Search

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना

विशेषतः या आधुनिक डिजिटल जगात विद्यार्थ्यांशी प्रभावीपणे वागण्या-बोलण्याची आणि संवाद साधण्याची कला शिक्षकांनी शिकणे आवश्यक आहे.

वर्गातील चांगले वातावरण आणि निरोगी विद्यार्थी-शिक्षक संबंध निर्माण करण्यासाठी सतत आणि प्रभावी संवाद आवश्यक असतो. वर्ग व्यवस्थापनाचा विद्यार्थ्यांच्या यशावर मोठा प्रभाव पडतो असे दिसून आले आहे. चांगले व्यवस्थापन नसलेल्या, गोंधळ असलेल्या वर्गात विद्यार्थी शिकू शकत नाहीत.

विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर प्रभाव टाकू शकेल अशा प्रभावी संवादासाठी, शिक्षकांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे:

संवादातील स्पष्टता

संवादाच्या माध्यमातून आपण स्वतः व्यक्त होतो आणि दुसर्‍याचे मुद्दे ग्रहण देखील करतो. विद्यार्थ्यांचे विचार आणि कल्पना ऐकण्याचे, समजून घेण्याचे व त्या अधिक विस्तृतपणे मांडण्याचे कौशल्य शिक्षकांकडे असले पाहिजे. विद्यार्थ्यांसोबत संवाद करताना शिक्षकांकडे विचारांची स्पष्टता असणे आवश्यक आहे. त्यांना गुंतागुंतीच्या गोष्टी सोप्या पायऱ्यांमध्ये मांडता आल्या पाहिजेत. त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांचे मन वाचता आले पाहिजे. चांगले सादरीकरण आणि संभाषण कौशल्य वापरून कंटाळवाणे संभाषण रसपूर्ण करणे देखील त्यांना जमायला हवे. प्रभावी संवादातील हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे.

भावनांचा समावेश असलेला व्यक्तिगत संवाद साधणे.

चांगले शिक्षक त्यांचे विद्यार्थ्यांप्रती असलेले ममत्व आणि बांधिलकी त्यांच्यापर्यंत पोचवत असतात. त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल खोलवर आस्था असते.

ज्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना जाणून घेण्यात रस असतो ते शिक्षक त्यांची नावे लक्षात ठेवतात आणि त्यांना नावाने हाक मारतात. विद्यार्थ्यांची स्वप्ने, आशा, प्राधान्यक्रम काय आहेत, त्यांना सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते हे जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात. सातत्यपूर्ण, प्रभावी संवादातूनच हे सर्व शक्य होते. शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे यश साजरे केले पाहिजे आणि त्यांच्या कामातून त्यांच्या कामाची पोचपावती दिली पाहिजे. विद्यार्थ्यांची बलस्थाने अधोरेखित करण्याची ही फार चांगली पद्धत आहे आणि याचा त्यांच्या शिक्षणावर प्रभाव पडतो.

पालकांशी संवाद

एका चांगल्या शिक्षकाने केवळ विद्यार्थ्यांशीच नाही तर त्यांच्या पालकांशी संवाद साधण्याची कला देखील आत्मसात केली पाहिजे. विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करता यावे यासाठी शिक्षकांना पालकांशी नेमका संवाद साधता आला पाहिजे. मुलांची शक्तीस्थळे, अडचणी, वर्तन, याबद्दल पालकांना माहिती आहे ना याची शिक्षकांनी खात्री केली पाहिजे.

पालकांशी संवाद साधण्यासाठी काही प्रभावी सूचना-

  1. नातेसंबंध तयार करा: पालकांसोबत विश्वासाचे नाते निर्माण करणे महत्वाचे आहे. पालकांसोबत विश्वासाचे नाते निर्माण करणे ही एक सातत्याने करायची गोष्ट आहे त्यासाठी पालकांना हे दाखवून दिले पाहिजे की शिक्षकाला विद्यार्थ्याच्या हिताची कळकळ आहे.
  2. पालकांचे म्हणणे ऐकून घ्या:काहीवेळा पालकांना त्यांच्या मुलांबद्दलचे गंभीर प्रश्न आणि चिंता सतावत असतात. अशावेळी त्या चिंता ध्यानात घ्या. तुमची चूक झाली असेल तर कबुल करा आणि गोष्टी शांतपणे हाताळा. त्या काळात, त्यांच्या चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा. आपली चूक असली तरी ती स्वीकारा आणि शांतपणे गोष्टी हाताळा. तुमचा मुद्दा सिद्ध करण्यापेक्षा त्यांचे ऐकून घेणे जास्त महत्त्वाचे आहे हे इथे ध्यानात घ्या.
  3. प्रत्येक संवादाची नोंद ठेवणे:पालकांशी झालेल्या प्रत्येक संवादाची नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे. नोंद म्हणजे विद्यार्थ्याचे आणि पालकाचे नाव, तारीख आणि संभाषणाचा सारांश लिहून काढणे.
  4. वारंवार संवाद साधा:नियमित आणि प्रभावी संवादाला वेळ लागतो परंतु तो वेळ देणे महत्त्वाचे असते.

शिक्षकांना खूप कामे असतात त्यामुळे प्रभावी संवादासाठी वेळ काढणे कठीण असते. परंतु तंत्रज्ञानाचा वापर करून हे काम सोपे करता येते. यासाठी फोन वापरता येतो.

शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रभावी संवादासाठी तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रज्ञानाचा वापर संवाद प्रभावी आणि सोपा करतो. तंत्रज्ञान वापरणार्‍या शिक्षकासाठी फोन, ईमेल, बातमीपत्रे, ई-कार्ड्स, व्हाट्स अप सारखी चॅटिंग apps, गूगल मीट सारखी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग apps, फेसबुकसारखी समाज माध्यमे असे विविध पर्याय खुले असतात. पण हे सर्व घडवून आणणे देखील सोपे नाही. वर वानगीदाखल काही apps चा उल्लेख केला आहे, परंतु विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये

ऑनलाइन संवाद घडवण्यासाठी उपयुक्त अशी अनेक apps व व्यासपीठे आहेत.

ऑनलाइन शिक्षण आणि संवाद

आपल्यापैकी ज्यांना ऑनलाइन अध्यापन करावे लागत आहे त्यांना विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधता न येणे हा मोठाच अडथळा जाणवत आहे.

आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात कसे राहू?

चर्चा मंडळे, थेट चॅटिंग, ईमेल आणि व्हिडिओ कॉल हे वर्गातील संवादासाठीचे नवीन मार्ग आता अंगवळणी पडत आहेत.

ऑनलाईन वर्गातील संवाद प्रभावी करण्यासाठी, शिक्षकांनी संवादाच्या विविध पद्धतींचे मिश्रण करणे आवश्यक आहे. या प्रत्येक पद्धतीचे आपापले सामर्थ्य आणि मर्यादा आहेत.

  1. लिखित मजकूर

टंकलिखित मजकुराचा संदेश पाठवणे हा सध्या विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की तो सर्वोत्तम मार्ग आहे. देहबोली किंवा आवाजाची पट्टी यांचा उपयोग केल्याशिवाय दिलेले सूचना आणि अभिप्राय हे विद्यार्थ्यांना खूप कोरडे वाटू नयेत यासाठी शिक्षकांना जास्तीचे सायास करावे लागतात.

  1. व्हिडिओ

व्हिडिओ हा जोडलेले राहण्याचा एक चांगला मार्ग आहे. विद्यार्थ्यांना जर तुमचा चेहरा दिसला आणि तुमचा आवाज ऐकता आला तर त्यांना तुम्ही खूप जवळ असल्यासारखे वाटेल. पण व्हिडिओ डाउनलोड करण्यात तुमच्या विद्यार्थ्यांना काही अडचण नाही ना याची तुम्हाला खात्री करावी लागेल.

  1. ऑडिओ

ध्वनीमुद्रित संदेश हा आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद करण्याचा एक सोपा मार्ग आहे. फक्त ध्वनिमुद्रण हे स्पष्ट आणि संक्षिप्त असेल याची खात्री करा. संपूर्ण वर्गाला एखादा निरोप द्यायचा असेल तर लिखित संदेश हा जास्त चांगला मार्ग असू शकतो.

तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन करणे तुमच्यासाठी नवीन असल्याने काही छोटे मोठे गडबड गोंधळ होणार हे स्वीकारून पुढे गेले पाहिजे. त्याचा ताण घ्यायची गरज नाही.

एक संवाद विषयक धोरण विकसित करा

विद्यार्थी आणि पालक समजू शकतील असे संवादविषयक सुस्पष्ट धोरण विकसित करा. ते लिखित दस्तऐवजच्या स्वरुपात देता येईल. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकेल.

संवादासाठी वापरण्यात येणार्‍या पद्धतींचा आढावा घेणे:

संवादाची ही विविध माध्यमे आपल्या फोनमध्ये कशी उपलब्ध करून घ्यावीत याची माहिती देखील पत्रकात द्या. क्रमांक घातलेल्या सुटसुटित सूचनांच्या स्वरुपात ही माहिती द्या. विद्यार्थी आणि पालक स्वतःहून ही माहिती शोधून काढतील असे कधीही गृहित धरू नका.

विद्यार्थी व पालक तुमच्याशी कोणकोणत्या माध्यमातून संपर्क साधू शकतील?

त्यासाठी खालील पर्याय उपलब्ध असू शकतील.

  •   ईमेलद्वारा: संपर्क साधण्याचा हा एक सोपं आणि प्रभावी मार्ग आहे.
  •   दूरसंचार अॅप्स (स्काईप, झूम, टीम्स): हे फोनवर थेट बोलल्यासारखेच आहे. तुम्ही तुमचा खाजगी फोन नंबर दुसर्‍यांना न देता देखील हे करू शकता.
  •   थेट गप्पा: जसे की, व्हाट्स app च्या गटामध्ये प्रश्नोत्तरांसाठी एक ठराविक वेळ निश्चित करणे. त्यामुळे त्याच त्या प्रश्नांची सारखी उत्तरे द्यावी लागत नाहीत व वेळ वाचतो. परंतु अशा गटात विद्यार्थी किंवा पालक त्यांच्या खाजगी बाबींबद्दल बोलू शकत नाहीत.

तुमचे कामाचे तास नक्की करायला विसरू नका नाहीतर या नवीन माध्यमांमुळे दिवसभर बांधले गेलो आहोत व स्वतःसाठी वेळच उरत नाही असे वाटू शकते.

संवादाचा नेमका दिनक्रम:

आठवड्याभरातील विषयांचे वेळापत्रक, गृहपाठ देण्याची व तपासण्याची वेळ, परीक्षेचे दिवस व वेळ असे नेमके नियोजन विद्यार्थ्यांना कळवले तर शाळेप्रमाणे ऑनलाइन शिक्षणासाठी दिनक्रम निर्माण करता येईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील ऑनलाइन शिक्षणाबद्दलचा गोंधळ कमी होईल.

अत्यावश्यक साहित्यासाठी दिशानिर्देश:

पालकांना व विद्यार्थ्यांना पुढील गोष्टी नक्की कुठे उपलब्ध आहेत हे कळवा:

  •   पुस्तकातील पाठ, उपक्रम
  •   कृतीपत्रिका (पालकांच्या संदर्भासाठी)
  •   मूल्यमापन पत्रिका

कोणत्या वेबसाईटवर किंवा व्हाट्सॅप गटावर ह्या गोष्टी सापडतील नेमकेपणाने सांगा व त्या ठिकाणी वेळेवर हे साहित्य अपलोड करून ठेवा.

स्पष्ट आणि संक्षिप्त संदेश द्या:

सूचना देताना गोंधळ टाळा. सूचना संदिग्ध असतील तर त्यामुळे गोंधळ उडतो व छोटे छोटे बादल करून पुन्हापुन्हा सूचना द्याव्या लागतात. मुद्याला धरून नेमक्या सूचना द्या. त्यासाठी पुढे काही सोपे नियम दिलेले आहेत.

कमी हेच अधिक आहे:

भरपूर माहितीने भरलेले परिच्छेद देण्यापेक्षा ठळक मुद्दे आणि याद्या द्या, शब्दांत योग्य अंतर ठेवा. विशेषतः एकावेळी अनेक विषयांबद्दल बोलत असाल तर मजकूर सुटसुटीत परिच्छेदाच्या रूपात मांडा.

स्पष्टता:

नेमके शब्द वापरा. अनावश्यक शब्द टाळल्यामुळे गोंधळाची शक्यता कमी होते. विद्यार्थ्यांना समजेल अशी भाषा वापरा.

सूचना देण्यासाठी व्हिडिओ वापरत असाल तर त्यासोबत काही मजकूर पण वापरा. दर्शनी भागातील फलकावर सूचनांचा गोषवारा लिहा म्हणजे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांच्या ध्यानात येतील.

संवेदनशील विषयांवर खाजगीत संवाद साधा.

एखाद्या विद्यार्थ्याच्या वैयक्तिक अडचणींबद्दलची चर्चा किंवा तुमचे संवेदनशील अभिप्राय हा संवाद त्या त्या विद्यार्थ्यापुरताच मर्यादित ठेवा, तो गटावर टाकू नका. विद्यार्थी मोठे असतील तर तुम्ही ईमेल, वैयक्तिक मेसेज इ. मार्ग वापरू शकता. त्यामुळे तुमच्यात विश्वासाचे नाते तयार होते आणि ऑनलाइन संवाद मुलांना सुरक्षित वाटतो.

विद्यार्थ्यांना तुमचे मेसेज मिळाले आहेत का ते तपासा:

जर विद्यार्थी तुमचे संदेश पहात नसतील, किंवा त्यांना सांगितलेल्या गोष्टी करत नसतील तर तुमची संवादाची पद्धत बदलून बघा. कोणत्या प्रकारे संवाद साधणे त्यांना जास्त सोयीचे वाटते ते विद्यार्थ्यांना विचारा.

बोलतानाचा स्वर चांगला असू द्या :

तुमची आस्था किंवा तुमची नेमकी भावना मुलांपर्यंत पोहोचेल यासाठी व्हिडिओ व ऑडिओ संदेशात आवाजाचा योग्य स्वर वापरणे व लिखित संदेशात योग्य शब्द वापरणे गरजेचे आहे. नाहीतर उगीच बोलायचं म्हणून बोलताहेत असे मुलांना वाटू शकते.योग्य स्वर किंवा योग्य भाषा नेमके कशाला म्हणायचे यासाठी पुढील मुद्दे ध्यानात घ्या.

  •   भावनिक भाषा वापरा : नाहीतर कोरडी भाषा वापरुन तुम्ही नुसत्या सूचना देत आहात असे वाटू शकते.
  •   GIF आणि इमोजी : केवळ 😀 हे मूड हलका करतात.
  •   योग्य भाषा आणि व्याकरण:काळजीपूर्वक केलेली शब्दरचना हे सूचित करते की तुम्ही जाताजाता हा संदेश लिहिलेला नसून, वेळ देऊन, विचार करून तुम्ही तो लिहिला आहे. चुकीने भरलेले, सगळी ठळक अक्षरे असलेले आक्रमक संदेश कोणालाच आवडत नाहीत.

लक्षात ठेवा: दोन मिनिटांचा सदिच्छा व्यक्त करणारा व्हीडिओ देखील दिवसभरासाठीची वातावरण निर्मिती करू शकतो. योग्य स्वरात संवाद कसा साधावा हे तुमच्या लक्षात येत नसेल तर सरळ व्हडिओ चालू करून मुलांशी थेट बोला.

संवाद वैयक्तिक हवा:

वैयक्तिक संवादामुळे विद्यार्थ्यांना तुम्हाला त्यांची काळजी आहे हे जाणवते, तुमच्याबद्दल जवळीक वाटते. हे बंध तुम्हाला या अभूतपूर्व आव्हानात्मक काळातून पार होण्यासाठी मदत करतील.

तुमचा संवाद वैयक्तिक ठेवण्यासाठी पुढील गोष्टी करता येतील:

  •   नावे वापरणे: ओळख आणि जोडलेपण सूचित करण्याचा हा एक साधा उपाय आहे.
  •   स्वत:बद्दल सांगणे: शाळेपासून दूर असताना तुमचा वेळ कसा जातोय हे त्यांना सांगा. तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांशी त्यांची ओळख करून द्या आणि कोणत्या छंदांमुळे तुमचा वेळ चांगला जातो ते सांगा.
  •   इकडच्या तिकडच्या गप्पा: ऑनलाइन गप्पा मारण्यासाठी वेळ ठेवा. त्यामुळे सगळ्यांना थोडे एकत्र असल्यासारखे वाटेल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जसे आहात तसे वागा. विनोद करा, हसा आणि तुमच्या शिकवण्यातील सर्व वैशिष्ट्ये जपा. शाळेचे जग उलतेपालटे झाल्यासारखे वाटत असेल तरी तुमचे तुमच्या विद्यार्थ्यांशी असलेले नाते तेच आहे. विद्यार्थी त्याच्यावर विसंबून राहू शकतात.

किशोरवयीन मुलांशी संवाद साधण्यासाठी दहा उपयुक्त सूचना:

1. त्यांना संधी द्या:

तुमच्या विद्यार्थ्यांना समोर बसवून औपचारिक चर्चा करण्यापेक्षा संवादाचे दार नेहमी खुले ठेवा.

जेवण करताना त्यांची मदत घ्या, त्यावेळी गप्पा मारा, आठवड्यातून एखाद्यावेळी इकडेतिकडे जाण्याच्या निमित्ताने सोबत रहा व त्यावेळी गप्पा मारा.

2. ऐका :

इतरांनी आपले ऐकावे असे आपल्या सगळ्यांना वाटते पण इतरांचे ऐकण्यासाठी आपण बरेचजण वेळ काढत नाही.

तुमच्या किशोरवयीन मुलाला बोलायचे असेल तर त्याचे/ तिचे म्हणणे ऐकण्यासाठी वेळ काढा. त्यांच्या दहबोलीचेदेखील निरीक्षण करा.

  1. कारण विचारा, पण निकाल देऊ नका:

तू मूर्खासारखे वागलास किंवा वागलीस हे वाक्य संभाषणाची सुरुवात म्हणून काही फारसे चांगले वाक्य नाही.

कोणत्यातरी कारणामुळे मूल विशिष्ट प्रकारे वागले असणार असे समजणे सगळ्यात चांगले. मोकळ्या मनाने मुलांची विचार प्रक्रिया समजून घ्या.

त्यांच्या वागण्याचे चूक, बरोबर असे निष्कर्ष काढणे टाळा. त्यामुळे त्यांना देखील लगेच निष्कर्षाप्रत न येता इतरांचे वागणे समजून घ्यायला मदत होईल.

4. गृहीत धरू नका किंवा आरोप करू नका:

त्यांच्या आयुष्यात काय चाललय किंवा काय घडतय ते सगळं तुम्हाला लहानपणी माहिती असायचं तसं माहीत आहे असे गृहित धरू नका.

विशेषतःटोकदार प्रश्न विचारू नका. त्यापेक्षा काय चाललय ते तू मला सांगशील का? किंवा सध्या तू नेहमीसारखी वाटत नाहीयेस. सगळं ठीक आहे ना? असे सामान्य प्रश्न विचारा.

मदतीसाठी उपलब्ध रहा:

जरी ते त्यांची स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असले तरी, किशोरांना हे माहित असणे आवश्यक आहे की तुम्ही देखील सोबत आहात. पुढीलप्रमाणे प्रश्न विचारा:

  •     मी काही मदत करू शकते/शकतो का?" किंवा
  •     मी काही करावं असं तुला वाटतं का?

तुम्हाला सांगायचं की नाही, तुमची मदत घ्यायची की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे हे अशा प्रश्नांमधून त्यांच्या लक्षात येते.

6. Don’t just tell, let them think things through

सारखे सांगू नका, त्यांना स्वतः सखोल विचार करू द्या. इतरांनी आपण कसे वागावे हे सांगण्यापेक्षा आपण स्वतःच्या चुकांमधून सर्वात जास्त शिकतो हे आपल्यापैकी बर्‍याच जणांच्या लक्षात आले असेल. किशोरवयीन मुलेदेखील अशीच असतात.

किशोरवयीन मुलांची शिक्षक म्हणून काम करताना, ते त्यांच्या समस्यांचे स्वतः निराकरण करू शकतील यावर आपला विश्वास हवा. त्यांना त्या समस्यांबद्दल विचारप्रवृत्त करणे हे तुमचे काम आहे. ते हे स्वतःचे स्वतः करतील किंवा तुमची मदत घेतील पण ते करण्याचा अवकाश त्यांना उपलब्ध करून देणे आणि गरज असल्यास तुम्ही संवादासाठी उपलब्ध आहात हे त्यांच्यापर्यंत पोचवणे महत्त्वाचे आहे.

इतरांना त्यांचा प्रश्न स्वतः सोडवण्याचा मार्ग आपण खुला करून देत आहोत याची खात्री करून घेण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे हो, नाही अशी उत्तरे नसलेले प्रश्न विचारणे. बहुदा असे प्रश्न कसे? का? या शब्दांनी सुरू होतात.

 

7. “मी जसे बोलतो तसे नाही तर मी जसा वागतो तसे करा.

तुम्ही अजूनही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहात. जर त्यांनी चांगले वागावे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमची वागणूक देखील योग्य आहे याची खात्री करणे आवश्यक आहे जर त्यांनी तुमचा आदर करावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देखील त्यांचा आदर केला पाहिजे.

8. आपल्या लढाया निवडा:

काही गोष्टी इतरांपेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात. आपली लढाई निवडा जेणेकरून जी लढाई खरोखरच महत्त्वाची आहे ती तुम्ही जिंकू शकाल आणि उरलेल्या सोडून द्याल.

जर तुम्ही सतत फक्त टीका करत असाल, तर तुम्हाला खरोखर एखादी गोष्ट आवडली नाहीये का तुमच्या नेहमीच्या पद्धतीने तुम्ही टीका करत राहताय हे किशोरवयीन मुलाच्या लक्षात येणार नाही. त्याऐवजी सकारात्मक रहा आणि तुमच्या विद्यार्थ्याचे बलस्थान शोधा.

9. रागाला रागाने किंवा दुखावून जाऊन उत्तर देऊ नका.

: लक्षात ठेवा, तुम्ही प्रौढ आहात. तुम्हाला विद्यार्थ्याकडून जसे वर्तन अपेक्षित आहे तसे तुमचे स्वतःचे वर्तन असणे महत्त्वाचे आहे.शांत राहणे कठीण असते, परंतु तसे करणे आवश्यक आहे. राग आला तर थोडा वेळ बाजूला व्हा, तुम्ही का बाजूला होताय ते सांगा, शांत झाल्यावर परत चर्चेत भाग घ्या.

आवश्यक असल्यास, आपण असे का करीत आहात हे स्पष्ट करून स्वतःला दूर ठेवा. जेव्हा तुम्ही शांत असाल तेव्हा परत चर्चा करा.

10.खूप कठीण प्रश्न विचारणे टाळा:

किशोरवयीन मुलाने तुमच्याशी खोटे बोलावे असे तुम्हाला वाटत नाही.

किशोरवयीन मुलांना कोणत्याही गोष्टीबद्दल तुमच्याशी मोकळेपणाने बोलणे तुम्हाला आवडेल. पण ही आदर्श स्थिती झाली. प्रत्यक्षात असे होईलच असे नाही. विशेषतः तुम्हाला चुकीची वाटणारी गोष्ट जर ते करत असतील! त्यामुळे कठीण विषयाबद्दल थेट प्रश्न विचारणे टाळावे. नाहीतर ते खोटे बोलतील किंवा प्रश्न टाळतील यासाठी मनाची तयारी हवी. वर म्हटल्याप्रमाणे हो, नाही असे उत्तर नसलेले खुले प्रश्न विचारत राहा आणि संवादाचे मार्ग खुले ठेवा. जेव्हा त्यांना बोलायचे असेल तेव्हा ते तुमच्याकडे येतील अशी आशा बाळगा.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या गरजा पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण दर पाच मुलांपैकी एक, निदान करण्याजोग्या भावनिक...

मराठी
Search