Search

समवयस्क मुलांकडून समुपदेशन

समान परिस्थितीतून जाणार्‍या म्हणजेच समकक्ष व्यक्तींचे आधारगट किंवा त्यांनी एकमेकांना समुपदेशन करणे हे मार्ग मॉडेलिंग सिद्धांतावर आधारित असतात. यात असे गृहीत धरले जाते की ज्या व्यक्ती आपल्यासारख्या आहेत असे आपल्याला वाटते, त्यांच्याकडून आपण सर्वात जास्त शिकतो. समान विचारसरणीच्या यशस्वी व्यक्तींच्या संपर्कातून कमी अनुभवी व्यक्ती शिकू शकतात असे मानले जाते. त्यांचे बघून,स्वतःत बदल करून ते अधिक प्रभावी वर्तन स्वीकारू शकतात. त्यांना अधिक सामाजिक पाठबळ मिळते आणि ते अधिक आशावादी बनतात.

समकक्ष व्यक्तींनी एकमेकांसाठी चालवलेला हा एक विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आहे. जीवनात सारख्याच प्रकारच्या अडचणींना तोंड देणार्‍या आणि समकक्ष व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा करणार्‍या किंवा इतरांकडून शिकण्याची इच्छा असणार्‍या लोकांचा यात समावेश असतो. समकक्ष लोक जेव्हा ज्ञान, अनुभव, भावनिक किंवा सामाजिक आधार, व्यावहारिक मदत हे एकमेकांसोबत वाटून घेतात तेव्हा ते एकमेकांचे समुपदेशक होतात.  

समकक्ष समुपदेशक हे प्रत्येकवेळी इतर समुपदेशकांप्रमाणे व्यावसायिक समुपदेशक नसतात. समकक्ष समुपदेशनासाठी समान परिस्थितीतून जात असणार्‍या लोकांचा आधार गट तयार केला जातो. त्या परिस्थितीतून जाणारी किंवा पार झालेली कोणतीही व्यक्ति त्यात सहभागी होऊन आपले अनुभव सांगू शकते, शिकू शकते आणि समान अडचणीतून जात असलेल्या इतरांसोबत मदतीची देवघेव करू शकते. याचा अर्थ एकदा अशा समुपदेशन गटाचा भाग झाल्यावर कोणीही त्या गटासंदर्भात समकक्ष समुपदेशक बनू शकते. स्वतःच्या आयुष्यातील समस्यांवर स्वतः उत्तरे शोधायला मदत करणे हे समुपदेशनाचे उद्दीष्ट असते व समकक्ष समुपदेशनाचे देखील हेच उद्दीष्ट असते.उदाहरणार्थ, नैराश्याचा सामना करणार्‍या व्यक्तींच्या आधार गटात तुम्हाला नैराश्यातून बाहेत पडलेले लोक भेटतात, जे तुमचे समकक्ष समुपदेशक बनतात. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्या नंतर तुम्ही सावरण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यासाठी आधार देणारा, समान परिस्थितीतून जाणार्‍या व्यक्तींचा आधार गट असू शकतो. व्यवसायविषयक मार्गदर्शन किंवा दैनंदिन आयुष्य जगताना आवश्यक असलेले मार्गदर्शन यासाठी देखील आधार गट असतात. या आधार गटांमुळे आपल्यासारखेच अनुभव असलेल्या लोकांनी आपल्याला समजून घेतल्याचा, आपल्याबद्दल सहानुभाव बाळगल्याचा अनुभव आपल्याला मिळतो. 

हे समकक्ष समुपदेशनाचे कार्यक्रम विद्यार्थ्यांना चांगले श्रोते होण्याचे प्रशिक्षण देतात आणि आत्महत्या किंवा मानसिक आरोग्याच्या इतर समस्येची लक्षणे ओळखण्यास शिकवतात. विद्यार्थी नेतृत्व आणि मार्गदर्शनाचे काम करतात, तर शिक्षक, समुपदेशक आणि मानसिक आरोग्य व्यावसायिक त्यांना मदत करतात.

समकक्ष समुपदेशनामार्फत, तुम्ही हे करू शकता:  

  • तुमच्या भविष्यासाठी ध्येय व उद्दीष्ट ठरवणे  
  • तुम्हाला गरज असेल तर तज्ञ आरोग्य सेवा पुरविणार्‍या लोकांची मदत घेणे.  
  • तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढवणे  
  • मानसिक आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी मदत करणार्‍या मानसिक ताण व्यवस्थापनाच्या पद्धती शिकणे.  
  • तुमचा अनुभव सांगणे व इतरांच्या अनुभवातून शिकणे.  
  • चिरस्थायी नातेसंबंध निर्माण करणे.  
  • चांगले संवाद कौशल्य विकसित करणे.  
  • वेगवेगळ्या लक्षणांसाठी उपलब्ध असणार्‍या उपचार पद्धतींबद्दल शिकणे.  

आपले मूल निराश, उदास आहे का ते आपल्याला नक्की कळेल अशी काही पालकांची ठाम खात्री असते. असे दिसून आले आहे की अति आत्मविश्वास असलेल्या पालकांना प्रत्येकवेळी आपल्या मुलाचं काहीतरी बिनसलय हे कळेलच असे नाही. कदाचित समवयस्क मुलांच्या ते लवकर लक्षात येईल.

समकक्ष समुपदेशनाचे फायदे   

समकक्ष समुपदेशन गट किंवा वैयक्तिक समकक्ष समुपदेशन सत्र यांचा तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.  

  1. तुम्हाला थेट सल्ला मिळू शकतो. – जर तुमला शाळेतील भांडणे, मैत्री किंवा इतर विशिष्ट समस्येसाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असेल किंवा चांगले जीवन कसे जगावे याबद्दल सल्ला हवा असेल तर स्वतः तशा अनुभवातून गेलेल्या समकक्ष समुपदेशकाचा थेट सल्ला तुम्हाला मिळू शकतो. तज्ञ थेरपिस्टशी बोलून जेवढी मदत होणार नाही त्यापेक्षा यामुळे जास्त मदत मिळते. समकक्ष समुपदेशनाचे वेगळेपण म्हणजे समकक्ष मार्गदर्शक हे स्वतः त्या अंनुभावातून गेलेले असतात. .

  2. तुमची भाषा समजणार्‍या लोकांशी भेट - जेव्हा तुम्ही गट समुपदेशनात भाग घेता तेव्हा तुम्ही तुमच्यासारखे अनुभव असलेल्या लोकांच्या सानिध्ध्यात असता. येथे तुमच्या अंनुभवांबद्दल बोलण्यासाठी तुम्हाला मोकळा अवकाश मिळतो आणि ज्यांनी अशाच अडचणीवर मात केली आहे अशा इतर लोकांकडून तुम्ही शिकू शकता. गटातील प्रत्येकजण सारख्याचा अडचणींमधून जात असल्यामुळे ते तुम्हाला सहजपणे समजून घेतात.

  3. चोवीस तास उपलब्ध असलेला आधार - सर्व समकक्ष समुपदेशक चोवीस तास उपलब्ध नसले तरी, काही समकक्ष गटांच्या हेल्पलाईनवर कधीही संपर्क साधता येतो.

  4. इतर लोकांच्या अनुभवांमधून शिकणे - ज्याने स्वतः तुमच्या आत्ताच्या स्थितीसारखी स्थिती अनुभवली आहे आणि त्यातून स्वतः ला सावरले आहे अशा समकक्ष समुपदेशकाशी तुम्ही जोडले गेलात तर तुम्हाला जी समस्या डाचते आहे त्या समस्येतून वाट काढलेल्या व्यक्तीसोबत राहिल्यामुळे आपण देखील यातून बाहेर पडू ही भावना तुम्हाला त्या परिस्थितीतून सावरण्याचा आत्मविश्वास देईल.

  5. कौटुंबिक आधार वाढवणे - वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करणार्‍या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना समकक्ष समुपदेशन फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे ते तुमची परिस्थिती अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात.

  6. संवादासाठी मोकळा आणि सुरक्षित अवकाश – तुमचे अनुभव काहीही असोत समकक्ष समुपदेशनाच्या ठिकाणी तुम्ही त्याबद्दल मोकळेपणे बोलू शकता. तुमचे समकक्ष समुपदेशक त्याच अनुभवांमधून गेलेले असल्यामुळे ते तुम्हाला काय म्हणतील ही भीती किंवा आपले वागणे लांछनास्पद असल्याची भावना तुमच्या मनात येत नाही. म्हणूनच बर्‍याचदा समकक्ष समुपदेशन पद्धतीची बरे होण्यासाठी शिफारस केली जाते.

  7. शाळेत पुढच्या इयत्तेत असणार्‍या विद्यार्थ्यांकडून भावनिक, शैक्षणिक आणि नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी मदत मिळू शकते. या पद्धतीने दोन्ही विद्यार्थी हे करिअरसाठी उपयुक्त असणारी जीवनकौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे शिकतात.
  8. कपडे, केस किंवा व्यसनासारख्या नकारात्मक गोष्टींसंदर्भात किशोरवयीन मुलांवर समवयस्क मुलांचा प्रभाव असतोच. समवयस्क मुलांच्या आधार गटातून हे सिद्ध करता येईल की सकारात्मक मार्गाने काम करणारा समवयस्कांचा दबाव देखील असतो.
  9. एकमेकांना मदत करणारी एक आधार प्रणाली- फायदे दोघांनाही होतात, मोठी मुले जबाबदारी , सहानुभाव आणि नेतृत्वकौशल्ये शिकतात . दोघेही संभाषण कौशल्य शिकतात.
  10. परत देण्याची ही एक संधी आहे - जर तुम्हाला समवयस्क समुपदेशनाचा फायदा झाला तर तुम्ही समवयस्क समुपदेशक बनून तो पुढे देऊ शकता. मदत देण्यासाठी तुम्हाला समुपदेशनात पदवीची आवश्यकता नाही. तुमचे अनुभव, संभाषणकौशल्य आणि बरे होण्याचा तुमचा प्रवास हे गरज असलेल्या इतर लोकांना समुपदेशन देण्यासाठी पुरेसे आहे.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search