Search

मनोविकारांना कलंक समजणे आणि त्याबद्दल पूर्वग्रह बाळगणे

दहा ते एकोणीस या वयोगटातील मुलांना होणार्‍या आजारांपैकी १६% आजार हे मनोविकार असतात. आत्महत्त्या हे किशोरवयीन मुलांच्या मृत्युचे तिसरे प्रमुख कारण आहे

पौगंडावस्था हा व्यक्तीच्या मानसिक आणि भावनिक विकासातील एक महत्त्वाचा कालखंड आहे हे शिक्षकांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. या काळातील मानसिक आरोग्याच्या समस्या किंवा मित्रांनी त्यांच्यात सामावून न घेणे या सारख्या परिस्थितीला मुले कसे तोंड देतात हे मुलांच्या दृष्टीने समवयीन मुलांची मान्यता आणि समाजजीवनातील सहभाग किती महत्त्वाचा आहे यावर अवलंबून असते.

 वर्तन विकार असलेल्या किशोरवयीन मुलांना इतरांनी सामावून न घेणे किंवा बाजूला टाकणे,तब्येतीच्या अडचणी आणि एकुणातच जोखमीचे वर्तन, जसे की मादक पदार्थांचा वापर,लैंगिक वर्तनातील जोखीम, आक्रमकता यांच्याशी निगडीत अधिक समस्यांचा सामना करावा लागतो. मनोविकार असलेली तरुण मुले अनेकदा एकटे पडणे, पूर्वग्रह आणि भेदभाव या स्वरूपाच्या त्रासाला सामोरे जावे लागल्याचे सांगतात.

दुर्दैवाने, त्यांना दिली जाणारी भेदभावाची वागणूक ही त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून दिली जाते. त्यामध्ये मित्र, पालक आणि धक्कादायक म्हणजे शिक्षक आणि प्राध्यापकांचा देखील समावेश असतो.

पौगंडावस्थेत ज्या किशोरांना शाळा, महाविद्यालय, शिकवणीवर्ग, वसतीगृह इ. ठिकाणी बहुतेकवेळा अशी वागणूक मिळते,त्यांच्यामध्ये एकाकीपणा व एकटे पडल्याची भावना निर्माण होते. बर्‍याचदा या भावनेचा आत्महत्या करण्याच्या वर्तनाशी संबंध असतो.

सर्वसाधारणपणे कलंक, लांछन किंवा पूर्वग्रह यामधून बदनामी, लाज, स्वतःला दोष देणे अशा भावना निर्माण होतात; सामाजिक बहिष्कार, एकटेपणा आणि अडचण निर्माण करण्यात त्याची परिणीती होते. 

मानसिक आजार असलेल्या लोकांबद्दलच्या या पूर्वग्रहांमुळे बहुतेक वेळेस त्यांना भेदभावाचा सामना करावा लागतो. जसे की, दुर्लक्ष, जबरदस्ती, संस्थात्मक विलगीकरण. अशाप्रकारे त्यांना त्यांच्या आजारचा त्रास आणि सामाजिक कलंकाचा त्रास असा दुहेरी त्रास सोसावा लागतो. चित्रपट आणि इतर प्रसार माध्यमांमधून होणार्‍या मनोविकारांच्या साचेबद्ध आणि पूर्वग्रहदूषित चित्रणामुळे त्याला हातभारच लागतो.

असे दिसून आले आहे की मनोविकारशी संबंधित पूर्वग्रह आणि कलंकाची भावना यामुळे मनोविकारग्रस्त व्यक्तींना बर्‍याचदा मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुविधांचा लाभ कमी प्रमाणात घेता येतो, त्यांचे आयुर्मान कमी होते, शिक्षणात खंड पडतो, ते समाजातून बाहेर फेकले जातात, गरीबी, बेरोजगारी, बेघर होणे, पोलीस आणि कोर्टाची पायरी चढावी लागणे यांचा सामना त्यांना करावा लागतो.

 

शिक्षकांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे:

  • कलंक हे बदनामीचे चिन्ह आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला इतरांपेक्षा वेगळे ठेवले जाते. एखाद्या व्यक्तीवर आजाराचे लेबल लावल्यानंतर त्यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून न बघता एका विशिष्ट गटाचा भाग म्हणून बघितले जाते.
  • या गटकडे बघण्याच्या नकारात्मक दृष्टीकोनामुळे पूर्वग्रह जोपासले जातात आणि पुढे जाऊन त्यातून नकारात्मक कृती आणि भेदभाव निर्माण होतो.
  • कलंक = साचेबद्ध प्रतिमा तयार करणे, पूर्वग्रह व भेदभाव.
  • कलंक आपल्यासोबत लाज, दोष, निराशा, त्रास, एकटेपणा, अलगाव आणि सामाजिक बहिष्कार घेऊन येतो 

  • अशा व्यक्तीची साचेबद्ध प्रतिमा तयार होते, तिला अपमानकारक शिक्के भेदभाव यांना तोंड द्यावे लागते. 
  • कलंकामुळे व्यक्तीचा आजार वाढतो आणि त्यामुळे आवश्यक मदत घेणे किंवा स्वीकारणे यात अडथळा येतो.

  • कलंकामुळे कुटुंबांवरसुद्धा परिणाम होतो ज्यामुळे आजार उघड करणे आणि मदत घेणे टाळले जाते.

मानसिक आरोग्यासंदर्भात प्रचलित पूर्वग्रह कसे बादलावेत? 

  1. मनोविकारासंबंधीच्या पूर्वग्रहांचा निषेध, त्यासंबंधी शिक्षण आणि संपर्क यामुळे पूर्वग्रह कमी होऊ शकतात. पूर्वग्रहाचा निषेध होतो तेव्हा पूर्वग्रह नैतिकदृष्ट्या अन्यायकारक आहेत हे मांडले जाते आणि लोकांना अशा चुकीच्या पद्धतीने न वागण्यासाठी उद्युक्त केले जाते. 
  2. शिक्षणामुळे मानसिक आजाराबद्दलच्या गैरसमजुतींना आव्हान दिले जाते आणि त्याऐवजी योग्य माहिती दिली जाते.
  3. संपर्क: एखादी मनोविकारग्रस्त व्यक्ति आणि सामान्य लोक यांच्या समोरासमोरील संवादामुळे लोकांच्या दृष्टीकोनात मोठाच फरक पडतो. 
  4. प्रसारमाध्यमांचा वापर करून पार पाडलेल्या सामुदायिक स्तरावरील जन-जागृती मोहिमा, हे वरील तीन दृष्टिकोन एकत्र आणतात आणि जगभरात मानसिक आजाराविषयी लोकांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी त्या वापरल्या जातात. 
 

कलंक कसा कमी करावा?

उपचार, सामाजिक जोडलेपण यावर भर देणारा, भेदभाव टाळणारा समुदाय तयार करण्यामध्ये आपल्या सर्वांची भूमिका महत्त्वाची असते. मनोविकार असलेल्या लोकांसंदर्भातील पूर्वग्रह आणि त्यांच्याप्रती असलेला भेदभाव कमी करण्याचे काही साधे मार्ग आहेत. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे:  

  1. मानसिक आरोग्य आणि आजारांबद्दल तथ्य जाणून घ्या आणि इतरांना सांगा. 
  2. मानसिक आजाराचा अनुभव असलेल्या लोकांशी परिचय करून घ्या. 
  3. मित्र,कुटुंबिय किंवा प्रसार माध्यमातून मनोविकाराबद्दलच्या चुकीच्या धारणा किंवा नकारात्मक साचेबद्ध प्रतिमा समोर येत असतील तर तुमचे वेगळे मत मांडा. 
  4. आजारी व्यक्तीला मदत करताना, आजार शारीरिक असो कि मानसिक, सारखीच मदत करा. 
  5. लोकांविषयी त्यांच्या आजारावरुन मत बनवू नका. 
  6. मनोविकारग्रस्त व्यक्तीला इतर कोणालाही वागवता तितक्याच सन्मानाने वागवा, तिची प्रतिष्ठा जपा. त्यांना निवारा आणि रोजगार देताना भेदभाव करू नका. 
  7. आपल्या स्वत:च्या मानसिक आजाराच्या अनुभवाबद्दल मोकळेपणाने बोला. मानसिक आजार जितका लपवला जातो, तितका तो लज्जास्पद आहे हा लोकांचा विश्वास दृढ होतो. 
  8. मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रेरणा देणारे सार्वजनिक संदेश द्या (जसे की बरे राहण्याचे पाच मार्ग: संपर्क, सक्रियता, ध्यान द्या, शिकत रहा आणि देणारे व्हा)

चला मानसिक आजाराबद्दलचे काही सामान्य गैरसमज मिटवूया: 


असत्य

मानसिक आजार हे ठराविक लोकांना होतात. 


सत्य

मानसिक आजार हे सार्वत्रिक आहेत. सर्व वयोगटातील, सर्व शैक्षणिक व आर्थिक गटातील आणि सर्व संस्कृतीतील लोकांना मानसिक आजार होतात. 


असत्य

वैयक्तिक कमजोरीमुळे मानसिक आजार होतात.


सत्य

मानसिक आजार हा व्यक्तिमत्वाचा दोष नाही. ते जैविक, अनुवंशिक, सामाजिक आणि वातावरणातील परस्परक्रियांमुळे होतात. मदत मागणे आणि स्वीकारणे हे सामर्थ्याचे लक्षण आहे.


असत्य

मानसिक आजार असणारे लोक कधीच बरे होत नाहीत.


सत्य

योग्य मदत मिळाली तर बरेच लोक मानसिक आजारातून बरे होतात आणि चांगले आयुष्य जगतात. 


असत्य

मानसिक आजार असलेले लोक स्वतःच स्वतःला त्यातून बाहेर काढू शकतात.


सत्य

मानसिक आजार वैयक्तिक दुर्बलतेमुळे होत नाही आणि वैयक्तिक ताकदीने तो “बरा” होत नाही.


असत्य

मानसिक आजार असलेले लोक हिंसक असतात. 


सत्य

मानसिक आजार असलेले लोक उर्वरित लोकांपेक्षा अधिक हिंसक किंवा धोकादायक नसतात. मनोविकारग्रस्त लोक इतरांपेक्षा स्वतःला इजा पोहोचवतील किंवा इतर लोक त्यांना इजा पोचवतील ही शक्यता जास्त असते.


असत्य

मानसिक आजार असलेल्या लोकांना रुग्णालयात ठेवावे.


सत्य

योग्य उपचार आणि आधार याद्वारे मानसिक आजार असलेले लोक समाजात यशस्वीरित्या जगू शकतात. खरं तर, मानसिक आजार असलेले बहुतेक लोक समाजात स्वतंत्रपणे जगतात.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search