Search

दुःख आणि हानी

आपल्याला आयुष्यात अनेक कारणांनी दुःख होते किंवा नुकसान सहन करावे लागते–आपण काळजी घेत असलेल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू , पालक एकमेकांपासून विभक्त होणे, बॉयफ्रेंड / गर्लफ्रेंड किंवा जोडीदार यांच्यापासून वेगळे होणे (ब्रेक अप) किंवा नवीन जागेमध्ये स्थलांतरित होणे इत्यादि. दु:खावर ताबा मिळवण्याचा सर्वांच्या कामी येईल असा हमखास उपाय नसतो पण स्वतःची काळजी घेण्याचे वेगवेगळे मार्ग नक्कीच उपलब्ध आहेत. तरुण व्यक्ती म्हणून तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे कि असे दुःख तुमच्या एकट्याच्याच वाट्याला आलेले नसून तुमच्यासारखाच त्रास असलेले हजारो लोक आहेत. मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि स्वतः ला या परस्थितीत मजबूत ठेवल्याने आजचेच दुःख कमी होते असे नाही तर भविष्यात आरोग्य चांगले राहते.

आपल्या आवडीच्या व्यक्तीचा मृत्यू अतिशय दुःखदायक असतो. मग ती व्यक्ती तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा तुमचे पाळलेले प्राणी देखील असू शकतात. दुःख आपल्या मनात कोणत्या भावना निर्माण करते हे समजून घेतले तर भावना नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे मार्ग सापडतील आणि आयुष्याच्या काळोखात प्रकाश दिसेल.

दुःख असह्य असू शकते, परंतु ते कमी देखील होऊ शकते.

प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे निर्माण होणाऱ्या भावना ह्या व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या किंवा बदलणार्‍या असतात. अशा वेळी हिंमत न हारता आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावना समजून घेणे महत्वाचे असते.आयुष्यात तुम्हाला वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या भावना अनुभवायला मिळतात.

१) दु:ख

एखाद्या गोष्टीचे नुकसान झाल्यावर दु:ख होणे ही सर्वसामान्य आणि लगेच निर्माण होणारी भावना आहे. त्यामुळे तुम्हाला रडू येईल, एकटेपणा जाणवेल किंवा कोणत्याही इतर गोष्टीमध्ये लक्ष लागणे कठीण जाईल. आपल्याला दुःखाचे मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही परिणाम जाणवू शकतात. आपल्याला एकटे राहावे असे वाटते परंतु कोणाशी तरी बोलले तर त्याचा नक्कीच फायदा होतो.

२) राग

तुमच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू जर इतर व्यक्तीमुळे झाला असेल, अपघातामुळे झाला असेल तर या परस्थितीत राग येणे हे स्वाभाविक आहे. जरी नैसर्गिक मृत्यू झाला असला तरी आपल्याला तो स्वीकारता येत नाही आणि आयुष्याचा राग येऊ शकतो.

३) अपराधीपणाची भावना

प्रिय व्यक्तीची काळजी घेणे ही आपली जबाबदारी होती, आपण काळजी घेण्यास चुकलो त्यामुळे हा मृत्यु झाला , त्याला आपण जबाबदार आहोत असे वाटून आपल्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते. आपण त्या व्यक्तीला पुरेसा वेळ देऊ शकलो नाही किंवा ती व्यक्ती आपल्याला किती प्रिय आहे हे सांगू शकलो नाही असे वाटल्यामुळे देखील अपराधीपणाची भावना येऊ शकते. अशा वेळी तुम्ही काय करू शकला नाही याचा विचार करण्यापेक्षा तुमच्याकडे असलेल्या त्या व्यक्ती सोबतच्या चांगल्या आठवणींचा विचार करा.

४) स्वीकार

काही काळानंतर हळूहळू भूतकाळात घडलेल्या गोष्टी मनातून पुसट होत जातात आणि आपण आयुष्यात पुढे जातो . आपण त्या व्यक्तीला विसरलो आहोत असा त्याचा अर्थ नाही. आपण त्या आघातातून बाहेर पडण्यास सुरवात केली आहे आणि आता आपले दुःख नियंत्रणात आले आहे हा त्याचा अर्थ आहे.

तुम्हाला जे वाटत आहे ते योग्यच आहे!

जवळच्या व्यक्तीचा मृत्यू ही आपल्या आयुष्याची पूर्ण उलथापालथ करणारी घटना असू शकते. त्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कि प्रत्येक व्यक्ती अशा प्रकारच्या घटनांना वेगवेगळ्या प्रकारे सामोरे जात असते, त्यामुळे तुम्ही योग्य पद्धतीने दुःख हाताळत आहात की नाही याची चिंता करू नका. मनातील भावना व्यक्त होऊ द्या, दुःख व्यक्त करा. यामुळे तुम्हाला हळूहळू बरे वाटायला सुरुवात होईल.

दुःख योग्य प्रकारे कसे हाताळावे?

आपण स्वतःचे दुःख कमी करू शकतो आणि आपल्यात स्वतःला मदत करण्याची ताकद असते हे ध्यानात ठेवा. स्वतःला हात देण्याच्या किंवा स्वतः ची मदत करण्याच्या अनेक पद्धती आहेत. 

घडून गेलेल्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या भावना काही काळाने बदलणार आहेत.

१) दुःखाची वेळ

दु:ख व्यक्त करण्यासाठी रोज १५-२० मिनिटे वेळ द्या. त्यावेळीस त्या ठिकाणी तुम्ही एकटेच असाल याची खात्री करा. तुमचा मोबाईल बंद करा. हा दुःखाला सुरक्षितपणे सामोरे जाण्यासाठीचा वेळ आहे. तुम्ही मनामध्ये साठवून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्यासाठीची ही संधी आहे. याचा तुम्ही कसा उपयोग करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. यावेळी विचार करा, ध्यान करा, रडा, चिडा किंवा चित्र काढा.

२) डायरी लिहा

मृत्यू झालेल्या व्यक्तीबद्दल लिहा. त्या व्यक्तीसोबतच्या चांगल्या आठवणी लिहा. यामुळे तुम्हाला झालेले तीव्र दुःख आठवड्याने, महिन्याने कसे बदलत गेले हे पाहता येईल आणि अवघड काळामध्ये याची तुम्हाला मदत होईल.

३) रडा (शक्य असेल तर तुमचे अश्रू थांबवू नका)

अनेकदा अश्रू हे शक्तीचे चिन्ह असते आणि आपण दु:खातून बाहेर पडण्यासाठी किती तयार आहोत हे दाखविते. त्यामुळे तुम्हाला रडावेसे वाटले तर रडा, रडणे अडवू नका. तुम्हाला रडण्याची इच्छा असेल आणि रडू येत नसेल तर काळजी करू नका. काही लोकांना रडणे फार अवघड जाते आणि ते अन्य मार्गाने आपले दुःख व्यक्त करतात.

४) विश्वासातील लोकांशी बोला

दुःखातून जाताना तुम्हाला एकटे वाटू शकते, ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे तुम्ही व्यक्त होऊ शकाल अशी व्यक्ती शोधा. उदा. मित्र किंवा कुटुंबातील लोक. समदुःखी लोकांशी बोलल्यामुळे मदत होते. तुम्ही मदत गटांमध्ये देखील सामील होऊ शकता.

५) वेळ घ्या

जवळच्या व्यक्तीच्या मृत्युच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागू शकतो आणि काही काळ आपले आयुष्य उलटेपालटे झाले आहे असे वाटते. परंतु कायमच अशी अवघड परस्थिती राहत नाही. वेळ जाईल तसे हे दुःख भरून निघते.

दुःखाचा सामना करणे तुम्हाला अवघड वाटत असेल तर...

वरील काही उपायांचा वापर करून देखील, बराच काळ गेल्यानंतर देखील दुःखाचा सामना करणे जड जात असेल तर डॉक्टर किंवा समुपदेशकांना भेटणे योग्य ठरेल. त्यांची मदत घेतल्यावर तुम्हाला तुमच्या दुःखातून सहज आणि लवकर बाहेर पडता येईल .

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search