Search

नातेसंबंधांचे व्यवस्थापन कसे करायचे?

पौगंडावस्थेमध्ये शरीर आणि विचारांमध्ये बदल होतो. कुटुंब आणि मित्रांसोबत असलेल्या नात्यामध्ये देखील बदल होतो. 

या काळात अनेकदा कौटुंबिक संबंधांची पुनर्रचना केली जाते. किशोरवयीन मुलांना जास्त स्वातंत्र्य हवे असते आणि पालकांसोबतच्या नात्यात अधिक स्वातंत्र्य आणि अधिक भावनिक अंतर हवे असते. या वयात मित्र मैत्रिणींकडे त्यांचा जास्त कल असतो. यात समान-लिंगी मित्रमैत्रीणी, त्यांचे गट, भिन्न लिंगी मित्र मैत्रिणी आणि त्यांचे गट हे सगळे येते. या वयात होणार्‍या लैंगिक बदलांमुळे त्यांना भावनिक आणि लैंगिक संबंधांमध्ये स्वारस्य निर्माण होते.

स्वतःसोबत बदलणारे नाते

किशोरवयीन वयामध्ये, स्वतःबद्दल एक नवीन समज येते. स्वतःविषयी वाटणाऱ्या संकल्पना यावेळी बदलू शकतात.

  1. स्वातंत्र्य

    स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेणे. आपल्या स्वतःच्या विचारावर आधारित निर्णय घेणे. 

    तुम्ही तुमच्या स्वतःच्या समस्यांचे निराकरण करणे शिकण्यास सुरवात केली पाहिजे. किशोरावस्थेत आपली तर्कबुद्धी विकसित होते. यामुळे आपल्यामध्ये नवीन जबाबदाऱ्यांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होते. या वयात आपण भविष्याबद्दल आणि प्रौढ जीवनाबद्दल (उदाहरणार्थ, महाविद्यालयीन शिक्षण किंवा नोकरी आणि विवाह) विचार आणि योजना सुरू करतो.

  2. स्वतःची ओळख

    स्वतःची ओळख म्हणजे स्वतःविषयीची जाणीव. 

    पौगंडावस्थेमध्ये आपल्याला स्वतःची वैयक्तिक ओळख निर्माण करण्याची इच्छा होते. स्वतःच्या शरीराविषयी आपण जास्त विचार करू लागतो. स्वतः अंदाज घेऊन स्वतःचे निर्णय घ्यायला शिकतो. समस्यांना सामोरे जाण्याच्या विविध अंनुभवांमधून आपण स्वतःला काय हवे आहे आणि वेगवेगळ्या परिस्थितींना कसे सामोरे जावे हे शिकतो. पौगंडावस्थेत आपल्या शारिरीक, मानसिक व लैंगिक व्यक्तिमत्त्वाची आपल्याला स्पष्ट ओळख झाली नाही तर स्वतःविषयीची स्पष्ट कल्पना विकसित होण्यात भविष्यात अडचण निर्माण होते.

  3. स्वप्रतिष्ठा

    तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल कसे वाटते किंवा मी स्वतःला किती आवडते? या प्रश्नाचे तुम्ही काय उत्तर देता यावरून तुमचा आत्मसन्मान कसा आहे हे समजते. 

    पौगंडावस्थेच्या सुरवातीला, आत्मसन्मान कमी होणे हे काहीसे सामान्य आहे. शरीरातील बदल, नवीन विचार आणि विचार करण्याच्या नवीन पद्धतींमुळे हे घडून येते. आपण कोण आहोत व आपल्याला कोण व्हायचे आहे याबद्दल किशोरवयीन मुले अधिक विचार करतात. आपण कसे वागतो आणि आपण कसे वागले पाहिजे यातील फरक त्यांच्या लक्षात येऊ लागतो. एकदा आपण आपले वागणे आणि गुण याबद्दल विचार करण्यास सुरवात केली की आपण स्वतःकडे अधिक सजगपणे पाहू शकतो. सोशल मीडिया आणि चांगले दिसण्याची गरज वाटल्यामुळे अनेक किशोरवयीन मुले आकर्षक शरीराला महत्त्व देतात. जर आपण शारीरिकदृष्ट्या आकर्षक नाही, अभ्यासात हुशार नाही किंवा मित्रांमध्ये फार लोकप्रिय नाही असे तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या मित्रांकडे असलेले फोन किंवा संगणक अशी उपकरणे तुमच्याकडे नसतील तर आपण पुरेसे चांगले नाही असे तुम्हाला वाटू शकते. आपण कोण आहोत याची अधिक चांगली जाणीव झाल्यामुळे सहसा, किशोरवयीन मुलांचा आत्मसन्मान वाढतो.

समवयस्क व्यक्तींशी असलेल्या संबंधांमध्ये बदल –

सामाजिक प्रगल्भता आणि भावनिक परिपक्वता यांचा जवळचा संबंध आहे. म्हणून, जशी भावनिक परिपक्वता वाढते तसे किशोरवयीन मुलांचे त्यांच्या समवयस्कांशी असलेले संबंध बदलतात. त्यांचे भावनिक स्वास्थ्य हे अधिकाधिक प्रमाणात मित्रांवर अवलंबून राहू लागते.

त्यामुळे पौगंडावस्थेदरम्यान समवयस्क मित्र मैत्रिणींशी अधिक जवळीकीचे नाते निर्माण होते. किशोरवयीन मुलांचा आता त्यांच्या कुटुंबांऐवजी मित्र मैत्रिणींकडे जास्त कल असतो. चिंता आणि उदासीच्या काळात त्यांना मदतीसाठी पहिली आठवण त्यांच्या समवयस्क मित्र- मैत्रिणींची येते. मैत्रीवरचे वाढलेले अवलंबित्व हा आपण स्वतंत्र आहोत हे दाखवण्याचा किशोरवयीन मुलांचा अजून एक मार्ग आहे.

समवयस्क गटाने आपल्याला स्वीकारणे इतके महत्वाचे बनते की किशोरवयीन मुले त्यांच्या मित्रांसारखे होण्यासाठी स्वतःचे बोलणे, कपडे, वर्तन, निवडी बदलू शकतात. समवयस्कांसारखे असलं की त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि त्यांनी निवडलेल्या गटात त्यांचा स्वीकार होतो. जेव्हा किशोरवयीन मुले आपले मित्र काय करत आहेत हे पाहून त्यांच्या आवडी किंवा वागणुकीत सुधारणा करतात तेव्हा तो मित्रांचा दबाव असतो. हा दबाव सहसा नकारात्मक परिणामांशी संबंधित असतो जसे की शाळेत न जाणे, फॅशनेबल कपडे घालणे किंवा दारू आणि इतर मादक पदार्थांचा वापर करणे. समवयस्कांचा दबाव सकारात्मक प्रभाव देखील टाकू शकतो हे अनेक पालकांच्या ध्यानात येत नाही. वाढलेल्या भावनिक परिपक्वतेमुळे आणि आकलनामुळे किशोरवयीन मुले एकमेकांना सुज्ञ निर्णय घेण्यास प्रोत्साहन देऊ शकतात आणि हानिकारक निवड करण्यापासून एकमेकांना परावृत्त करू शकतात.

तरुणांसाठी त्यांच्या समवयस्क गटामध्ये स्वीकारले जाणे महत्वाचे असल्यामुळे ते त्यांच्या मित्रांसारखे छंद जोपासण्याचा किंवा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेऊ शकतात. यामुळे त्यांना एकमेकांसोबत अधिक वेळ घालवता येतो आणि सगळ्या मित्रांना सारखाच अनुभव घेता येतो. किशोरवयीन मुले त्यांच्यासारख्याच मुलांच्या गटांकडे आकर्षित होतात. साधारणपणे ज्यांच्याशी त्यांच्या आवडीनिवडी जुळतात , जिथे सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सारखा असतो अशा मित्र मैत्रिणींचे एकत्र गट बनतात. परंतु बऱ्याचदा, किशोरवयीन मुलं मुली त्यांच्या स्व-ओळखी सोबत प्रयोग करतात आणि खूप भिन्न आवडी असलेल्या समवयस्क गटांकडेही आकर्षित होतात.

किशोरवयीन समवयस्क गट हे त्यांच्याहून लहान मुलांच्या मित्र मैत्रिणींच्या वर्तुळापेक्षा बरेच वेगळे असतात. उदाहरणार्थ, किशोरवयीन समवयस्क गटांमध्ये घट्ट मैत्री असते. किशोरवयात नातेसंबंध बदलतात त्यामुळे इतकी घट्ट मैत्री होते. किशोरवयात वाढलेली असुरक्षितता आणि भावनिक जवळीकीची गरज यामुळे नात्यांमध्ये अधिक विश्वासाची गरज असते. म्हणून अशा गटांमध्ये वचनबद्धता आणि निष्ठा याला खूप जास्त महत्व असते. यामुळे मित्र मैत्रिणींच्या गटात सामंजस्य वाढते आणि एकमेकांच्या परस्पर सुरक्षेची आणि संरक्षणाची भावना निर्माण होते. उभरत्या आणि पडत्या दोन्ही काळात मैत्रीला जागणारे मित्र मिळाले तर त्यांना अधिक सुरक्षित वाटू लागते आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. समान आवडी, दृष्टिकोन, मूल्ये आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी यामुळेही काही जवळचे मित्र मैत्रिणी तयार होतात. मित्र मैत्रिणी यांची निवड शैक्षणिक आवडींवर देखील आधारित असते. विशेषतः मुलींचा त्यांचा मित्र मैत्रिणींसोबत होणारा जिव्हाळ्याचा संवाद, त्यांना स्वतःविषयीची जाणीव निर्माण करण्यासाठी मदत करतो. मुलांमध्ये मात्र वैयक्तिक गप्पांपेक्षा समान आवडीनिवडी असलेल्या आणि समान गोष्टी करणार्‍या मित्रांचा गट बनतो.

वाढलेली निष्ठा आणि सामंजस्य यामुळे किशोरवयीन समवयस्क गटांत, विशेषत: किशोरवयाच्या प्रारंभिक आणि मधल्या काळात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. गँग तयार होऊ शकतात आणि काही मुले त्यातून अपरिहार्यपणे वगळली जातात. अशाप्रकारे नाकारले जाणे, संवेदनशील मुलांसाठी अनेकदा अत्यंत वेदनादायक असते. किशोरवयीन समवयस्क गटांमुळे उद्भवणारी आणखी एक समस्या म्हणजे गुंडगिरी(bullying). जेव्हा गटांमध्ये किंवा गट सदस्यांमध्ये शक्ती आणि अधिकाराच्या प्रमाणात फरक असतो तेव्हा गुंडगिरी होऊ शकते. हा फरक शारीरिक, मानसिक, सामाजिक किंवा आर्थिकही असू शकतो.

पौगंडावस्थेच्या शेवटी शेवटी समवयस्क मुलांचे गट जवळच्या, दुसऱ्या कुटुंबासारखे होऊन जातात. तरुणांना ते मोठ्या प्रमाणात भावनिक आधार देत असतात. जर तरुण कॉलेज किंवा कामामुळे त्यांच्या कुटुंबापासून दूर राहिले तर हे समवयस्क गट आणखी जवळचे होतात.

थोडक्यात, पौगंडावस्थेमध्ये जिवलग मित्र मैत्रिणींची संख्या कमी होते, परंतु नात्यांची गुणवत्ता वाढून ती अधिक विश्वासार्ह व जिव्हाळ्याची बनतात. आत्ताच्या काळात, अत्याधुनिक दळणवळण तंत्रज्ञान, नवीन सृजनशील आणि सामाजिक उपक्रम, नवीन शैक्षणिक अनुभव आणि रोजगारामुळे युवकांचे सोशल नेटवर्क वाढले आहे. त्याने पौगंडावस्थेत जवळच्या नसलेल्या मित्रांची संख्यासुद्धा वाढते आहे.

स्त्री-पुरुष नातेसंबंधांमधील बदल

स्त्री पुरुष संबंध आणि सर्वच लैंगिक संबंध हे माणसांचा लैंगिक कल, अवतीभवतीचे सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण आणि अपेक्षा हयानुसार बदलत असतात. सामाजिक आणि सांस्कृतिक अपेक्षा आणि स्त्री पुरुष संबंध किंवा इतर लैंगिक संबंध याबाबतचे ज्ञान आपण निरीक्षण आणि सरावातून मिळवत असतो. लैंगिक आणि आक्रमक इच्छांवर नियंत्रण मिळवायला शिकणे हे एक पौगंडावस्थेतील महत्त्वाचे विकासात्मक कार्य आहे. संभाव्य किंवा प्रत्यक्ष प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यासाठीचा शोधसुद्धा या वयात सुरू होतो. स्त्री आणि पुरुषांमधे काही जैविक फरक असतात आणि त्यांचे सामाजिकिकरण देखील वेगवेगळ्या प्रकारे घडते, त्यामुळे पुरुष आणि स्त्रियाच्या लैंगिक आणि प्रेम संबंधांकडून असलेल्या अपेक्षा भिन्न असतात. या सर्वाचा सध्याच्या व भविष्यातील लैंगिक अनुभवांवर आणि लैंगिक समाधानावर परिणाम होऊ शकतो. या प्रवासात आपल्याला दोन्ही जोडीदारांना समाधान मिळेल असे लैंगिक संबंध आणि प्रेम प्राप्त होऊ शकते.

लैंगिकता का महत्त्वाची आहे? 

खाद्या व्यक्तीला कोण रोमँटिक वाटते किंवा कोणाविषयी आकर्षण वाटते यावर त्या व्यक्तीची लैंगिकता ठरते. अनेकांना असे वाटते की आपल्या लैंगिकतेला काही नाव मिळाले की लैंगिकतेविषयी असलेल्या आपल्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याची मदत होईल. स्वतःच्या अनुभवांबद्दल बोलता येईल असे गट मिळण्यास देखील त्यामुळे मदत होऊ शकते.

एखादी व्यक्ती कोणाकडे आकर्षित होते किंवा कोणाकडे आकर्षित होत नाही यावर त्या व्यक्तीची लैंगिकता किंवा लैंगिक कल ठरतो. हे आकर्षण सामान्यतः लैंगिक किंवा रोमँटिक असते.

एखाद्या व्यक्तीची लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा म्हणजे लैंगिक आकर्षण होय. इतर लोकांशी लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा लैंगिक आकर्षणामुळे निर्माण होते. लैंगिक आकर्षणामध्ये शारीरिक आकर्षण आणि त्याचा आभाव अशा दोन्ही गोष्टींचा समावेश होतो.

लैंगिकता समजून घेताना लैंगिक आकर्षण आणि प्रेम या दोन्ही गोष्टी प्रत्येकवेळी एकत्र ध्यानात घेतल्या पाहिजेतच असे नाही.

अनेक लैंगिक कल असू शकतात. एखाद्याला स्वतःची एक किंवा अनेक प्रकारे लैंगिक ओळख पटली तरी त्यांची लैंगिकता कालांतराने बदलू शकते. असे घडणे ही अगदी साधारण बाब आहे - लैंगिकता प्रवाही , सतत बदलणारी असू शकते

लैंगिकतेचे प्रकार

लैंगिक कल ही संज्ञा व्यक्तीच्या भावनिक, प्रेमविषयक किंवा लैंगिक आकर्षणाचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते. यामध्ये समलिंगी व्यक्तिप्रती आकर्षण, (समलैंगिकता-homosexuality), स्वतःपेक्षा भिन्न लिंगी व्यक्तिप्रती आकर्षण (विषमलैंगिकता-heterosexuality), पुरुष आणि स्त्रिया दोहोंप्रती आकर्षण (उभयलिंगी-bisexual), सर्व माणसांप्रती आकर्षण (pansexual), किंवा कोणाच विषयी शारीरिक आकर्षण न वाटणे (अलैंगिक-asexuality) असे प्रकार असतात..

लैंगिक प्रवृत्तीचे विविध प्रकार आहेत.

  • विषमलिंगी - अशा व्यक्तीला बहुतांशी वेळा केवळ "दुसर्‍या" (बाईला पुरुषाविषयी व पुरूषाला बाई विषयी) लिंगाच्या लोकांविषयी आकर्षण वाटते. 
  • समलैंगिक - अशा व्यक्तीला बहुतांशी वेळा केवळ स्वतःच्या लिंगाच्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटते.
  • उभयलिंगी - अशा व्यक्ती स्त्री आणि पुरुष दोघांकडे आकर्षित होतात. दोघांविषयीही समान तीव्रतेने आकर्षण वाटणे किंवा दोघांकडे ही एकाच वेळी आकर्षित होणे गरजेचे नाही. 
  • पॅनसेक्सुअल किंवा सर्वलिंगी- अशा व्यक्ती सर्व माणसांकडे आकर्षित होऊ शकतात. 
  • अलैंगिक - अशा व्यक्ती लैंगिकदृष्ट्या कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीकडे आकर्षित होत नाही. कोणाशी लैंगिक संबंध न ठेवण्याच्या निर्णयापेक्षा किंवा ब्रम्हचर्यापेक्षा हे वेगळे असते.

 

बऱ्याच लोकांना स्वतःच्या लैंगिक कलाचे ज्ञान काही काळ गेल्यानंतर होते. उदाहरणार्थ, काही मुली उच्च माध्यमिक शाळेत असताना मुलांकडे आकर्षित होतात, नंतर त्यांना त्यांच्या स्वतःच्या लिंगाच्या व्यक्तीकडे, रोमँटिक आणि लैंगिकदृष्ट्या अधिक आकर्षित झाल्याचे लक्षात येते.

लोक त्यांचे लैंगिक कल कसे शोधतात?

बर्‍याच लोकांना प्रथम त्यांच्या किशोरवयीन वर्षांमध्ये लैंगिक कलाची जाणीव होते. उदाहरणार्थ, तारुण्यात, शाळेत कोणाकडे तरी आकर्षित झाल्यावर पहिल्या प्रेमभावना अनुभवणे सर्वसाधारण आहे.

काही किशोरवयीन मुले-मुली समलिंगी व्यक्तीबरोबर लैंगिक प्रयोग करू शकतात. परंतु याचा अर्थ असा नव्हे की प्रौढ व्यक्ती म्हणून सुद्धा ती व्यक्ती समलिंगी व्यक्तीकडेच आकर्षित होईल. काही किशोरवयीन मुलांमुलींमध्ये, समान लिंगाच्या व्यक्तीविषयी वाटणारे आकर्षण कमी होत नाही. त्याची तीव्रता वाढत जाते.

कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये होणारे बदल

तरुण झाल्यावर कुटुंबापासून वेगळे होणे हे पौगंडावस्थेतील विकासात्मक कार्यांपैकी एक महत्वाचे कार्य आहे. आपल्या कुटुंबाप्रति आपल्याला वाटणार्‍या भावनांचा स्वीकार करणे हा या प्रक्रियेचा एक भाग आहे. आपल्या पालकांना आणि मोठ्या माणसांना सर्व काही माहित नसते किंवा त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या अडचणींवर उपाय नसतात हे किशोरवयीन मुलांना समजण्यास सुरवात होते. किशोरवयीन मुलांनी पालकांविरुद्ध बंड करून उठणे ही अगदी सामान्य बाब आहे. अनेकदा कालांतराने हे मतभेद कमी होतात. किशोरवयीन मुले त्यांच्या पालकांपासून जशी स्वतंत्र होत जातात तशी सल्ला घेण्यासाठी ती समवयस्क मुलांकडे वळण्याची शक्यता वाढत जाते.

पौगंडावस्थेदरम्यान पालकांशी कमी-अधिक संघर्ष होणे, सर्वसामान्य आहे. हे संघर्ष किशोरवयीन मुलांच्या स्वायत्तता आणि स्वातंत्र्याच्या विकासावर परिणाम करतात. अतिसंघर्ष किशोरांच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक असतात. ज्या किशोरवयीन मुलांचे त्यांच्या पालकांशी अधिक मतभेद होतात त्यांना अनेक समस्या भेडसावू शकतात. अशा मुलांमध्ये आत्मसन्मानाची कमतरता असते, त्यांना शाळेच्या अभ्यासात आणि उपक्रमांमध्ये मिसळणे अवघड होऊन बसते आणि अशी मुलं अमली पदार्थांच्या सेवनाकडे झुकू शकतात. पौगंडावस्थेत असताना पालकांशी झालेल्या संघर्षांमुळे मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते आणि मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे पालकांशी अधिक संघर्ष होऊ शकतो; अशी ही दुहेरी प्रक्रिया आहे.

युवक समवयस्क नातेसंबंधाना अधिक महत्त्व देत असल्याने, कुटुंबातील सदस्यांसोबत घालवण्यासाठी त्यांच्याकडे कमी वेळ उपलब्ध असतो. परंतु, कुटुंबापासून दूर जाण्यामागे वेळेचा अभाव हे एकमेव कारण नाही. युवकांचा होणारा संज्ञानात्मक विकास (Cognitive development) त्यांना त्यांच्या समवयस्कांच्या इच्छा, गरजा आणि भावना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम करतात. अशा प्रकारे मानसिक आणि भावनिक परिपक्वता आली की किशोरवयीन मुले मित्र मैत्रिणींना भावनिक आधार देण्यास आणि संवेदनशील सल्ला देण्यास अधिक सक्षम होतात. आणि म्हणूनच कुटुंब त्यांचा मानसिक आणि भावनिक आधाराचे केंद्र राहत नाही.

पौगंडावस्थेच्या सुरूवातीला आणि मध्यात किशोरवयीन मुले आणि त्यांच्या पालकांमध्ये वारंवार संघर्ष होतो. बहुतेकदा किशोरवयीन मुले त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा दावा करण्याचा प्रयत्न करीत असतात, स्वातंत्र्य अनुभवत आणि उपभोगत असतात म्हणून हे संघर्ष होतात. स्वतःविषयीची ओळख करून घेण्याच्या प्रक्रियेत कधीकधी तरुण मुले, पालकांनी घालून दिलेल्या नियमांचे आणि मूल्यांचे उघडपणे उल्लंघन करतात. काही विषयांवर पालकांसोबत चर्चा करण्यास किशोरवयीन मुले नाखूष असू शकतात कारण अशा चर्चेमुळे ते अडचणीत येतील अशी त्यांना भीती असते.

आपण स्वतःच जीवनातील कठीण परिस्थिती हाताळू शकतो हे सिद्ध करण्याच्या इच्छेतून सुद्धा अनेकदा तरुण मुले, त्याच्या पालकांशी काही विषयांवर चर्चा करण्याचे टाळतात. याउलट, जेव्हा तरुण मुले त्यांच्या मित्रांकडे मदतीसाठी वळतात, तेव्हा ते एकमेकांना समान महत्व देत एकमेकांशी सल्लामसलत करतात. ती बाब पालकांशी सल्लामसलत करण्यापेक्षा बरीच वेगळी असते.

पालकांना आपले म्हणणे समजणार नाही किंवा आपल्या चिंता आणि संकल्पना पुरेशा गांभीर्याने घेतल्या जाणार नाहीत अशा समजुतीपोटीसुद्धा कधीकधी तरुण मुले त्यांच्या पालकांशी संभाषण करणे टाळतात. असे असूनही बहुतेक पालकांना, मुले अडचणीच्या वेळी मदत घेण्यासाठी त्यांचाकडे गेली तर जास्त आवडेल. पालक, मुलांना थेट उत्तर किंवा पर्याय उपलब्ध करून देण्यापेक्षा आणि लगेचच निष्कर्षावर येण्यापेक्षा मुलांच्या भावना काळजीपूर्वक ऐकण्याचा प्रत्येक प्रयत्न करू शकतात. या शिवाय, पालकांनी त्यांच्या किशोरवयीन मुलांच्या चिंताना क्षुल्लक लेखणे टाळले पाहिजे.

शक्यतो पालकांनी, मुलांना आलेल्या समस्यांवर स्वतःच उत्तर शोधून काढण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि त्यांनी निवडलेला पर्याय जरी सर्वोत्तम नसला तरीही त्याला प्रोत्साहन देणे हा सर्वोत्तम मार्ग ठरतो. हा मार्ग किशोरांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा सराव करण्यासाठी सक्षम करतो आणि तरीही निर्णय घेताना पालकांच्या सल्ल्याचाही त्यांना फायदा होतो. पालक जर या सर्वाबाबत संवेदनशील राहिले तर किशोरवयीन मुले पालकांशी महत्त्वाच्या समस्यांवर चर्चा करण्याची शक्यता वाढते.

सुदैवाने, तरुण आणि त्यांच्या पालकांमधील तणाव आणि संघर्षाचा हा काळ कायमच राहत नाही. सामान्यत: पौगंडावस्थेच्या शेवटी शेवटी मुलं पुन्हा त्यांच्या पालकांच्या जवळ येतात. सर्वसामान्यपणे पौगंडावस्थेपूर्वी जर मुले आणि पालक यांमध्ये जवळचे, प्रेमाचे, आणि विश्वासाचे नाते असेल तर संघर्ष कमी झाल्यावर तसेच नाते पुन्हा प्रस्थापित होते.

पालक आणि तरुण यांच्यातील संघर्ष अनेक कारणांमुळे कमी होतो. पौगंडावस्थेच्या शेवटी शेवटी मुले स्वत:ला ताब्यात ठेवण्यात अधिक सक्षम होतात व पालकांना मुलांवर नियम लागू करण्याची किंवा त्यांना शिस्त लावण्याची आवश्यकता उरत नाही. दुसरे म्हणजे, मुलांची संज्ञानात्मक आणि भावनिक परिपक्वता वाढत जाते त्यामुळे तरुण मुले त्यांच्या पालकांसह प्रत्येकाशी अधिक परिपक्व संबंध ठेवण्यास सक्षम होत जातात. या सर्वांमुळे पालकांच्या मुलांबाबतच्या भूमिका देखील बदलत जातात. पौगंडावस्थेतील तरुण जेव्हा प्रौढ होतात तेव्हा पालक मुलांसोबतच्या नात्याचा मैत्रीपूर्ण आनंद घेऊ शकतात.

पालक आणि तरुण यांच्यातील संघर्ष अनेक कारणांमुळे कमी होतो. पौगंडावस्थेच्या शेवटी शेवटी मुले स्वत:ला ताब्यात ठेवण्यात अधिक सक्षम होतात व पालकांना मुलांवर नियम लागू करण्याची किंवा त्यांना शिस्त लावण्याची आवश्यकता उरत नाही. दुसरे म्हणजे, मुलांची संज्ञानात्मक आणि भावनिक परिपक्वता वाढत जाते त्यामुळे तरुण मुले त्यांच्या पालकांसह प्रत्येकाशी अधिक परिपक्व संबंध ठेवण्यास सक्षम होत जातात. या सर्वांमुळे पालकांच्या मुलांबाबतच्या भूमिका देखील बदलत जातात. पौगंडावस्थेतील तरुण जेव्हा प्रौढ होतात तेव्हा पालक मुलांसोबतच्या नात्याचा मैत्रीपूर्ण आनंद घेऊ शकतात.

संबंधित लेख

मुले दिवसातील बराच वेळ शाळेत घालवतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गैरवर्तन आणि...

मराठी
Search