अधिकाधिक स्वतंत्र होणे हे किशोर वयीन मुलांचे उद्दीष्ट असते. ते साध्य करण्यासाठी त्यांना अनेक कौशल्ये आवश्यक आसतात. काही किशोरवयीन मुलांना सहजपणे या बदलाला सामोरे जाता येत नाही. त्यांचा स्वतंत्र होण्याचा प्रवास पालक आणि कुटुंबियांसाठी तणावपूर्ण आणि दुःखदायक असतो. किशोरवयाच्या सुरवातीच्या काळात मुले व पालक यांच्यातील नाते तणावपूर्ण, क्लेशकारक झालेले असेल तर व्यावसायिक मदत घेणे गरजेचे असल्याचे ते लक्षण असू शकते. लहान वयात पालकांनी मुलांना वेळ दिला, त्यांच्या वाढीत रस घेतला तर बाल वयातील छोट्या समस्या पुढे किशोर वयात जटिल बनणे टाळता येऊ शकते.
बालवयात आणि किशोरवयीन पालकांची यांच्या प्रती असणारी बांधिलकी ही आधार मिळविण्याचे स्त्रोत असून त्यामुळे जो पर्यंत त्यांचे वय, अनुभव वाढत नाही तोपर्यंत त्यांचा उपयोग होऊ शकतो.
शैक्षणिक दबाव, पालकांकडून स्वातंत्र्य मिळणे, समवयस्कांसोबतची घट्ट मैत्री, शारीरिक परिपक्वता, प्रेमात पडणे, पालकांच्या अपेक्षा असे जीवनातील मोठे बदल पौगंडावस्थेमध्ये अनुभवास येतात. तसेच दैनंदिन आयुष्यात तणावग्रस्त घटना घडण्याचे प्रमाण बालपणापेक्षा एकदम वाढते. पौगंडावस्थेतील ह्या बदलांमुळे व ताणामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यात अडचण निर्माण होऊ शकते. इतर लक्षणांसोबतच नैराश्य आणि चिंतेची लक्षणे दिसू शकतात. पौगंडावस्था ते तारुण्य असा सुरक्षित आणि यशस्वी प्रवास हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. जर कुटुंब आणि समाजाने त्यासाठी निश्चित गुंतवणूक केली तसेच आरोग्यपूर्ण, समाधानी आणि निर्मितीक्षम आयुष्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य आणि लवचिकता क्रमाक्रमाने विकसित करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या तरच हा या अधिकाराचा अंमल होऊ श्कातो.
मुलांच्या किशोरवयाच्या तयारीची सुरुवात पालकांनी लवकर करणे सगळ्यात चांगले. आपल्या मुलांचा किशोरवयातील प्रवास सुकर होण्यासाठी पालक स्वतःला व मुलांना खालील प्रकारे तयार करू शकतात.
- घरात स्थिर, सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण पुरविणे
- प्रामाणिकपणा, परस्पर विश्वास आणि आदराचे वातावरण तयार करणे
- कुटुंबामध्ये एकत्र जेवताना मुक्त संवाद करता येईल असे वातावरण तयार करणे.
- वयानुरूप स्वातंत्र्याची अपेक्षा व त्यांच्या मताबद्दलचा ठामपणा यांचा स्वीकार करणे.
- मुलांना आपल्याबरोबर बोलावेसे वाटेल असं नातं तयार करणे.
- स्वतःच्या व तुमच्या समानाची जबाबदारी घ्यायला शिकविणे.
- घरातील मूलभूत कामांची जबाबदारी घ्यायला शिकविणे
- स्वतःच्या मर्यादा स्वीकारण्याचे महत्व शिकविणे
- कृती करण्यापूर्वी विचार करण्याचे महत्त्व शिकवणे
या सर्व जटिल प्रक्रिया आहेत. आपण बाळ असताना आपले त्याबद्दलचे आकलन सुरू होते आणि ते हळूहळू विकसित होते. मुलाच्या बालवयातच पालक व मुलांनी मिळून या प्रक्रिया विकसित करण्यासाठी एकत्र काम केले तर किशोरवयातील ताण कमी होऊ शकतो.
अडचणीं बद्दल मोकळेपणाने बोलता येणे हा मुले आणि पालक यांच्या संबंधातील महत्त्वाचा भाग आहे.
हे नातं आणि त्यातील मुक्त संवाद विकसित होण्यासाठी वेळ, चिकाटी आणि धीर आवश्यक आहे. किशोरवयीन मुलाबरोबर वेळ घालवल्याने हळूहळू हे नाते विकसित होते. मुलांचे खेळ, छंदवर्ग, पालकांची नोकरी, काम, यातून मुलांबरोबरचा निवांत वेळ शोधणे हे एक आव्हान असते.
जेवताना, आई-वडिलांच्या तरुणपणीच्या गोष्टी सांगताना, पत्ते-व्यापार असे खेळ खेळताना, सुट्टी, सण समारंभ साजरे करतांना पालक मुलांसोबत असा वेळ घालवू शकतात. प्रत्येक मुलासोबत स्वतंत्रपणे देखील थोडा वेळ घालवला पाहिजे. तिच्या चांगल्या वागण्याचे कौतुक केले पाहिजे, अडचणी किंवा न पटणार्या वर्तनाबद्दल बोलले पाहिजे. किशोर वयात जेव्हा संघर्ष आणि तणाव निर्माण होतो तेव्हा या नात्याचा पाया मुलांना मदत करतो.
पौगंडावस्थेतील मुलं आणि तरूणांच्या मानवी हक्कांमध्ये इतर काही गोष्टींसोबात पुढील गोष्टी समाविष्ट आहेत :
- जगणं, स्वातंत्र्य आणि सुरक्षा
- आरोग्य
- शिक्षण
- माहिती
- अभिव्यक्ती
- संघटन
- भेदभावापासून स्वातंत्र्य
- छळ आणि इतर क्रूर, अमानवी आणि अपमानास्पद वागणूक किंवा शिक्षा, लैंगिक हिंसाचार यापासून मुक्तता
- लग्नासाठी संमती
संदर्भ: मानवी हक्कांची सनद
पालकांसाठी धोके आणि संरक्षणात्मक घटकांच्या पातळ्या
मानसिक आरोग्याच्या समस्येचा सामना करणार्या मुलांशी निगडीत घटकांमध्ये कौटुंबिक रचना (जसे की एकटे पालक, पुनर्रचित कुटुंब, मोठे कुटुंब); पालकांची शैक्षणिक स्थिती, दारिद्र्य आणि निम्न सामाजिक-आर्थिक स्थिती यांचा समावेश होतो. भावनिक समस्याग्रस्त मुले, वर्तनात्मक समस्याग्रस्त मुले, बेघर मुले आणि कायद्याच्या कचाट्यात सापडलेली मुले या चार गटातील मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्या भेडसावण्याची शक्यता अधिक असते.
मुलांच्या भावनिक आणि आकलनात्मक विकासावर पालकत्वाच्या शैलीचा गंभीर परिणाम होतो हे स्पष्ट आहे. प्रेम व विश्वासाची अनुभूती, आयुष्यात रस असणे, आशावाद, स्वायत्तता, स्वतःचा स्वीकार आणि लवचिकता हे मुलांच्या संरक्षणासाठीचे कळीचे घटक आहेत.
पालकांचा पाठिंबा कधीकधी टोकाचा असू शकतो - एकतर तो अपुरा (उदाहरणार्थ: मुलाला एकटे सोडणे, निष्काळजीपणा) किंवा अतिरेकी (खूपच काळजी घेणारे.) असतो.
जर पालकांनी मुलाला एकटे सोडले तर किशोरवयीन मुलांना चिंता, असुरक्षितता, मूलभूत अविश्वास, वचनबद्धतेची भीती, कमी आत्म-सन्मान किंवा ताबा प्रस्थापित करण्याची मोठी गरज यासारख्या मुद्यांना सामोरे जावे लागू शकते.
एका तरुणाने असे संगितले की, "माझे पालक एकमेकांना घटस्फोट देण्यात आणि स्वतःसाठी दूसरा जोडीदार शोधण्यात इतके व्यस्त होते की त्यांना माझ्यासाठी वेळ नव्हता.म्हणून मला स्वत:वर विसंबण्याशिवाय पर्याय नव्हता."
अतिकाळजी घेण्यामुळे, तरुणांना अवलंबित्व, आत्मविश्वासाचा अभाव, आत्मनिर्भरतेची कमतरता,अपरिपक्वपणा किंवा बेजबाबदारपणा अशा मुद्यांना सामोरे जावे लागू शकते. आईवडील सतत धावून येऊन अडचणीतून बाहेर काढत असल्यामुळे असे होते.
दुसर्या एका मुलाने संगितले की, “माझ्या आईवडिलांनी माझी खूप काळजी घेतलीय. ,” कोणत्याही वेळी आयुष्यात अडचण आली किंवा मी संकटात सापडलो तर ते कायम मदतीसाठी हजर असत, आणि अजूनही असतात."
लोकांचे विचार, भावना आणि वर्तनावर मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याइतकेच महत्त्वाचे आहे. मुलांच्या मानसिक आरोग्यात पालक महत्वाची भूमिका बजावतात:
- तुमची उक्ती, कृती आणि तुम्ही घरात जोपासलेल्या वातावरणाद्वारे तुम्ही चांगल्या मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देऊ शकता.
- मानसिक आरोग्याच्या समस्येची सुरवातीची लक्षणे कोणती असतात आणि त्या संदर्भात कोणाची मदत घ्यावी हे तुम्ही जाणून घेऊ शकता.
एकमेकांची काळजी घेणारी घट्ट नातेसंबंध तयार करण्यासाठी मुलांना मदत करा:
- कुटुंब आणि मित्रांबरोबर चांगले नातेसंबंध असणं हे मुले आणि युवकांसाठी महत्वाचे आहे. प्रत्येक रात्री जेवताना काही वेळ एकत्र घालवा.
- मुलांच्या आयुष्यात सातत्याने उपस्थित असणारी महत्त्वाची व्यक्ती त्यांना भावनिक दृष्ट्या लवचिक बनण्यास मदत करते. बर्याचदा ही व्यक्ती पालक किंवा कुटुंबातील अन्य सदस्य असू शकते. अशा व्यक्तीसोबत मुले बराच वेळ घालवतात आणि त्यांना गरज पडली तर आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो हे मुलांना माहीत असते.
- समस्या कशा सोडवाव्यात हे मुलांना दाखवा.
मुलांना आणि तरूणांना आत्मसन्मान जोपासण्यासाठी मदत करा , जेणेकरून त्यांना स्वतःबद्दल चांगले वाटेल:
- भरपूर प्रेम आणि स्वीकृती दाखवा
- त्यांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करा. त्यांचे प्रयत्न आणि त्यांचे साद्ध्य अशा दोन्ही गोष्टींचे कौतुक करा.
- त्यांचे उपक्रम व आवडी-निवडी याविषयी प्रश्न विचारा.
- त्यांना वास्तववादी ध्येय निश्चित करण्यासाठी मदत करा.
ऐकून घ्या आणि त्यांच्या भावनांचा आदर करा:
- मुले व तरूणांना दु:ख होणे किंवा राग वाटणे सजून घेण्याजोगे आहे. त्यांना काय वाटते याबद्दल बोलण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा.
- प्रश्न विचारून आणि आपल्या मुलाचे ऐकून संवाद आणि संभाषण चालू ठेवा. जेवणाची वेळ ही संवादासाठी चांगली वेळ असू शकते.
- तुमच्या मुलाला तुमच्याशी बोलणे अवघड जात असेल तर बोलण्यासाठी इतर व्यक्ती शोधण्यास त्यांना मदत करा
घरात सुरक्षित, सकारात्मक वातावरण तयार करा:
- आपल्या मुलाच्या माध्यमांच्या वापराबद्दल सजग रहा. ते काय बघतात आणि किती वेळ बघतात हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत.यात टीव्ही, चित्रपट, इंटरनेट आणि गेमिंग असे सर्व आले. समाज माध्यमे आणि आणि ऑनलाइन गेम्स खेळताना ते कोणाशी संवाद साधत असतात यावर लक्ष ठेवा.
- आपल्या मुलांसमोर गंभीर कौटुंबिक समस्यांविषयी जसे की आर्थिक, वैवाहिक समस्या किंवा आजारपण यावर चर्चा करताना सावधगिरी बाळगा. मुले या गोष्टींबद्दल चिंता करू शकतात.
- शारीरिक क्रिया, खेळ आणि कौटुंबिक गोष्टींसाठी वेळ द्या
- स्वत: च्या मानसिक आरोग्याची काळजी घेऊन त्यांच्यासमोर आदर्श निर्माण करा. आपल्या भावनांबद्दल बोला. आपल्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढा.
मुलांना आणि तरुणांना कठीण परिस्थितीतील समस्या सोडवण्यास मदत करा:
- अस्वस्थ झाल्यावर शांत कसे व्हायचे ते आपल्या मुलांना शिकवा. यामध्ये खोल श्वास घेणे, शांत होण्यासाठी काहीतरी करणे (उदाहरणार्थ ज्यामधून आनंद वाटेल अशी गोष्ट), थोडा वेळ एकटे राहणे किंवा फिरायला जाणे हे असू शकते.
- परिस्थिती सुधारण्यासाठीचे संभाव्य उपाय किंवा कल्पनांबद्दल बोला. टे उपाय कसे आमलात आणावे याची चर्चा करा. जास्त ताण न घेण्याचा प्रयत्न करा.
मानसिक आरोग्याचा प्रश्न तारुण्याच्या कोणत्याही टप्प्यावर निर्माण होऊ शकतो. परंतु काही विशिष्ट परिस्थितींमध्ये काही तरुणांना जास्त धोका असू शकतो. समाविष्ट गोष्टी:
- मानसिक आजाराचा कौटुंबिक इतिहास (अनुवांशिकता)
- नवीन स्थलांतरित आणि शरणार्थी ज्यांना कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो.
- एलजीबीटीक्यू मुले आणि तरुण ज्यांना धमकावले जाते किंवा ज्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून नाकारले जाण्याचा अनुभव आहे.
- ज्यांच्या आयुष्यात मोठे बदल होतात अशी मुले. जसे की नवीन शहर किंवा नवीन शाळेत जाणे, काळजी घेणार्या व्यक्तीपासून वेगळे होणे किंवा पालकांचा घटस्फोट , गंभीर आजार किंवा
- जवळच्या नातेवाईक किंवा मित्राचा मृत्यू. जबरदस्त मानसिक आघाताचा सामना करणे किंवा त्याचे साक्षीदार असणे. शोषणाची शिकार असणे.
- मादक पदार्थांचा वापर.
दुर्दैवाने, बर्याच मुलांना आणि तरुणांना लवकरात लवकर मदत मिळत नाही. शाळेत यशस्वी होणे, मित्र बनविणे किंवा पालकांपासून स्वतंत्र होणे यामध्ये मनोविकारांमुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. मानसिक आरोग्य विकार असलेल्या मुलांना आणि तरूणांना त्यांच्या विकासाचे टप्पे गाठताना त्रास होऊ शकतो.
चांगली बातमी अशी आहे की मानसिक आरोग्याविकारांवर उपचार करणे शक्य आहे. भावनिक किंवा मानसिक आरोग्याच्या समस्यांसह संघर्ष करणार्या मुलांना आणि तरुणांना मदत करण्याकरिता बर्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत. लवकर मदत मिळवणे महत्वाचे आहे. त्यामुळे समस्या अधिक गंभीर होणे टाळता येते आणि आपल्या त्यांचा मुलाच्या विकासावर होणारा प्रभाव कमी करता येतो.
सर्व मुले आणि तरुण वेगवेगळे असतात. तुमच्या मुलाला एखादी समस्या आहे अशी काळजी तुम्हाला वाटत असेल तर त्यांचे विचार, भावना किंवा कृती यामध्ये काही बदल झाले आहेत का ते पहा. मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे शारीरिक बदल देखील होऊ शकतात. आपलं मुलं घरी, शाळेत आणि मित्रांबरोबर कशी वागताहेत याकडे लक्ष द्या.
विचारातील बदल
- स्वतःबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे किंवा त्यांच्या नियंत्रणाबाहेरील गोष्टींसाठी स्वत:ला दोष देणे.
- लक्ष केंद्रीत करण्यात अडचण.
- सतत नकारात्मक विचार.
- शाळेतील कामगिरीवर परिणाम.
भावनांमधील बदल
- परिस्थितीपेक्षा अधिक तीव्र प्रतिक्रिया किंवा भावना.
- फार दु:खी, चिंतित, अपराधी, घाबरलेला, चिडचिडा, उदास, किंवा रागावलेला दिसणे.
- असहाय्य, निराश, एकाकी किंवा नाकारले गेल्यासारखे वाटणे
वर्तनामध्ये बदल
- बर्याचदा एकटे राहण्याची इच्छा असणे.
- लगेच रडायला येणे.
- खेळ, गेम्स किंवा इतर आनंददायक गोष्टींमधील रस कमी होणे किंवा अशा गोष्टी न करणे.
- अतिरेकी-प्रतिक्रिया देणे, किंवा छोट्या छोट्या घटनांवरून अचानक राग येणे किंवा अश्रू येणे.
- नेहमीपेक्षा शांत, कमी उत्साही वाटणे.
- शांत रहाणे किंवा झोपेमध्ये अडचण येणे.
- दिवास्वप्न बघण्यात वेळ घालविणे
- अपरिपक्व वर्तनाकडे झुकणे.
- मित्रांबरोबर राहण्यात अडथळा येणे.
शारिरीक बदल
- डोकेदुखी, पोटदुखी, मान दुखणे, किंवा सामान्य वेदना
- उत्साह कमी होणे, किंवा सतत दमल्यासारखे वाटणे.
- झोपेची किंवा जेवणाची समस्या.
- अतिरेकी ऊर्जा असणे किंवा नखे खाणे, केस ओढणे किंवा अंगठा चोखणे यासारख्या चिंता प्रकट करणार्या सवयी असणे.
लक्षात ठेवा: यापैकी एक किंवा एकापेक्षा जास्त लक्षणे मुलामध्ये किंवा तरुणांमध्ये दिसणे म्हणजे लगेच त्याला मानसिक आजार झाला आहे असे नाही.
आपल्या मुलास चांगले मानसिक आरोग्य मिळण्यासाठी बर्याच मार्गाने मदत करता येते. त्यापैकी एक म्हणजे आपल्या चिंतांविषयी डॉक्टरांशी संवाद करणे. आपल्या मुलाच्या डॉक्टरांशी बोला:
- वर वर्णन केलेले वर्तन काही काळ टिकून राहिल्यास किंवा त्यामुळे आपल्या मुलाच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असल्यास
- आपल्या मुलाच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याबद्दल चिंता असल्यास;
- मूल कसे आहे हे सांगण्यासाठी डॉक्टरची भेट घ्या आणि आपल्या मुलाचा वर्तनात्मक विकास आणि भावनिक आरोग्याबद्दल डॉक्टरशी आवर्जून बोला.
जर तुमचे मूल किंवा किशोरवयीन मुले आत्महत्या करण्याविषयी किंवा स्वत:ला हानी पोहचवण्याविषयी बोलत असतील तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांना किंवा स्थानिक मानसिक आरोग्याच्या हेल्पलाईनवर कॉल करा.