Search

समाजाचा मानसिक आरोग्यावर प्रभाव

मानसिक आरोग्य आपल्या जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करत असते. म्हणून शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याची काळजी घेणे आणि त्याचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. यात आपल्या समाजाची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. समाज निरोगी असला तरच व्यक्ती निरोगी राहू शकते.

समाज किंवा समुदाय म्हणजे नेमकं काय? केवळ एकत्र अस्तित्व किंवा लोकांचा समूह म्हणजे समाज नाही. माणसे एकमेकांशी जोडलेली असणे हे समाजाचे किंवा समुदायाचे महत्वाचे लक्षण आहे. समुदाय ही एक भावना आहे. समाजात आपण इतरांशी जोडलेले असण्याची आणि आपल्याला ज्यांचा आधार वाटतो त्यांनी आपल्याला स्वीकारल्याची भावना असते. असं जोडलेलं असलं की आपल्याला हवंहवंसं आणि छान वाटतं.

मानसिक आरोग्यासाठी समाज इतका महत्त्वाचा का आहे?

आपण सामाजिक प्राणी आहोत. आपण एकटे राहू शकत नाही. आपल्या वाढीसाठी समाज महत्वाचा आहे. विशेषत: मानसिक आजार असलेल्या व्यक्ती ज्या आधीच एकटेपणाची भावना अनुभवत आहेत अशांसाठी समाज अधिकच महत्वाचा आहे. 

समुदाय मानसिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असे अनेक घटक प्रदान करतो, त्यापैकी तीन सर्वात फायदेशीर पैलू आपण इथे बघू.

१. आपलं कोणीतरी असल्याची भावना:

‘आपण इतर लोकांसारखे नाही’ किंवा ‘आपल्याला स्वीकारले जात नाहीये’ अशी भावना जर कधी तुमच्या मनात आली असेल तर एकटेपणाची भावना तुम्ही नक्कीच अनुभवलेली आहे. जेव्हा एखादा समुदाय आपल्याला आपल्या गुणदोषांसकट स्वीकारतो तेव्हाच आपण त्या समुदायाचा खऱ्या अर्थाने भाग होतो. समुदायाचा भाग होण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावे लागत नाही तर आपल्यातील गुणांमुळे आपले तिथे कौतुकच होते.

२. आधार:

जेव्हा आपल्याला काहीतरी हवे असते तेव्हा आपण कोणाची मदत घेतो? जेव्हा आपल्याला बोलण्याची गरज असते किंवा मदतीची गरज असते तेव्हा आपण ज्या लोकांना बिनदिक्कत फोन करू शकतो, जे लोक आपल्याला कठीण परिस्थितीत मदत करू शकतात, जे आपली काळजी करतात असे सर्वच लोक आपल्याला सुरक्षित वाटण्यास मदत करतात. हे लोक आपला जीवनाबद्दलचा दृष्टिकोन समजून घेऊ शकतात. 

३. उद्देश:

समाजात, लोक वेगवेगळ्या भूमिका पार पाडतात. जर तुम्हाला स्वैंपाकाची आवड असेल, तर एखादा मित्र वाईट प्रसंगातून जात असताना त्याला/तिला चांगलं-चुंगलं खायला करून देण्याची जबाबदारी घेऊ शकता. किंवा तुम्ही समोरच्याचे म्हणणे चांगल्या प्रकारे ऐकून घेऊ शकत असाल तर एखाद्या मित्राला कोणाशीतरी बोलायची गरज असताना तो/ती तुम्हाला निश्चिंतपणे फोन करू शकतो. या भूमिका आपल्याला इतर लोकांची मदत करण्याची संधी देतात. आपल्या जगण्याला काहीतरी उद्देश असणे, आपण इतरांना मदत करणे या गोष्टी जीवनाला अर्थ देण्यास मदत करतात. 

समुदाय कसा शोधायचा?

जोडलेपणाची भावना जोपासताना, सर्वात आधी आपल्याला स्वतःमध्ये डोकावून बघावे लागते. आपल्यासाठी काय महत्वाचे आहे याची आपल्याला जाणीव असेल तर समविचारी लोकांशी जोडून घेण्याचे मार्ग शोधणे सोपे होते. 

स्वारस्य: 

तुम्हाला काय करायला आवडते? तुम्हाला कदाचित वाचायला आवडत असेल आणि तुम्ही पुस्तक वाचणार्यांच्या एखाद्या गटामध्ये मध्ये सामील होण्याचा प्रयत्न करू शकता. किंवा तुम्हाला एखादा खेळ आवडत असेल तर तुम्ही त्या खेळाच्या संघात सामील होण्याचा प्रयत्न करू शकता. अशा अनेक शक्यता आहेत. आणि तुम्हाला आनंद देणारे उपक्रम करताना इतरांशी जोडून जाणेही सोपे होईल. 

मूल्ये: 

तुमची मुल्ये काय आहेत? यामध्ये धर्मादाय काम किंवा स्वयंसेवी कार्य समाविष्ट होऊ शकते. समाजसेवा करणे ही चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही त्याद्वारे इतरांशी जोडून घेऊ शकता. ज्यांची जीवन मूल्ये तुमच्यासारखी आहेत आणि त्यांना तुमच्यासारखेच काम करण्याची इच्छा आहे अशा लोकांशी तुम्ही स्वतःला जोडून घेऊ शकता. 

श्रद्धा: 

तुमचा काय विश्वास आहे? जर तुम्ही आध्यात्मिक सराव करत असाल किंवा धार्मिक असाल, तर तिथे वेगवेगळी जबादारी घेण्याचा प्रयत्न करा. सेवा करा. लोकांशी बोला. एखादा राजकीय विचार तुम्हाला पटत असेल तर समान विचार असणाऱ्या लोकांशी जोडून घ्या. तुम्हाला अर्थपूर्ण वाटणाऱ्या ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या गटात सहभागी व्हा. आपल्या समुदायाचा विस्तार करताना, आपल्यापेक्षा मोठ्या गोष्टीशी स्वतःला जोडून घेणे हा मार्ग उपयुक्त ठरू शकतो. 

समाजात आपण इतरांशी जोडलेले असण्याची भावना आपल्याला हवीहवीशी वाटते. आपण खरोखर जसे आहोत तसे स्वीकारले गेल्याची भावना आपल्याला समाजात मान्यता मिळवून देते आणि स्वत:ची किंमत करायला शिकवते. आपल्याला पाठिंबा देतील, आपण अडचणीत असताना मदत करतील असे लोक आजूबाजूला असले कि आपल्याला सुरक्षित वाटते. आपल्या जगण्याला काहीतरी हेतू आहे हे जाणवले की स्वतःलाच स्वतःचे महत्व समजते. समाज यात महत्वाची भूमिका पार पाडतो.

आपला समुदाय कसा शोधायचा हे आपल्याच हातात असते. सर्वाना एकाच मापाचे कपडे नीट बसत नाहीत. तसेच एकच समुदाय सर्वांसाठी योग्य ठरत नाही. जर अजूनही तुम्हाला लोकांशी, एखाद्या समुदायाशी घट्ट जोडले गेल्याची जाणीव झाली नसेल तर प्रयत्न करत राहा. तुम्हालाच तुमचे उत्तर सापडेल. समुदाय मोठा आहे की छोटा हे महत्वाचे नाही तर आपले म्हणता येतील असे लोक आयुष्यात असणे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक आहे. लक्षात ठेवा, जसा तुम्हाला, तुमच्यासाठी समुदाय शोधणे महत्वाचे आहे, त्याचप्रमाणे इतरांना त्यांच्या समुदायाचा भाग म्हणून तुम्ही त्यांच्या समुदायामध्ये असणे देखील महत्त्वाचे आहे. आपल्या सर्वांना एकमेकांची गरज आहे. आपण सर्वांनीच एकमेकांशी जोडलेले असणे आवश्यक आहे. आपले स्वास्थ्य आपण जोडलेल्या नात्यांवरच अवलंबून असते. यात केवळ जवळची आणि रक्ताची माणसेच नव्हे तर आपले सहकारी, शेजारी, मित्रमैत्रिणी, नेहमीचे दुकानदार अशी सगळी माणसे येतात. मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांना, ही जोडलेपणाची भावना स्वतःमध्ये निर्माण करणे आव्हानात्मक वाटू शकते. विशेषत: ज्यांनी भेदभाव अनुभवला असेल किंवा सामाजिकरित्या अलिप्त असतील अशा आपल्या रुग्णमित्रांसाठी ही खरोखरच एक आव्हानात्मक गोष्ट आहे. 

समाजाप्रति जोडलेपणाची भावना असणे केवळ आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे नाही तर तो आपला मानवी हक्क आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांशी संघर्ष करणारे लोक अजूनही अनेकदा समाजातून वगळले जातात. 

समाजाने लोकांना सामावून घेणे हा सर्वांचा कायदेशीर आणि मानवी हक्क आहे असे सामुदायिक समावेशन चळवळ सांगते. समुदायाने एखाद्या व्यक्तीला संपूर्णपणे स्वीकारले की त्या व्यक्तीच्या अर्थपूर्ण जीवन जगण्याच्या संधी वाढत जातात. त्याने व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुस्थितीत राहण्यास मदत होते.

उपचार घेऊन बरे झालेले लोक आम्हाला सांगतात की कधीकधी औषधोपचार किंवा समुपदेशन यापेक्षा समुदायाचा भाग असणे मानसिक स्वास्थ्यासाठी जास्त फायदेशीर ठरते.जोडलेपानाची भावना समाजात जोपासताना प्रत्येकाला समान संधी देणे आवश्यक आहे खालील संधी सर्वच लोकांना समप्रमाणात मिळाल्या पाहिजेत

  • स्वतःचे घर तयार करण्याची संधी 
  • नातेसंबंध विकसित करण्याची किंवा कुटुंब आणि मित्रांसह जोडले जाण्याची संधी
  • नोकरी किंवा आवडेल असा अभ्यासक्रम शोधण्याची संधी
  • सामाजिक चळवळींचा भाग होण्याची संधी
  • मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक संधी 

समाजातील हे समावेशन प्रत्यक्षात आणण्यासाठी, आपल्याला खालील गोष्टींची खात्री करणे आवश्यक आहे

  • लोकांना समुदायामध्ये सहभागी होण्याच्या अनेक संधी आहेत. 
  • समुदायात प्रत्येकाचे स्वागत केले जाते आणि प्रत्येकाला समाविष्ट केले जाते. 
  • समुदायाच्या समावेशाकडे मानवी हक्क म्हणून पाहिले जाते.

सामुदायिक सेवांमध्ये, सर्वसामान्य रुग्णालयांमध्ये मानसोपचार विभाग असणे, स्थानिक प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध असणे, सामुदायिक मानसिक आरोग्य केंद्रे उपलब्ध असणे तसेच मानसिक आरोग्यासाठी स्वसहाय्यता गट असणे इत्यादी बाबी समाविष्ट आहेत.

सरकारी संस्था आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांद्वारे सेवा प्रदान केल्या जाऊ शकतात. एका भौगोलिक क्षेत्रामध्ये सेवा प्रदान करणाऱ्या विशेष कार्यसंघांचा समावेश केला जाऊ शकतो. खाजगी हॉस्पिटल्स किंवा धर्मादाय संस्थांद्वारे देखील काही मानसिक आरोग्य विषयक सेवा प्रदान केल्या जाऊ शकतात.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search