दबाव वाढत जातो.

अगदी सुरुवातीपासूनच पालक आपल्या मुलांना योग्य निर्णय कसे घ्यायचे हे शिकवत असतात परंतु जसजसे वय वाढते तसा पालकांचा प्रभाव कमी होतो आणि मित्रांचे मत अधिक महत्त्वाचे बनते. समवयस्कांच्या दबावाचा विचार, कृती आणि वर्तन यापासून ते शैक्षणिक कामगिरी, मादक पदार्थाचा वापर आणि मानसिक आरोग्य यावर परिणाम होऊ शकतो.

लहान मुले आणि किशोरवयीन मुले यांच्यावर असलेल्या समवयस्कांच्या दबावाचे भिन्न भिन्न प्रकार आहेत. जसे की उघड किंवा छुपा दबाव , प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव, नकारात्मक किंवा सकारात्मक दबाव.

जेव्हा मित्र एकमेकांना खालील गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देतात तेव्हा तो सकारात्मक दबाव असतो.

  • शाळेत पुढे असणे 
  • सकारात्मक कृतींमध्ये सहभागी असणे. 
  • स्वयंसेवक म्हणून काम करणे. 
  • पौष्टिक आहार घेणे
  •  ड्रग, दारू आणि इतर घातक कृती टाळणे.
  •  किशोरवयीनांना मित्र हे एकमेकांना चांगली सामाजिक कौशल्ये आणि संवाद कौशल्ये शिकवतात. अडचणींतून मार्ग काढायला मदत करतात आणि योग्य सल्ला देतात.

मित्रांच्या सकारात्मक दबावामुळे आपलेपणाची भावना वाटते आणि आत्मविश्वास वाढायला मदत होऊ शकते.

परंतु, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे आवश्यक असेल तेव्हा नाही म्हणायला शिकले नाहीत तर चांगल्या गोष्टी करण्याचा दबाव देखील किशोरवयीन मुलांसाठी हानिकारक ठरू शकतो.उदाहरणार्थ, गृहपाठ करायचा असेल तर मैत्रीण म्हणाली तरी चित्रपट बघायला जायला नाही म्हटले पाहिजे. नेहमी इतरांना जे हवे आहे तसे वागल्यामुळे किशोरवयीन मुलांचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो आणि त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष्य होऊ शकते.

जी गोष्ट चुकीची आहे हे माहीत आहे ती गोष्ट करण्याचा दबाव जाणवणे म्हणजे समवयस्कांचा नकारात्मक दबाव. जसे की,

  •  धूम्रपान ,
  •  मद्यपान, 
  • ड्रग्स घेणे, 
  • चोरी,
  • फसवणूक,
  • दादागिरी (बुलिइंग)
  • वर्ग बुडविणे किवा 
  • लैंगिक संबंध ठेवणे. 

किशोरवयीन मुले समवयस्कांच्या नकारात्मक दबावाला बळी पडतात कारण त्यांना मित्रांच्या गटात फिट बसायचे असते, त्यांना चिडवले जाण्याची भीती वाटत असते किंवा इतर मुले करत असलेल्या गोष्टी त्यांना करून बघायच्या असतात. प्रौढपणीदेखील समवयस्कांचा नकारात्मक दबाव येतो म्हणूनच किशोर वयात त्याला तोंड द्यायला शिकावे लागते. समवयस्कांच्या नकारात्मक दबावाचा मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शैक्षणिक कामगिरीवर बिघडणे, आत्मविश्वास कमी होणे, कुटुंबीय व इतर मित्रांबरोबरच्या नात्यात अंतर पडणे, नैराश्य किंवा चिंता वाढणे इत्यादि परिणाम संभवतात. उपचार न केल्यास,किशोरवयीन मुले स्वत:ला हानी पोचवू शकतात किंवा त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ शकतात.

समवयस्कांच्या नकारात्मक दबावाचा मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शैक्षणिक कामगिरीवर बिघडणे, आत्मविश्वास कमी होणे, कुटुंबीय व इतर मित्रांबरोबरच्या नात्यात अंतर पडणे, नैराश्य किंवा चिंता वाढणे इत्यादि परिणाम संभवतात. उपचार न केल्यास,किशोरवयीन मुले स्वत:ला हानी पोचवू शकतात किंवा त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ शकतात.

वैयक्तिक संवाद जसा सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो, तसाच सोशल मीडियाद्वारे होणार्‍या संवादाचा देखील सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. समाज माध्यमे सतत उपलब्ध असतात, त्यामुळे त्यावरील संदेश हे दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 ही दिवस मिळू शकतात. याचा अर्थ असा की समाजमाध्यमांमध्ये नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही बाजूंनी समवयस्क दबावाची भावना वाढवण्याची मोठी क्षमता आहे.

समाज माध्यमांवर लोक त्यांच्या आयुष्यातील आनंदाच्या, यशाच्या बातम्या पाठवतात त्यामुळे त्यांच्या आयुष्याचे एक खोटे चित्र तयार होते. त्यामुळे किशोर वयीन मुले त्यांच्या आयुष्याच्या खर्‍या चित्राची इतरांच्या समाज माध्यमांतील चित्रांमध्ये दिसणार्‍या लोभस चित्राशी तुलना करतात आणि त्यांच्यासारखे आयुष्य असण्याचा ताण घेतात. तेथे आपल्या अभिव्यक्तीवर वैयक्तिक अभिप्राय देणारे पालक, शिक्षक असे कोणी नसते त्यामुळे मुले समाज माध्यमांवर हानिकारक मजकूर, अपमानकारक टिप्पण्या टाकतात. समोरासमोर बोलताना ज्या गोष्टी ते बोलले नसते ते येथे बोलतात. ही गोष्ट (ज्याला ट्रोलिंग म्हणतात) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आढळते. समवयस्कांच्या नकारात्मक दबावाचे हे एक उदाहरण आहे. समाज माध्यमांवरून मुलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतील अशी हानिकारक आव्हाने (चॅलेंज) दिल्याची उदाहरणे देखील आहेत.

सुदैवाने,समाजमाध्यमे समवयस्कांचा सकारात्मक दबाव निर्माण करण्याचेदेखील काम करतात. उदाहरणार्थ, चांगल्या कामांना दानशूरपणे मदत करणारे गट किंवा प्रेरणादायक गोष्टी दाखवणारी पाने (पेजेस) असतात. सोशल मीडियाचा वापर केल्याने आपण लांब असलेले कुटुंबीय आणि मित्रांशी जोडलेले राहू शकतो. जे पूर्वी शक्य नव्हते.

स्क्रीन आणि समाजमाध्यमांच्या युगात पालकांनी मुलांना चांगल्या डिजिटल सवयी शिकवणे महत्वाचे आहे.

समवयस्कांचा दबाव हाताळण्यासाठी किशोरवयीन मुले पुढीलप्रमाणे काही गोष्टी करू शकतात:

  • कोणत्याही परिस्थितीत पडण्याआधी आपली मूल्ये आणि दर्जा काय आहे ते नक्की करणे.
  • तुमच्यासारखी मूल्ये असलेले चांगले मित्र निवडा. चांगले मित्र सकारात्मक दबाव वापरुन आपल्यातील चांगले बाहेर काढण्यासाठी मदत करतात.
  • जेथे तुम्हाला करायच्या नाहीत अशा गोष्टी इतर लोक करत आहेत अशी परिस्थिती टाळा.
  • कोणतीही गोष्ट करण्यामागील तुमच्या कारणांचा विचार करा : ही योग्य कारणं आहेत का? तुम्ही तुमच्या मूल्यांशी आणि स्वतःशी प्रामाणिक आहात का? तुमच्या निर्णयांचे आणि कृतींचे काय परिणाम होतील याचा विचार करा, जसे की त्या कृतीमुळे तुमच्या आरोग्यावर काही परिणाम होईल किंवा तुम्ही अडचणीत याल.
  • नकार द्यायच्या पद्धतींचा सराव करा. – आवश्यक असल्यास सबबी सांगा. जसे की तुम्ही अडचणीत येऊ इच्छित नाही, शरीराला किंवा मनाला इजा होणं किंवा क्रिडा किंवा शेक्षणिक क्षेत्रातील तुमचा सहभाग तुम्ही धोक्यात आणू शकत नाही.
  • तुमचे पालक किंवा विश्वासू प्रौढ व्यक्तीबरोबर तुम्हाला समवयस्कांच्या दबावाला कसे सामोरे जावे लागत आहे त्याविषयी बोला आणि ते काय सल्ला देतील तो ऐका.
  • तुमचे आईवडिल किंवा इतर विश्वासार्ह प्रौढांसोबत, एक सांकेतिक शब्द तयार करा, ज्याचा वापर तुम्ही प्रौढांना हे सांगण्यासाठी करू शकता की तुम्हाला वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे पण त्याबद्दल बोलू शकत नाही.

समवयीन मुलांसोबत जुळवून घेण्यासाठी किशोरवयीन मुलांना वापरता येतील अशी असंख्य कौशल्ये आहेत. लोकांबरोबर प्रभावीपणे काम करणे, अर्थपूर्ण मैत्री करणे आणि भविष्यात जोडीदार आणि कुटुंबासोबत निरोगी संबंध निर्माण करणे यासाठी देखील अनेक कौशल्ये गरजेची असतात. पौगंडावस्थेमध्ये समवयस्कांचे महत्त्व वाढले तरी पालक त्यांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावत असतात.जटिल सामाजिक परिस्थिती हाताळण्यासाठी मुलांना मदत करणे हा त्या भूमिकेतील एक महत्त्वाचा भाग आहे. यात त्यांना प्रभावीपणे “नाही” म्हणायला शिकवण्याचा समावेश होतो__ स्वतःची स्थिती स्पष्टपणे सांगणे, स्वतःच्या मुद्द्यावर ठाम राहणे आणि त्याचवेळी नाती जपणे. आपल्या मुलांना समवयस्कांच्या नकारात्मक दबावासाठी तयार करण्यास मदत करणे याचा यामध्ये समावेश होतो.

समवयस्कांचा नकारात्मक दबाव टाळण्यासाठी आणि निरोगी मार्गाने प्रतिसाद देण्यासाठी किशोरवयीन मुलांना काही टिप्स:

  1. लहानपणापासूनच आपल्या मुलाशी मुक्त संवाद करता येईल असे वातावरण जोपासा. त्यांनी पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या दबावाबद्दल त्यांना कसे वाटले याविषयी त्यांच्याशी बोलण्याची संधी शोधा.तुम्हाला त्यांचे ऐकण्यात रस आहे हे त्यांना कळू द्या आणि गरज पडल्यास त्यांना मदत करा.

  2. समवयस्कांचा दबाव हाताळण्यासाठी तुम्ही कोणते मार्ग वापरता किंवा त्याबाबतीतले तुमचे अनुभव काय आहेत याविषयी त्यांच्याबरोबर बोला. तुमचे मित्र आणि कुटुंब यांच्याबरोबरच्या तुमच्या नात्याचे चांगले उदाहरण घालून द्या.

  3. स्वतः च्या मर्यादा कशा आखाव्या आणि संवादामध्ये ठाम कसे राहावे हे मुलाला शिकवा. नकारात्मक परिस्थितीमध्ये ते स्वतःचे म्हणणे कसे मांडतील या विषयी त्यांना विचार करायला सांगा आणि वेगवेगळ्या पद्धतीने नकार कसा देता येईल याचा सराव घ्या.  

  4. जेव्हा तुम्हाला खरेच नाही म्हणायचे असेल तेव्हा नाही म्हणा हे पौगंडावस्थेतील मुलांना शिकवा. नाही म्हणजे नाही असाच अर्थ असावा. नाहीचा अर्थ 'कदाचित चालेल' असा असू नये. आपल्याला नक्की कोणता प्रतिसाद द्यायचा आहे याची खात्री नसणे किंवा मनात अनिश्चितता असणे ही समजण्यासारखी बाब आहे पण जेव्हा खात्री नसते तेव्हा आपण स्पष्टपणे "मला माहित नाही" किंवा "मला याबद्दल विचार करण्याची गरज आहे" असे म्हटले पाहिजे. तुमच्या किशोरवयीन मुलांनी त्यांची स्थिती ठामपणे पण शांतपणे स्पष्ट केली पाहिजे. ते कदाचित म्हणतील, “नाही. धन्यवाद. यात मी सहभागी होणार नाही. "

  5. देहबोलीवर लक्ष ठेवा- आपल्या किशोरवयीन मुलांना आठवण करून द्या की शब्द आपण सांगत असलेल्या कथेचा फक्त एक छोटासा भाग आहेत. आपण इतरांशी काय संवाद साधतो यामध्ये शारीरिक भाषा देखील एक मोठा घटक आहे. हसत हसत नाही म्हणणे आणि कुणाकडे तरी झुकणे या कृती मिश्र संकेत देऊ शकतात. नाही हे स्पष्टपणे सांगितले जाते जेव्हा तुम्ही तुमच्या मतावर ठाम असता, नजरेला नजर देऊन बोलता आणि शांत राहता. कधीकधी फक्त दूर जाणे आणि संभाव्य समस्यांपासून स्वतःला दूर करणे हा सर्वोत्तम पर्याय असतो.

  6. पर्याय द्या - कधीकधी किशोरवयीन मुले नाही म्हणण्यास संकोच करू शकतात कारण त्यांना असे वाटते की ते मित्रांमध्ये लोकप्रिय राहणार नाहीत.कोणालाही इतरांपेक्षा वेगळे व्हायचे नसते किंवा ते मित्रांना त्यांच्या वागण्यावरून कमी लेखत आहेत असे दिसायचे नसते. पर्याय देणे ही किशोरवयीन मुलांना शिकविण्याची उपयुक्त पद्धत आहे. उदाहरणार्थ, एक मित्र वर्ग बुडवण्यासाठी दबाव टाकत असेल तर, “मी वर्गात जात आहे. पण लगोर खेळण्यासाठी मी शाळेनंतर तुला भेटेन. ” असा प्रतिसाद किशोरवयीन मुले देऊ शकतात.

  7. मूल्ये मजबूत करा- जेव्हा किशोरवयीन मुले त्यांच्यासाठी योग्य निवड करतात आणि त्यावर ठाम राहतात, तेव्हा ते स्वतः ची मूल्ये व्यक्त करायला शिकतात. एका व्यक्तीसाठी जे ठीक असेल ते दुसऱ्या व्यक्तीसाठी ठीक नसू शकते. आपल्या किशोरवयीन मुलांना याची आठवण करून द्या की त्यांनी स्वतःच स्वतःसाठी निवड करायची आहे. ते कशाला महत्त्व देतात, त्यांची मूल्ये काय आहेत हे त्यांनी स्वतः ठरवायचे आहे, त्यांच्या मित्रांनी नाही. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सीमारेषा आखणे आणि त्यांनी निवडलेल्या मूल्यांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करणे हे पालक म्हणून आपल्या हातात आहे.

  8. सराव- जेव्हा किशोरवयीन मुलांना नवीन पद्धती, धोरणे यांचा सराव करण्याची संधी मिळते, तेव्हा वास्तविक जीवनात कौशल्ये वापरण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो.

  9. भूमिका नाट्य हा नाही म्हणण्याचा सराव करण्याचा सर्वात स्पष्ट मार्ग आहे. थोडा वेळ काढून मुलाशी/ मुलीशी संभाव्य परिस्थिती विषयी बोला. उदाहरणार्थ, ते पार्टीला गेलेत आणि तेथे कोणतेही पालक उपस्थित नाहीत किंवा त्यांना दारू प्यायलेल्या व्यक्तीसोबत प्रवास करायला लागणार आहे. तुम्ही दिलेल्या नमुना परिस्थितीचा विचार करण्यासाठी त्यांना वेळ द्या आणि त्त्यांना विचारा की ते कसा प्रतिसाद देतील.

  10. शिकण्याजोगे क्षण शोधा- भूमिका नाट्य करणं हे काही तरुणांना खूप जास्त दडपणा सारखं वाटू शकते. अशावेळी, टीव्ही किंवा चित्रपटातील परिस्थितीचा उदाहरण म्हणून वापर करण्याचा एक पर्याय म्हणून विचार करा. अशा परिस्थितीला तू कसा प्रतिसाद दिला असतास ते विचारा किंवा जेव्हा तुम्ही एकत्र प्रवास करत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या रस्त्यावर वास्तविक जीवनातील एखादा 'शिकण्यासारखा क्षण' देणारा प्रसंग नजरेस पडू शकतो. तुम्हाला काय जाणवले त्याबद्दल बोला आणि त्या परिस्थितीतील मुलाने परिस्थिती कशी हाताळायला हवी होती असे तुमच्या मुलाला वाटते ते विचारा. त्यांच्याबद्दल चर्चा न करता कौशल्ये शिकण्यासाठी या पद्धती उपयोगी पडतात.

  11. मॉडेल. मॉडेल. मॉडेल- शेवटी, तुम्ही स्पष्ट आणि निश्चितपणे कसे नाही म्हणता याचे स्वतःच्या देहबोलीतून आणि शब्दांद्वारे उदाहरण द्या. तुम्ही परिस्थितीतून कसा मार्ग काढता हे थोडक्यात सांगा. तुम्ही त्यांना शिकवत आहात हे सांगण्याची गरज नाही. हे नैसर्गिकरित्या होऊ द्या. आपल्याला जगात वावरतांना बघून मुले सहजपणे शिकत असतात.

  12. पालकांचे नाव पुढे करणे -नको असलेल्या गोष्टी करण्याचा दबाव टाळण्यासाठी किशोरवयीन मुले "पालकांना दोष" देण्याचा मार्ग वापरु शकतात. उदाहरणार्थ, दारू पिण्यासाठी दबाव टाकला तर किशोर म्हणू शकतो, “नाही, मी दारू घेऊ शकत नाही. माझी आई माझी वाट पाहत असेल आणि दारूचा वास आला की तिला कळेल. माझं बाहेर पडणे ती कायमचं बंद करेल.”

  13. कोड वर्ड सेट करणे ही परिस्थितीतून बाहेर पडण्याची आणि आपल्यावर शेकण्यापासून वाचवण्याची आणखी एक संधी आहे. या धोरणात पालक आणि किशोरवयीन मुलांनी पूर्वीच एक सांकेतिक शब्द ठरवलेला असतो. जेव्हा किशोर हा शब्द वापरतात, तेव्हा पालक त्यांना घरी यायला सांगतात. त्यामुळे मुले मित्रांना सांगू शकतात की 'जावे लागेल, बाबा बोलवतायत!'

  14. नकारात्मक दबावातून वाचण्यासाठी काय करावे हे त्यांना सुचत नसेल तर त्यांना मार्ग शोधायला मदत करा. अशावेळी कारणे सांगण्यात काही चूक नाही हे त्यांना सांगा.

  15. तुमच्या मुलाचे मित्र आणि त्यांच्या पालकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास, त्यांच्याशी परिचित होण्याचा एक मार्ग म्हणून मित्रांना आमंत्रित करण्यास मुलाला प्रोत्साहन द्या.

  16. तुमच्या मुलाला सकारात्मक नातेसंबंध शोधण्यास आणि त्यांचा आदर करणारे आणि त्यांच्यावर अन्न्यायकारक दबाव न टाकणारे मित्र निवडण्यास प्रोत्साहन द्या.

  17. आपले मूल स्वतंत्र व्हावे आणि त्यांनी त्यांचा आतील आवाज ओळखायला शिकावे यासाठी प्रयत्न करा. त्यांना कळू द्या की ते प्रत्येकाला खूष करू शकत नाहीत आणि ते ठीक आहे.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search