Search

अत्त्याचार आणि हिंसा

हेतुपूरस्सर दुसर्‍या व्यक्तीला त्रास देण्याच्या किंवा दुखावण्याच्या कृतीला अत्त्याचार असे म्हणतात.

थोडक्यात,एखाद्याने हेतुपुरस्सरपणे दुसर्‍यास दुखावले तर तो अत्त्याचार आहे. होय, हेतुपुरस्सरपणे दुसर्‍यास इजा पोहोचवणे हा अत्त्याचार आहे. आपल्यापैकी बहुतेकजण वेळोवेळी असे वागत असतात. अत्त्याचार करणे म्हणजे ताबा मिळवणे. एक बाजू दुसर्‍या बाजूवर ताबा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते तेव्हा अत्त्याचार केला जातो. हे अत्त्याचाराचे स्पष्टीकरण असू शकते, परंतु ते समर्थनीय नाही. अशा प्रकारे दुसर्‍या व्यक्तीवर ताबा मिळविण्यासाठी अत्त्याचार करण्याचा कोणालाही अधिकार नाही. अत्त्याचाराला बळी पडलेल्यांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की अत्त्याचार करणे हे चुकीचे आहे आणि त्याला बळी पडणे हा काही आपला दोष नाही. अत्त्याचारमुक्त आयुष्य जगण्याचा प्रत्येक व्यक्तीला हक्क आहे. 

कौटुंबिक अत्त्याचाराला“कौटुंबिक हिंसाचार” किंवा “जोडीदारकडून होणारा हिंसाचार” असेही म्हंटले जाते. येथे अत्त्याचार म्हणजे जोडीदार/बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड अशा नात्यामध्ये वर्चस्व गाजविण्यासाठी केलेले वर्तन. अत्त्याचार हा शारिरीक, लैंगिक, भावनिक, आर्थिक, मानसिक किंवा धमकावणे या स्वरूपाचा असतो, त्याचा दुसर्‍या व्यक्तीवर प्रभाव पडतो. मुले, इतर नातेवाईक किंवा कुटुंबातील एखादा सदस्यसुद्धा कौटुंबिक अत्याचाराचा बळी असू शकतो.

यामध्ये एखाद्याला घाबरवणे, धमकावणे , दहशत माजवणे , दबावात ठेवणे, अपमान करणे, दोष देणे, इजा करणे किंवा जखम होईल अशा वर्तनाचा समावेश होतो. कोणत्याही जात, वय, धर्म किंवा लिंगाच्या व्यक्तीवर कौटुंबिक अत्याचार होऊ शकतो. विवाहित जोडपी, एकत्र राहणार्‍या किंवा डेट करणार्‍या व्यक्ती अशा वेगवेगळ्या नातेसंबंधामध्ये हे घडू शकते. सर्व सामाजिक, आर्थिक तसेच शैक्षणिक स्तरातील व्यक्तींना कौटुंबिक हिंसाचाराचा अनुभव येऊ शकतो. 

कोणत्याही जात, धर्म, वर्ग, लिंग किंवा वयाची व्यक्ती कौटुंबिक हिंसाचारला बळी पडू शकते.

कौटुंबिक नातेसंबंधातील जवळची व्यक्ती किंवा डेटिंगचा जोडीदार याच्या सोबत केलेल्या गैरवर्तनाचा कौटुंबिक हिंसाचारामध्ये समावेश होतो. येथे गैरवर्तन करणारी व्यक्ती पीडित व्यक्तीवर दबाव व सत्ता स्थापन करते.

घरगुती अत्त्याचार मानसिक, शारीरिक, आर्थिक किंवा लैंगिक स्वरूपाचे असू शकतात . या प्रकारच्या अत्त्याचाराच्या घटना सुट्यासुट्या नसतात, त्यांची वारंवारिता आणि तीव्रता हळूहळू वाढत जाते. घरगुती अत्याचारामुळे गंभीर शारीरिक इजा किंवा मृत्यू होऊ शकते.

तुमच्यावर अत्त्याचार होत आहेत का?

आपला जोडीदार आपल्याशी कसे वागतो आणि आपण आपल्या जोडीदाराशी कसे वागतो याविषयी विचार करण्यासाठी खालील प्रश्न पहा.

कौटुंबिक हिंसाचाराची चिन्हे ओळखणे

तुमचा जोडीदार (पती/पत्नी) हे करतो का?

  • तुमचे मित्र किंवा कुटुंबियांसमोर तुम्हाला लाज वाटेल अशी मस्करी करणे.
  • कमीपणा देणे.
  • तुम्ही निर्णय घेण्यास असमर्थ आहात असे जाणवून देणे.
  • मान्यता मिळविण्यासाठी दहशत निर्माण करणे किंवा धमकावणे.
  • त्यांच्याशिवाय तुम्ही काहीच नाही असे सांगणे.
  • उद्धटपणे वागणे – पकडणे, धक्का मारणे, चिमटे काढणे किंवा मारणे.
  • रात्री बरेच वेळा फोन करणे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी जाणार होता त्याच ठिकाणी आहात हे दाखविण्यासाठी पुरावा मागणे.
  • हानिकारक गोष्टी बोलण्यासाठी किंवा शिवीगाळ करण्यासाठी निमित्त म्हणून ड्रग्स किंवा दारूचा उपयोग करणे.
  • त्यांना जे वाटते किंवा ते जसे वागतात त्यासाठी दोष देणे.
  • ज्या गोष्टींसाठी तुम्ही तयार नाही त्या गोष्टी करण्यासाठी तुमच्यावर लैंगिक दबाव आणणे.
  • तुम्ही या नात्यामधून बाहेर पडू शकणार नाही असे भासविणे.
  • तुम्हाला हव्या असणार्‍या गोष्टी करण्यापासून थांबविणे – जसे की मित्र किंवा कुटुंबिय यांच्या सोबत वेळ घालविणे.
  • भांडणानंतर एकटे न सोडणे किंवा भांडणानंतर “तुम्हाला धडा शिकवण्यासाठी” कुठेतरी नेऊन ठेवणे.

तुमच्या बाबतीत असे घडते का?

  • कधीकधी आपला जोडीदार कसा वागेल? याची भीती वाटते.

  • जोडीदाराच्या वर्तनासाठी सतत इतर लोकांना कारणे सांगावी लागतात.

  • असं वाटते की जर स्वतःमध्ये बदल केला तर जोडीदाराला बदलण्यासाठी मदत करता येईल.

  • वाद निर्माण होतील किंवा जोडीदाराला राग येईल अशी कोणतीही गोष्ट करणे तुम्ही टाळता.

  • स्वतःला जे करावेसे वाटते त्याऐवजी जोडीदाराला जे वाटते ते नेहमी केले जाते.

  • आपण नाते तोडले तर जोडीदार काय करेल याची भीती वाटते.

यापैकी काही जर तुमच्या नात्यात घडत असेल तर कोणाशी तरी या विषयी बोला. मदत घेतली नाही तर अत्त्याचार सुरूच राहतील. मदत मागण्यासाठी एक फोन करणे हे धैर्य वाढविण्यासाठी महत्वाचे पाऊल आहे.

नेहमी लक्षात ठेवा: कोणतेही कारण अत्त्याचाराचे समर्थन करू शकत नाही. आपल्याशी कोणीतरी गैरवर्तन करणे ही आपली चूक नाही. असा अनुभव येणारे तुम्ही एकटे नाहीत.

अधिकार आणि नियंत्रणाचे चाक

शारीरिक आणि लैंगिक हल्ले किंवा अशा हल्ल्यांच्या धमक्या हे घरगुती अत्त्याचार आणि हिंसाचाराचे स्पष्टपणे नजरेस येणारे प्रकार आहेत. सामान्यत: त्यामुळे हिंसाचाराकडे इतरांचे लक्ष जाते. नियमित आपमानास्पद वागणूक व शारिरीक हिंसाचार या दोन्ही एकत्र झाले की अत्याचाराचा परीघ विस्तारतो. शारीरिक हल्ला जरी फक्त एकदा किंवा कधी तरी झाला तरी त्यामुळे भविष्यात हिंसक हल्ला होण्याची भीती पीडीत व्यक्तीच्या मनात निर्माण होते आणि अत्याचार करणारी व्यक्ती पीडीत व्यक्तीच्या जीवनाचा आणि परिस्थितीचा ताबा घेते.

हिंसाचार करणारी व्यक्ती जोडीदारावर किंवा कुटुंबातील व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी करत असलेले अत्त्याचार आणि हिंसक वर्तनाचे स्वरूप समजून घेण्यासाठी 'अधिकार व नियंत्रणाचे चक्र' हे एक उपयुक्त साधन आहे. बर्‍याचदा हिंसाचाराच्या एका किंवा अधिक घटनेनंतर तशा प्रकारच्या इतर वर्तनाची पुनरावृत्ती होत राहते. या वर्तनाकडे बहुतेकवेळा हिंसा म्हणून बघितले जात नाही परंतु त्यातून हिंसक व्यक्तीचा पीडीत व्यक्तीवरील ताबा अधिक घट्ट होतो.

संदर्भ: द डुलथ मोडेल | डोमेस्टिक अ‍ॅब्यूज इंटरव्हेंशन प्रोजेक्ट, डुलथ, एमएन 

भावनिक अत्याचार: यामध्ये सतत टीका करून व्यक्तीची स्वतःची किंमत कमी करणे, तिच्या क्षमतांना कमी लेखणे, नावे ठेवणे किंवा इतर शाब्दिक अत्याचार करणे; जोडीदाराच्या मुलांबरोबरच्या नात्याला हानी पोहोचवणे; किंवा जोडीदारास मित्र आणि कुटूंबियांना भेटू न देणे इत्यादि गोष्टींचा समावेश होतो. जर तुमचा जोडीदार पुढील गोष्टी करत असेल तर तुमच्या नात्यात तुम्ही भावनिक अत्त्याचार सोसत आहात असे म्हणता येईल:

  • तुम्हाला नावे ठेवणे, अपमान करणे किंवा सतत टीका करणे.
  • तुमच्यावर विश्वास न ठेवणे, मत्सर करणे किंवा ताब्यात ठेवणे.
  • तुम्हाला कुटुंब किंवा मित्रांपासून दूर करण्याचा प्रयत्न करणे.
  • तुम्ही कुठे जाता, कोणाला फोन करता आणि कोणाबरोबर वेळ घालवता यावर नजर ठेवणे.
  • तुम्हाला काम न करू देणे.
  • तुमच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे किंवा पैसे द्यायला नकार देणे.
  • प्रेम, आस्था व्यक्त न करून शिक्षा देणे.
  • तुम्ही परवानगी विचारण्याची अपेक्षा करणे.
  • तुम्हाला, तुमच्या मुलांना, कुटुंबियांना किंवा पाळीव प्राण्यांना त्रास देण्याची धमकी देणे.
  • तुम्हाला कोणत्याही प्रकारे अपमानित करणे.

मानसिक गैरवर्तन धमकी देऊन भीती निर्माण करणे; स्वत: ला, जोडीदाराला किंवा मुलांना शारीरिक इजा करण्याची धमकी देणे; पाळीव प्राणी आणि इतर संपत्तीला हानी पोहोचविणे; “भावनिक खेळ'' खेळणे; किंवा मित्र, कुटुंब, शाळा आणि कामापासून दूर ठेवणे.

पैसे किंवा आर्थिक गैरवर्तनः यामध्ये एखाद्या व्यक्तिला आर्थिक दृष्ट्या परावलंबी बनविण्याचा किंवा तसा प्रयत्न करण्याचा समावेश होतो. उदा. त्या व्यक्तीच्या आर्थिक उत्पन्नावर संपूर्ण नियंत्रण ठेवून, पैशांच्या वापरावर निर्बंध आणणे आणि शाळा / महाविद्यालय किंवा कामाच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालणे.

शारीरिक शोषणःयामध्ये जोडीदारास मारहाण करून दुखापत करणे, जाळणे, पकडणे, चिमटे काढणे, चापट मारणे, केस ओढणे, चावणे, वैद्यकीय उपचार नाकारणे किंवा दारू किंवा मादक पदार्थांचा वापर करण्यास भाग पाडणे किंवा इतर प्रकारे दुखापत करणे किंवा दुखापत करण्याचा प्रयत्न करणे याचा समावेश होतो. तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खालील दुर्व्यवहार करत असेल तर तुम्ही शारीरिक शोषणग्रस्त असू शकता:

  • राग आल्यावर मालमत्तेचे नुकसान करणे (वस्तू फेकणे, भिंतीवर बुकक्या मारणे, दार वाजविणे इ.)
  • तुम्हाला मारणे, धक्का देणे, चापट मारणे किंवा चावणे.
  • तुम्हाला धोकादायक किंवा अनोळखी ठिकाणी सोडणे.
  • बेपर्वाईने वाहन चालवून तुम्हाला घाबरविणे.
  • तुम्हाला धमकी देण्यासाठी किंवा दुखापत करण्यासाठी शस्त्राचा वापर करणे.
  • तुम्हाला घर सोडण्यास भाग पाडणे.
  • तुम्हाला घरामध्ये कोंडून ठेवणे किंवा घराच्या बाहेर पडून न देणे.
  • तुम्हाला पोलिसांना फोन करण्यास किंवा वैद्यकीय मदत घेण्यास प्रतिबंध करणे .
  • तुमच्या मुलांना त्रास देणे.
  • लैंगिक परिस्थितीत शारीरिक शक्तीचा वापर करणे.

लैंगिक अत्त्याचार: यामध्ये सहमतीशिवाय जोडीदाराला लैंगिक कृतीत सहभागी होण्यासाठी भाग पाडण्याचा समावेश होतो. जर तुमचा जोडीदार खालील गोष्टी करत असेल तर तुमच्यावर लैंगिक अत्त्याचार होत आहे:

  • तुमच्यावर गैरकृत्य केल्याचा आरोप करणे किंवा बर्‍याचदा तुमच्या बाहेरील नात्यांविषयी शंका घेणे.
  • तुम्हाला लैंगिक दृष्टीने वेषभूषा करायला लावणे.
  • लैंगिक कृतीतून तुमचा अपमान करणे किंवा तुम्हाला अश्लील नावाने हाक मारणे.
  • लैंगिक कृत्य करण्यास कधीही भाग पाडणे किंवा छेडछाड करणे.
  • लैंगिक संबंधात तुम्हाला दाबून ठेवणे.
  • तुम्ही आजारी असताना, थकलेले असताना किंवा तुम्हाला मारहाण केल्यानंतर लैंगिक संबंधांची मागणी करणे.
  • लैंगिक संबंधादरम्यान शस्त्रे किंवा इतर वस्तूंचा वापर करून तुम्हाला दुखापत करणे.
  • तुमच्या बरोबरच्या लैंगिक क्रियांमध्ये इतर लोकांना सामील करणे.
  • लैंगिक संबंधातील तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे.

पाळत ठेवण्याचे अनेक मार्ग असतात. पीडीत व्यक्तीला त्रास देणे, दहशत दाखवणे, घाबरवणे हा त्यामागील हेतू असतो. काही प्रकारामध्ये वारंवार फोन करणे, नको असणारी पत्रे किंवा भेटवस्तू पाठविणे, कामाच्या ठिकाणी, घरी किंवा पीडित व्यक्ति वारंवार जाते अशा ठिकाणी पाळत ठेवणे इत्यादि गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. पाळत ठेवणे हे बहुतेक वेळा वाढत जाते.

लैंगिक अत्त्याचार म्हणजे काय?

इच्छा नसताना लैंगिक क्रिया करायला भाग पाडणे म्हणजे “लैंगिक अत्त्याचार” होय. लैंगिक अत्त्याचार लैंगिक हिंसाचाराचा एक प्रकार आहे आणि यात अनेक प्रकारच्या अवांछित लैंगिक वर्तनांचा समावेश असू शकतो. आपल्या ओळखीच्या किंवा अनोळखी अशा कोणत्याही व्यक्ती लैंगिक अत्त्याचार करू शकतात. ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्त्याचार होत असतात ती पीडीत व्यक्ती असते व त्यात तिची काहीही चूक नसते. आपल्या मनाविरुद्ध कोणतेही लैंगिक कृत्य करण्यास आपल्याला भाग पाडणे हे योग्य नाहीये.

यामध्ये:

  • जबरदस्ती, अवांछित लैंगिक संबंध किंवा लैंगिक क्रिया करणे.
  • बाल लैंगिक अत्याचार: मुलाला लैंगिक क्रियेत गुंतवणे.
  • असभ्यपणे अचानक हल्ला करणे जसे की अयोग्य पद्धतीने स्पर्श करणे, तुमच्या संमतीशिवाय लैंगिक कृतींमध्ये भाग घेण्यास जबरदस्ती करणे.

लैंगिक अत्याचारामुळे तुमच्या मनात भावनांचा कल्लोळ उसळू शकतो. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या संस्था मदत करू शकतात. आपल्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे का? असा प्रश्न पडला असेल तर तुमच्या त्या संबंधीच्या जाणीवेवर विश्वास ठेवा आणि व्यावसायिक मदत घ्या. उदाहरणार्थ, पूर्वग्रह न ठेवता बोलणारे समुपदेशक. 

लैंगिक अत्त्याचार हा आपला दोष कधीच नसतो!

तुम्ही कोण आहात किंवा तुम्ही काय कपडे घातले आहेत किंवा मद्य घेतलेले आहे, यामुळे तुमच्यावर लैंगिक अत्त्याचार झालेला नाही. तुमच्यावर सत्ता व नियंत्रण मिळविण्यासाठी कोणीतरी तुमच्याबरोबर हे वाईट वर्तन केलेले आहे. हा काही तुमचा दोष नाही.

लैंगिक अत्त्याचार हा आघात करण्याचा एक प्रकार आहे.

लैंगिक हल्ला हा एक आघात आहे आणि त्याबद्दलचा प्रतिसाद वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होऊ शकतो.घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवून तुम्हाला त्यावेळेस झालेला शारीरिक त्रास जाणवू शकतो आणि त्यामुळे पॅनीक अटॅक येऊ शकतात. लैंगिक अत्त्याचाराचा परिणाम म्हणून पीटीएसडी (पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) त्रास देखील होऊ शकतो. त्यामध्ये स्वप्ने, अनाहूत विचार आणि आठवणी यांचा समावेश असू शकतो.

लैंगिक अत्याचाराचा आपल्यावर कसा परिणाम होऊ शकतो?

लैंगिक अत्याचाराबद्दल प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतो. पुढील सर्व प्रतिसाद सामान्य आहेतः

१) धक्का आणि नकार: ‘हे खरोखर माझ्याबरोबर घडले आहे काय?’ किंवा ‘मीच का?’ असा विचार करणे आणि हे खरोखर घडले आहे हे स्वीकारायला नकार देणे.

२) भीतीः अत्याचार करणार्‍या व्यक्तीची भीती वाटणे, एकटे पडण्याची किंवा आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही याची भीती वाटणे.

३) मौन: लोक आपल्याला दोष देतील या भावनेतून तुम्ही अत्त्याचाराविषयी किंवा अत्त्याचारानंतर तुम्हाला काय वाटत आहे याविषयी बोलू शकत नाही.

४) चिंता: तुम्हाला असुरक्षित व अस्वस्थ वाटू शकते.

५) उदासिनता: तुम्हाला दु: खी, निराश वाटू शकते किंवा पूर्वी ज्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला आनंद वाटत होता तो आता घेता येत नाही. 

६) अपराधीपणा आणि दोष: ‘मी तिथे का गेले? 'त्याला परवानगी का दिली?' ' प्रतिकार का केला नाही ?'असे प्रश्न तुम्ही विचारून तुम्ही स्वतःला दोष देऊ शकता.

७) आत्मसन्मान कमी होणे: तुमचा आत्मविश्वास जाऊ शकतो आणि लाज तसेच आपण गालिच्छ आहोत, ‘आपली लायकी नाही ’अशा भावना मनात येऊ शकतात.

८) अलगावः तुम्हाला एकटे राहवेसे वाटू शकते आणि तुम्ही कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करता.

९) भयानक स्वप्ने आणि फ्लॅशबॅक: अत्त्याचार झाला त्यावेळीची दृश्य आणि घटना आठवू शकतात ज्यामुळे दिनक्रम व झोप यावर परिणाम होऊ शकतो.

१०) मूड स्विंग्स: मनस्थिती बिघडते. कधी राग आणि संताप,अश्रु आणि निराशा वाटते तर परत चांगले वाटते.

११) आत्मविश्वास गमावणे: स्वतःच्या काम किंवा अभ्यास करण्याच्या क्षमतेबद्दल चिंता वाटणे. मित्र किंवा जोडीदारासोबत वावरण्याचा आत्मविश्वास कमी होणे.

१२) विश्वास कमी होणे: तुमच्या जवळच्या किंवा कुटुंबातील लोकांवर विश्वास ठेवणे तुम्हाला कठीण वाटू शकते.

१३) पीटीएसडी (पोस्ट ट्रायमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर): तो प्रसंग, त्याच्याशी संबंधित विशिष्ट आठवणी मनात येत राहणे व मन सुन्न होणे. 

१४) फ्लॅशबॅक / आठवणी: कदाचित घडलेल्या घटना किंवा अत्त्याचाराच्या आठवणी येणे. 

आपल्यावर लैंगिक अत्त्याचार / हल्ला झाल्यास काय करावे?

आपल्यावर लैंगिक अत्त्याचार होत असल्यास, स्वतःला वाचविण्यासाठी तुम्ही ताबडतोब काय करू शकता याविषयी काही गोष्टी येथे सांगितल्या आहेत:

१) तुम्ही सुरक्षित आहात याची खात्री करा

तुम्हाला धोका असल्यास किंवा तुम्हाला सुरक्षिततेबद्दल काळजी वाटत असल्यास त्वरित १०० क्रमांकावर आपत्कालीन सेवांशी संपर्क साधावा आणि कुठेतरी सुरक्षित जागी जाण्याचा प्रयत्न करा.

२) कुणाशी तरी बोला

हे कठीण असू शकते परंतु तुम्हाला आधार मिळवा आणि बरे होण्याची प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी हे महत्वाचे आहे. तुम्ही बोलू शकाल असा एखादा मित्र, कुटुंबातील सदस्य, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता किंवा तुमच्या जिल्ह्यातील किंवा राज्यातील एखाद्या संस्थेशी संपर्क साधा. या व्यक्ती मदत मिळविण्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती देखील देऊ शकतात.

गोपनीयता मदत मिळवा:

३) वैद्यकीय मदत मिळवा

लैंगिक अत्त्याचार झाल्यास, वैद्यकीय सहाय्य मिळवणे शक्य आहे. गरज असल्यास रुग्णालय किंवा आरोग्य केंद्रात जा. तेथे योग्य वैद्यकीय सेवा मिळू शकते.

४) पोलिसांशी संपर्क साधण्याचा विचार करा

लैंगिक अत्त्याचाराबद्दल पोलिसांना कळवायचे की नाही हे ठरवणे कठीण जाऊ शकते. तुम्ही तुमच्या दृष्टीकोनातून योग्य असणारा निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला तर पीडीत व्यक्तीला मदत व्हावी या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेल्या कार्यपद्धतीची माहिती घ्या. तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये कोणालातरी सोबत नेऊ शकता. तुम्ही लैंगिक अत्त्याचारा बद्दलच्या महत्वाच्या गोष्टी लिहून सोबत नेऊ शकता. त्यामुळे तक्रार देतेवेळी कमी ताण येऊ शकतो.

५) स्वत:वर विश्वास ठेवा

एखाद्याने आपल्यावर हल्ला केला असेल तर आपल्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. आत्मविश्वासाने निर्णय घेता येत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. कोणीही कोणत्याही कारणास्तव आपल्यावर हल्ला करणे कधीच योग्य नाहीये हे लक्षात ठेवा.

भावनिक अत्त्याचार म्हणजे काय?

भावनिक अत्त्याचार शारीरिक शोषणाइतकेच विध्वंसक आणि हानिकारक असू शकतात आणि आपल्या मानसिक आरोग्यावर तीव्र परिणाम करू शकतात. एखाद्यावर सत्ता आणि नियंत्रण राखण्यासाठीचा एक मार्ग म्हणून ते वापरले जातात.

भावनिक अत्त्याचारासोबत लैंगिक, आर्थिक, शारीरिक किंवा इतर प्रकारचे अत्त्याचार देखील होऊ शकतात. परंतु एखाद्या वर्तनाला गैरवर्तन म्हणण्यासाठी इतर प्रकारचे अत्त्याचार झालेले असले पाहिजेत असे नाही, भावनिक अत्त्याचार हे गंभीरपणे घ्यायचे अत्त्याचार आहेत. भावनिक अत्त्याचारासोबत लैंगिक, आर्थिक, शारीरिक किंवा इतर प्रकारचे अत्त्याचार देखील होऊ शकतात. परंतु एखाद्या वर्तनाला गैरवर्तन म्हणण्यासाठी इतर प्रकारचे अत्त्याचार झालेले असले पाहिजेत असे नाही, भावनिक अत्त्याचार हे गंभीरपणे घ्यायचे अत्त्याचार आहेत.

भावनिक अत्त्याचाराचे प्रकार

भावनिक अत्त्याचारामध्ये पुढीलपैकी कोणत्याही गोष्टींचा समावेश असू शकतो:

  • शाब्दिक गैरवर्तन आरडाओरडा करणे, अपमान करणे किंवा शपथा घेणे.
  • नकार: सातत्याने तुमचे विचार, कल्पना आणि मते नाकारणे.
  • गॅसलाइटिंगः तुमच्या स्वतःच्या भावना, विचार एवढेच नव्हे तर तुमच्या शहाणीवेबद्दल तुमच्याच मनात शंका निर्माण होईल अशाप्रकारे परिस्थिती तुमच्यासमोर मांडणे.
  • कमीपणा देणे: नावे ठेवणे किंवा तुम्ही मूर्ख आहात असे जाहीरपणे सांगणे, सर्वांसमोर लाजिरवणे बोलणे, सर्व गोष्टींसाठी दोष देणे. सार्वजनिक अपमान हा देखील सामाजिक अत्त्याचाराचा एक प्रकार आहे.
  • भीती निर्माण करणे: तुम्हाला भीती दाखविणे, घाबरवणे किंवा धमकावणे.
  • अलगाव: तुमच्या फिरण्याच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणणे, इतर लोकांशी संपर्क साधण्यापासून रोखणे (जसे की मित्र किंवा कुटुंब). तुम्ही नियमित करत असणार्‍या गोष्टी करण्यापासून थांबविणे जसे की - सामाजिक क्रिया, खेळ, शाळा किंवा काम. एकटे पाडणे हा सामाजिक आलगावाचा भाग आहे.
  • आर्थिक गैरवर्तन: तुमच्या पैशाच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवणे किंवा थांबविणे, काम किंवा अभ्यास करण्यावर बंधन घालणे, तुमचे पैसे चोरणे. आर्थिक अत्त्याचार हा घरगुती हिंसेचा आणखी एक प्रकार आहे.
  • गुंडगिरी आणि धमकी: हेतुपुरस्सर आणि वारंवार तुम्हाला इजा होईल अशा गोष्टी करणे.

भावनिक अत्त्याचाराचा परिणाम

भावनिक अत्याचारापेक्षा शारीरिक हिंसेकडे गंभीरपणे पाहिले जाते, परंतु भावनिक अत्त्याचारामध्ये जास्त त्रास होतो. भावनिक अत्त्याचाराच्या जखमा ह्या दीर्घकाळ टिकतात. स्वाभिमान आणि आत्मविश्वास यावर भावनिक अत्त्याचाराचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही निराश, चिंताग्रस्त होऊ शकता किंवा आत्महत्त्येचे विचार देखील येऊ शकतात.

आधार मिळविणे

तुमच्यावर भावनिक अत्त्याचार होत असल्यास, मदत घेणे गरजेचे आहे. तुम्हाला कोणाशी बोलायचे असल्यास बर्‍याच सेवा उपलब्ध आहेत. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता.

कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करत असताना कायदेशीर, आर्थिक, वैद्यकीय मदत मिळण्यासाठी तुम्ही कुठे जाऊ शकाल किंवा काही काळासाठी सुरक्षित निवारा हवा असेल तर तो कुठे मिळू शकेल याची माहिती मिळवण्यासाठी कौटुंबिक हिंसाचार किंवा domestic violence हा शब्द इंटरनेटवर टाकून अधिक माहिती मिळवा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर आपल्याला भीती वाटत असेल किंवा आपण संकटात आहोत असे वाटत असेल तर आपत्कालीन सेवा (100) क्रमांकावर त्वरित संपर्क साधा.

अपमानास्पद नातेसंबधांची लक्षणे

It’s not always obvious that you’re in an abusive relationship. Learn some of the key signs to look for. It’s common for someone who is being abused to believe that it’s their own fault and that they somehow ‘deserve’ the abuse. It’s important to know that you’re never to blame for the way an abusive person treats you.

खालील लक्षणे ध्यानात ठेवा:

  • तुमचा पार्टनर / जोडीदार / प्रियकर तुमच्या वागण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो.
  • तुमचा पार्टनर / जोडीदार / प्रियकर तुम्हाला, पाळीव प्राण्यांना किंवा प्रिय व्यक्तीस नुकसान पोहोचवण्याची धमकी देतो.
  • तुम्हाला तुमचा जोडीदार/ पार्टनर/ प्रियकर याची भीती वाटते.

अपमानास्पद संबंधांची प्रमुख चिन्हे

अत्त्याचार हा केवळ शारीरिक हिंसाचारापुरता मर्यादित नाहीये. यात लैंगिक, भावनिक आणि शारीरिक शोषणाबरोबरच आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचादेखील समावेश होतो. त्याची काही लक्षणे खालील प्रमाणे:

मालकी

  • तुम्ही कुठे आहात, काय करीत आहात आणि कोणासोबत आहात हे पाहण्यासाठी ते नेहमीच तुमची चौकशी करत असतात.
  • तुम्ही कोठे जात आहात आणि कोणास भेटत आहात यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी जसे सांगितले आहे तसे न वागल्यास त्यांना राग येतो.

मत्सर

  • ते तुमच्यावर विश्वासघात केल्याचा किंवा छेडछाडीचा आरोप करतात.
  • ते तुम्हाला कुटुंब आणि मित्रांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी बरेचदा त्यांच्याबरोबर उद्धटपणे वागतात.

कमीपणा देणे

  • ते तुमच्या बुद्धिमत्तेवर, दिसण्यावर, मानसिकतेवर किंवा क्षमतेवर सार्वजनिकरित्या किंवा खाजगीरीत्या हल्ला करून कमीपणा देण्याचा प्रयत्न करतात.
  • ते सतत अयोग्यपणे तुमची तुलना इतरांशी करतात.
  • तुमच्या नात्यातील सर्व समस्यांसाठी आणि त्यांच्या हिंसक हल्ल्यांसाठी तुम्हाला दोषी ठरवतात.
  • ते असे म्हणतात की, ‘ तुम्ही कोणालाच आवडत नाही.’

धमक्या

  • ते ओरडतात किंवा गोंधळ घालतात आणि तुमच्यादृष्टीने मौल्यवान असणार्‍या गोष्टींची मुद्दाम तोडफोड करतात.
  • ते तुमच्यावर, कुटुंबावर, मित्रांवर किंवा पाळीव प्राण्यांवर हिंसाचाराचा करण्याची धमकी देतात.

शारीरिक आणि लैंगिक हिंसा

  • ते तुम्हाला धक्का देतात, हलवतात, आपटतात, पकडतात किंवा तुमच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवतात किंवा तुम्हाला करायच्या नसतील अशा गोष्टी करतात.
  • ते तुमचे, पाळीव प्राणी किंवा कुटुंबातील सदस्य यांचे नुकसान करतात.

अपमानास्पद नात्यात तुम्हाला पुढील गोष्टी जाणवू शकतात:

'माझा जोडीदार नेहमी हिंसक नसतो – त्याचे माझ्यावर प्रेम आहे'

आपला हिंसक जोडीदार इतर वेळी आपल्याशी प्रेमळ वागू शकतो आणि त्याच्या भयंकर वर्तनाबद्दल त्याला खरोखर वाईट वाटू शकते. त्यामुळे त्यांच्या वर्तनाबद्दल आपल्या मनात असलेला राग आणि नाराजी अनाठायी आहे असे आपल्याला वाटू शकते. तथापि, त्यांची हिंसक वागणूक कायम राहण्याची दाट शक्यता असते. गैरवर्तन करणारी व्यक्ती ही अन्यथा अत्यंत आकर्षक व्यक्ती असू शकते, खासकरून तुमच्या व इतरांच्या नजरेत चांगली व्यक्ती म्हणून भरण्यासाठी ती असा प्रयत्न करू शकते.

'गोष्टी अधिक चांगल्या होतील – असं होत नाही'

हिंसक घटनेनंतर, तुम्ही व तुमच्या जोडीदाराने क्षमा मागणे, कारणे सांगणे किंवा बदल करण्याचे आश्वासन देणे, विचार करणे हे साहजिक आहे. थोड्या काळासाठी गोष्टी ठीक होतात, परंतु एखादी गोष्ट घडली की परत सुरवात होते. नातेसंबंधांमधील शारीरिक अत्याचार आणि अपमानास्पद वागणूक ही कोणत्याही व्यावसायिक मदतीशिवाय नष्ट करणे फार अवघड आहे.

'हे खूप गोंधळात टाकणारे आहे '

तुमच्या पाहिल्याच नातेसंबंधात तुम्ही गैरवर्तन सहन करत असाल तर तुम्ही खरोखर गोंधळून जाऊ शकता कारण पुढे काय घडणार आहे याची तुम्हाला खात्री नसते. गैरवर्तन करणारे नक्की काय खरे आहे याबद्दलचे तुमचे आकलन प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही गोंधळता, आपण वेडे तर होत नाही ना असे तुम्हाला वाटू शकते. (याला ‘गॅसलाइटिंग’ असे म्हणतात.) सांख्यिकीयदृष्ट्या विचार करता, एकदा हिंसक वर्तन करणारी व्यक्ती पुन्हा तसे वागण्याची अधिक शक्यता असते.

'कदाचित ही माझी चूक आहे'

जोडीदाराने तुम्हाला अपमानास्पद रीतीने वागवले तर तुम्हाला तुम्ही दोषी आहात असे वाटू शकते. अपमानास्पद वागणूक देणारी व्यक्ती एखादे कारण सांगून स्वतःच्या वर्तनाचे समर्थन करू शकते. जसे की, ‘तू नसतीस तर असं झालं नसतं...’ तुम्ही काहीही केले असले तरी दुसर्‍या व्यक्तीचे गैरवर्तन ही कधीही तुमची चूक असू शकत नाही.

'मी त्यांना सोडल्यास काय होईल याची मला भीती आहे'

अत्त्याचार करणार्‍या व्यक्तीला सोडण्याची भीती वाटणे स्वाभाविक आहे. ती व्यक्ती तुम्हाला किंवा स्वतःला काही तरी करेल याच्या भीतीमुळे तुम्हाला असुरक्षित वाटू शकते. स्वतःच्या पातळीवर या गोष्टी हाताळण्याइतके तुम्ही सक्षम नाही असे देखील तुम्हाला वाटू शकते. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की आपल्याला प्रत्येक टप्प्यावर मदत करू शकतील असे लोक असतात.

मदतीसाठी संपर्क करा:

कौटुंबिक हिंसाचार (राष्ट्रीय): 181

महिला पोलिस हेल्पलाईन: 1091

नारी समता मंच, पुणे: 9987720696

स्वयं, कोलकता: 9830747030

सेहत, मुंबई: 9029073154

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search